कौमार्य चाचणी अवैज्ञानिक; शेकडो कालबाह्य रुढींचे काय?

कौमार्य चाचणी अवैज्ञानिक; शेकडो कालबाह्य रुढींचे काय?

समाजावर आजही अंधश्रद्धांचा (Superstitions) पगडा आहे. अनेक जुनाट आणि कालबाह्य रुढी-परंपरांचे पालन केले जाते. मासिक पाळीशी संबंधित आणि कौमार्य चाचणी (Virginity testing) सारख्या काही रुढींचे स्वरुप महिलांच्या आत्मसन्मानावरच घाला घालणारे असते. अशा अनेक रुढी महिलांचा मनमोकळेपणानेे जगण्याचा हक्क नाकारतात.

जातपंचायतीच्या दहशतीचा त्रासही सर्वात जास्त महिलांनाच सहन करावा लागतो. जातपंचायतीने सुनावलेल्या शिक्षा महिलांना श्वास घेणेही मुश्किल व्हावे इतक्या भयानक असतात. रुढी आणि त्या पाळण्याचा आग्रह धरणार्या समाजाची नावे भलेही वेगवेगळी असतील पण महिलांना जगणे नकोसे व्हावे इतका रुढींचा फास त्यांच्याभोवती आवळलेला असतो. महिलांनीही त्या रुढी बिनतक्रार पाळाव्यात याकडेच समाजाचा कल आढळतो. कंजारभाट समाजात पाळली जाणारी कौमार्य चाचणी (Virginity testing) ही त्यापैकीच एक रुढी. जी आजही पाळली जाते. विवाहाच्या पहिल्या रात्री नववधूला (bride) या अपमानजनक रुढीला सामोरे जावे लागते. ही चाचणी अवैज्ञानिक असल्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने स्थापन केलेल्या तज्ञांच्या समितीने जाहीर केला आहे. ‘न्यायवैद्यकशास्त्रात या चाचणीचा उल्लेख आहे. तथापि अभ्यासक्रमातून या चाचणीचा उल्लेख काढून टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाने नुकताच घेतला आहे. आयोगाच्या निर्णयामुळे कौमार्य चाचणी विरोधात सुरु असलेला लढा बळकट होईल’ अशी अपेक्षा अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी व्यक्त केली आहे.

कंजारभाट समाजातीलच काही तरुण या प्रथेच्या विरोधात धीटपणे उभे ठाकले आहेत. त्यांनी ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’ (Stop the V Ritual) नावाचे अभियान सुरु केले आहे. या अभियानातील काही कार्यकर्त्यांना अनेकदा मानहाणीला सामोरे जावे लागते. काही कार्यकर्त्यांना मारहाण देखील झाली होती. तथापि अशा प्रत्येक प्रसंगानंतर आमचा लढण्याचा इरादा अधिक पक्का होतो अशी गांधीवादी भूमिका निर्धारपूर्वक स्वीकारल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. संबंधित समितीच्या निर्णयानंतर कौमार्य चाचणी (Virginity testing) अवैज्ञानिक असल्याचे वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना शिकवले जाईल अशी अपेक्षा करावी का? प्रश्न फक्त एका रुढीचा नाही. अशा अनेक कालबाह्य रुढींचा आहे. आजही समाज किती बुरसटलेल्या कल्पनांचा आग्रह धरतो हे परवा परवा पुन्हा एकदा स्पष्ट झाले. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका आश्रमशाळेत वृक्षारोपणाचा कार्यक्रम होता. मासिक पाळीचे कारण देत एका मुलीला झाड लावल्यास मनाई करण्यात आल्याचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले आहे. यातील सत्यासत्यता यथावकाश बाहेर येईलच. पण अनेक घरांमध्ये मासिक पाळी आलेल्या महिलांना कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊ दिले जात नाही आणि अनेक मंदीरात प्रवेशही नाकारला जातो ही वस्तुस्थिती आहे. आंतरजातीय किंवा जातीबाह्य विवाह केला म्हणून विवाहित जोडप्यांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकला जातो.

जात पंचायत त्यांना अमानुष शिक्षा करते याच्या बातम्या माध्यमात प्रसिद्ध होतच असतात. त्या कोण नाकारु शकेल? समाजातील तरुण पिढी हळूहळू अशा प्रथांविरोधात एल्गार पुकारु लागली आहे. त्यांच्यामागे समाजाने आपले पाठबळ उभे करायलाच हवे. माध्यमांचेही ते कर्तव्य आहे. ‘देशदूत’ हे ‘सामाजिक भान’ नेहमीच राखत आला आहे. केवळ कौमार्य चाचणीच नव्हे तर अशा अनेक कालबाह्य रुढींविरोधात ‘देशदूत’ने नेहमीच कालसुसंगत भूमिका घेतली आहे. ‘स्वतंत्र पत्रकारिता हा लोकशाहीचा कणा आहे. पत्रकार हे लोकांचे डोळे आणि कान आहेत. छापील मजकुरावर अद्यापही लोकांचा विश्वास आहे’ असे सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा यांनी नुकतेच म्हटले आहे.

समाजात घडणार्या अयोग्य गोष्टींविरोधात ठाम भूमिका घेऊन तो विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी माध्यमांची आहे. माध्यमे ती पार पाडतीलच. पण दुदैर्वाने असावी तितकी जागरुकता समाजात आढळत नाही. किंबहुना अनेकदा शासनकर्ते सुद्धा अशा प्रसंगी बोटचेपी भूमिका स्वीकारतात. तेव्हा कालबाह्य रुढी संपुष्टात आणण्यासाठी समाजाला कंबर कसावी लागेल याची खुणगाठ युवापिढीने मारलेली बरी.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com