Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखपाणीपुरवठा चिंताजनक होऊ नये!

पाणीपुरवठा चिंताजनक होऊ नये!

राज्यातील धरणांमधील जलसाठा कमी होत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणेही याला अपवाद नाहीत. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तो 55-60 टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 10 टक्क्याने कमी झाला आहे.

जलसाठ्याचे नियोजन योग्य पद्धतीने सुरु असून जुलैअखेरपर्यंत पाणी पुरेल असा विश्वास पाटबंधारे खात्याने व्यक्त केल्याचे सांगितले जाते. तथापि ग्रामीण भागातील वाड्या-वस्त्या व सुरगाणा तालुक्यात काही ठिकाणी पाणीटंचाई आत्ताच जाणवू लागली आहे. उन्हाळ्याचे पुढचे 2-3 महिने कसे जातील अशी चिंता व्यक्त होत आहे. यंदा मार्च महिन्यातच उन्हाने तडाखा दिला. यंदाचा उन्हाळा कडक असेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. नाशिकमध्येही गेले 3-4 दिवस वातावरणात बदल जाणवत असून दुपारच्या वेळेत तापमान 36 डिग्रीच्या पुढे गेले आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात धरणांमधून उन्हाळी आवर्तन सोडावे लागते.

- Advertisement -

वास्तविक गेल्या वर्षी खूप उशिरापर्यंत पाऊस पडला. मान्सूनच्या अखेरच्या टप्प्यात तो जोरदार झाला. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीसच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणासह जिल्ह्यातील 15-16 धरणे 100 टक्के भरली होती. अन्य लहानमोठ्या धरणांमधील पाणीसाठा 94-95 टक्के झाला होता. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. त्यामुळे नाशिककर कमालीचे सुखावले होते. 2021 मध्ये पाणीटंचाही जाणवणार नाही अशी खात्री जाणकारांनी व्यक्त केली होती. तथापि वास्तव तसे का नाही? धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5-10 टक्क्यांनी कमी का झाला? जास्तीचे पाणी गेले कुठे? पाणी योग्य पद्धतीने वापरले गेले की त्याचा गैरवापर वाढल्याने पाणीसाठा कमी झाला? सक्तीच्या टाळेबंदीच्या काळात विशेषतः नाशिक शहरामधील पाणीवापर वाढल्याचे सांगितले जात होते. टाळेबंदीपूर्वी शहराला दररोज 50 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जायचा. पण टाळेबंदीच्या काळात या पाणीपुरवठ्यात 15 दशलक्ष लिटरने वाढ झाली होती. त्याची झळ नाशिककरांना जाणवेल अशी शक्यता तेव्हा जाणकारांनी व्यक्त केली होती. तसे होऊ नये, पाणीकपात सहन करण्याची वेळ येऊ नये यासाठी आत्तापासूनच संबंधितांना दक्षता घ्यावी लागेल.

गतवर्षीच्या तुलनेत धरणांमधील पाणीसाठा कमी का झाला याची कारणे प्रशासकीय यंत्रणेने जशी शोधायला हवीत तसेच नागरिकांनाही पाण्याचा वापर जपून करावा लागेल. एखादी गोष्ट मुबलक उपलब्ध झाली तर तिचा वापर करण्यात बेफिकिरी येऊ शकते. तिच्या वापरापेक्षा गैरवापर सहज होऊ लागतो. महापालिकेचे सेवक अनेकदा नागरिकांवर जास्त दयाळू आढळतात. त्यासाठी नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. तसे पाण्याच्या बाबतीत होऊ नये. पाणीटंचाईची भीषणता नाशिककरांनी अनेकवेळा सहन केली आहे. तरीही आजही अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होताना आढळतो.

नळी लावून वाहने धुणे, अंगणात बादल्या भरभरुन पाण्याचा सडा मारणे, घरातील झाडांना भर उन्हात पाणी घालणे, गरम होते म्हणून दिवसातून 2-3 वेळा स्नान करणे, मोठया प्रमाणावर कपडे धुणे या सवयी बदलाव्या लागतील. काही ठिकाणी सार्वजनिक नळांना तोट्या नसतात. असल्या तरी नळ सुरूच असतात. त्यामुळे पाणी वाया जाते. सार्वजनिक ठिकाणचे नळांचे पाणी वाया जात असतांना ममला काय त्याचेफ असा दृष्टिकोन योग्य ठरणार नाही. सवयींमधील असे छोटे छोटे बदल पाण्याचा गैरवापर थांबवू शकतात. पाणी वाचवू शकतात. मआजची बचत; उद्याचा फायदाफ हे गृहीतक पाणीसाठ्यालाही लागू आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी प्रशासन, महापालिका आणि नागरिकांना दक्षता बाळगावीच लागेल. त्याला पर्याय नाही!

- Advertisment -

ताज्या बातम्या