ऑलिम्पिकमधील आगळा-वेगळा झगझगीत विश्वविक्रम!

ऑलिम्पिकमधील आगळा-वेगळा झगझगीत विश्वविक्रम!

नुकताच जागतिक मानवता दिवस साजरा झाला. मानवता हे मानवी जीवनातील सुसंस्कृतपणाचे उच्चतम मूल्य मानले जाते. या मूल्याची महती संतवांग्मयापासून आजतागायतच्या साहित्य, काव्य आदी सर्व शाखेत पिढ्यानपिढ्या गायिली जात आहे.

’मानवतेचे निशाण मिरवू महासागरात’ असे कुसुमाग्रजांनी म्हंटले तर ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ असे सांगणारे साने गुरुजी आपल्या वर्तणुकीतून मानवता धर्म जगले. विं.दा. करंदीकर यांनी ’घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावेत’ असे सांगून मानवतेचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला. मराठी मुलखातील संतांप्रमाणेच भारतातील सर्व भाषिक संतांनी मानवतेचे वर्णन वेगवेगळ्या शब्दात केले आहे.

पिढ्यानपिढ्या नवनवीन शब्दात केले जात आहे. याच मूल्याचा चमकदार आविष्कार पोलंडच्या एका खेळाडूने यंदाच्या ऑलिम्पिक खेळांच्या समारोपानंतर नुकताच घडवला. तिचे नाव मारिया आंद्रेयचक! Maria Andreychak नुकत्याच पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिने भालाफेकीत रौप्य पदक जिंकले. पोलंडमधील तिच्या परिचयातील एका आठ महिन्याच्या बाळाला गंभीर आजार आहे. त्यावरील उपचारांसाठी त्याच्या पालकांना लाखो रुपयांची गरज आहे. त्या बाळाच्या मदतीसाठी मारियाने तिने पटकावलेल्या रौप्य पदकाचा लिलाव केला.

त्या पदकाचा 93 लाखात लिलाव झाला. ती संपूर्ण रक्कम त्या बाळाच्या उपचार खर्चासाठी त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केली. लिलावात पदक विकत घेतलेल्या कंपनीनेही ते पदक मारियाला परत करून तिच्या उदात्त औदार्यावर गुणग्राहकतेची मोहोर उमटवली. बाळासाठी निधी संकलनाची मोहीम मारिया यापुढेही सुरु ठेवणार आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. स्वप्नपूर्तीसाठी ते जीवतोड मेहनत देखील घेत असतात. मारियाच्या यशाला तिच्या जिद्दीची आणि विजिगिषु वृत्तीची किनार आहे.

2018 मध्ये तिला हाडांचा कॅन्सर झाला होता. त्यावर मात करून ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाली होती. जीवघेण्या व्याधीवर मात करून जिंकलेल्या पदकाचा एका उदात्त हेतूने लिलाव करून तिने मानवतेचा आदर्श उभा केला. स्वतः घेतलेल्या दुर्धर आजाराचे दुःख एका दुर्दैवी बालकाच्या वाट्याला यावे याने तिचे मन किती हेलावले असेल हे तिच्या निर्णयावरून लक्षात येते. ऑलिम्पिकच्या पदकांना मानवी चेहरा देणारी आणि खिलाडू वृत्तीचा पुरस्कार करणारी आणखी एक घटना. भालाफेक स्पर्धेतील Javelin throwing दोन खेळाडूंना अंतिम विजयासाठी एक जादा संधी मिळत होती. पण ती एकट्याने स्वीकारणे त्या खेळाडूला योग्य वाटले नाही. म्हणून त्याने संबंधित पंच आणि सामनाधिकार्‍यांना एक आगळीवेगळी विनंती केली. समान गुण मिळालेल्या आम्हा दोघांना ते पदक विभागून मिळावे अशी विनंती केली.

संबंधितांनी सुद्धा ती विनंती मान्य करून तितकीच उदार दाद दिली. दोघेही सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. अर्थात या दोन घटनांची तुलना होणार नाही. मारियाच्या उदाहरणात उदात्त त्यागाचे दर्शन घडते तर दुसर्‍या घटनेत वैयक्तिक उदात्ततेचे! माणसाच्या व्यक्तिमत्वातील सुसंस्कृतता ही अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि कदाचित म्हणूनच मानवी उदात्ततेची उदाहरणे मोजकीच आढळतात.

ऑलिम्पिकमध्ये अनेक विश्वविक्रम घडतात. पुढेही होत राहातील. तथापि मारियाने घडवलेला सहृदयतेचा विश्वविक्रम ही टोकियो ऑलिम्पिकमधील दीर्घकाळ सन्समर्नीय व आदी अनेकांना प्रेरणादायी घटना ठरावी. कवी नीरज एका गाण्यात म्हणतात, बेचकर खुशियां, खरीदू आँख का पानी..बस यही अपराध मैं हरबार करता हूँ..आदमी हूँ आदमीसे प्यार करता हूँ’ त्याची प्रत्यक्ष अनुभूती यानिमित्ताने जगातील अनेक सहृदय मंडळींना आली असेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com