Monday, April 29, 2024
Homeअग्रलेखअन्न वाया घालवणे हा सामाजिक गुन्हा

अन्न वाया घालवणे हा सामाजिक गुन्हा

देशात उपाशीपोटी झोपणाऱ्यांची वाढती संख्या आणि अन्नाची प्रचंड नासाडी या समाजातील एकाच नाण्याच्या दोन बाजू कमालीच्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. भारतात दरवर्षी 67 दशलक्ष टन इतके अन्न वाया घालवले जाते ज्याची किंमत जवळपास 92 हजार कोटींच्या आसपास होते असे सांगितले जाते. त्यात वाया जाणारे अन्नपदार्थ, निगा राखली न गेल्यामुळे वाया जाणारे धान्य याचा देखील समावेश आहे. भारतीय संस्कृतीत अन्नाला पूर्णब्रम्ह मानले आहे.

संतांनी त्यांच्या अभंगांमध्येही त्याचे वर्णन केले आहे. तथापि सार्वजनिक जीवनात नेमके याच्या विरुद्ध प्रदर्शन आढळते. सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ, लग्नसोहळे किंवा सामूहिक पार्ट्या यात अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होते. अन्न फेकून देण्याची चढाओढ लागते. शिळे अन्न लोक बिनदिक्कतपणे कचराकुंडीत टाकतात. पोटाला लागेल तितकेच घ्यावे आणि खावे हा संस्कार लोक विसरले असावेत का? अन्न साठवणुकीच्या सुविधांअभावी देशात कित्येक टन धान्य खराब होते. महागाई वाढत आहे. भूक निर्देशकांत भारताचे स्थान घसरते आहे. अशा अनेक मुद्यांवर लोक टीका करतात. सरकारला धारेवर धरतात. सरकारने काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी अपेक्षा करतात. ती रास्तही मानावी लागेल. अन्नधान्य उत्पादनाच्या तुलनेत साठवणुकीच्या सोयी सरकारने निर्माण करायला हव्यात यात दुमत नाही. तथापि वैयक्तिक आणि सामाजिक पातळीवरही महत्वाची भूमिका लोक बजावू शकतात. अन्नाची नासाडी आणि उपासमारी परस्पर संबंधित नाही का? याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न नाशिकमधील एका अकरा वर्षाच्या विद्यार्थिनीने केला आहे. यासाठी तिने एक वेबसाइट देखील तयार केली आहे.

- Advertisement -

या वेबसाईटवर ती याच विषयाची माहिती देते. चर्चा करते. अन्न वाया घालवणार नाही अशी प्रतिज्ञा लोकांना घ्यायला लावते. अनेक गोष्टी करता येण्यासारख्या असतात. जेवढे पाहिजे तेवढेच जेवण वाढून घेतले जाते का? स्वयंपाक योग्य प्रमाणात केला जातो की अन्न शिळे झाले म्हणून फेकून द्यावे लागते का? फळभाज्या आणि फळे वाया जातात का? नाशवंत तयार पदार्थ जास्त प्रमाणात खरेदी केले जातात का? उपयोगात न आणले गेल्यामुळे ते खराब होतात का? मुलांचे वर्तन कसे आहे? याचा शोध लोक त्यांच्या परीने घेऊ शकतात. गरज भासेल तिथे बदल करू शकतात. देशात रोज कोट्यवधी लोक उपाशी किंवा अर्धपोटी झोपत असताना एकही घास अन्न बेजबाबदारपणे फेकून देणे हा सामाजिक गुन्हाच मानला जायला हवा. कारण त्याची जाणीव सुद्धा बहुसंख्य लोकांना होत नाही हा खरा कळीचा मुद्दा आहे. ठरवले तर अन्नाची नासाडी किंवा अन्न वाया घालवणे हे अवघड किंवा अशक्य काम नाही. त्यासाठी सवयी थोड्याश्या बदलाव्या लागतील. तसे बदल सुरूही झाले आहेत. उरलेले अन्न गरजू माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामाजिक संस्था कार्यरत आहेत. त्याच्यात दुवा निर्माण करणारी अँप युवा पिढी तयार करत आहे. मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, रेस्तराँट्स यांच्याशी संपर्क साधून तो दुवा अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न अनेक सामाजिक संस्था करतात. काही संस्था वेगळे प्रयोग करतात. सार्वजनिक कार्यक्रमात जेवणाचे ताट जिथे ठेवले जाते तिथे स्वयंसेवक उभे असतात. ते ताटात टाकलेले अन्न संपवायची विनंती करतात किंवा ठराविक रक्कम दंड म्हणून भरायला सांगतात. नाशिकला झालेल्या साहित्य संमेलनात देखील हा प्रयोग केला गेला. तो राज्यभर गाजला. काही ठिकाणी दंड नसतो पण ताटातले अन्न संपल्याशिवाय ताट ठेऊ दिले जात नाही. अन्न वाया जाऊ नये एवढाच प्रयोगांमागचा उद्देश असतो. या प्रयत्नांना बळ देणे हे सामाजिक कर्तव्य आहेच पण अन्न हे पूर्णब्रह्म आहे हे मूल्य अंगी बाणवण्याची देखील आवश्यकता आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या