माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्यविधाते!

माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्यविधाते!

प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी, अंत:करणातील ओलावा, बांधिलकी ही मूल्ये माणसांना एकमेकांच्या जवळ आणतात. माणसांना त्यांच्यातील माणुसपणाची जाणीव करुन देतात. 'माणुसकीचे अभंग नाते, आम्हीच आमचे भाग्यविधाते' अशा शब्दात कवी वसंत बापट माणुसकीच्या नात्याचे वर्णन करतात. त्याच नात्याचा प्रत्यय आणून देणार्‍या घटना समाजात अधुनमधून घडत असतात. त्यापैकी बहुतेक घटनांची हकीगत समाजापर्यंत क्वचितच पोहोचते. तथापि ज्या हकीगती कळतात तेवढ्याने देखील सध्याच्या दुषित वातावरणातही माणुसकीबद्दलचा विश्वास पुन्हा जागवला जातो हे निश्चित.

नुकत्याच अशा तीन-चार घटना घडल्या. ज्या घटनांनी माणुसकीचे बंध बळकट केले. कितीही आव्हाने आली तरी हे बंध विसविशीत होणार नाहीत हा विश्वास मनामनात जागा करण्याचे काम याच घटना करतात. पहिली घटना पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावर घडली. वेळ रात्री दहा-साडेदहाची होती. लोणावळा-पुणे लोकल पुणे स्टेशनच्या दिशेने जात होती. रेल्वे चालकाला लोको शेडजवळ अचानक एका मुलीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी केबिनबाहेर डोकावून पाहिले. एक माणूस एका दहा-बारा वर्षाच्या मुलीचे तोंड दाबून तिला बळजबरीने लोकोशेडच्या दिशेने घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले. त्या चालकाने तातडीने ब्रेक दाबले आणि गाडी थांबताच खाली उडी मारली. दोन-तीन प्रवासीही त्यांच्या मागोमाग उतरले. त्यांनी त्या माणसाच्या दिशेने धाव घेतली.

लोक आल्याचे पाहून त्या माणसाने मुलीला सोडले आणि तो पळून गेला. चालकाने मुलीला लोकलच्या केबिनमध्ये बसवले आणि धीर दिला. त्या माणसाने रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन बळजबरीने उचलून आणल्याचे त्या मुलीने चालकाला सांगितल्याचे त्या संबंधीच्या प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे.

दुसरी घटना सातारा जिल्ह्यातील नागठाणे गावात घडली. उत्तरप्रदेशातील एक कुटुंब वर्षानुवर्षे याच गावात राहाते. हे कुटुंब नुकतेच त्यांच्या मुळ गावावरुन परत नागठाण्याला आले होते. त्यांच्याबरोबर एक 17 वर्षांची मुलगी देखील होती. ती तिच्या घरच्यांना न सांगता आली होती असे नंतर निष्पन्न झाले. तिला घरी परत जायचे होेते पण पैशाअभावी ते शक्य होत नव्हते. दोन अंगणवाडी सेविका एका सर्वेक्षणासाठी त्या कुटुंबाच्या घरी गेल्या होत्या. तेव्हा त्या मुलीने तिची रडकथा या दोघींना सांगितली.

प्रसंगावधान दाखवत त्या मुलीला गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीकडे त्या सेविका घेऊन गेल्या. पोलीसांनाही याची कल्पना दिली. या सर्वांच्या प्रयत्नांनी ती मुलगी तिच्याघरी सुखरुप परतली आहेत.

तिसर्‍या घटनेत लाईनमनच्या सतर्कतेमुळे इंद्रायणी एक्सप्रेसला अपघात झाला नाही. त्यामुळे शेकडोंची जीवितहानी टळली. कल्याणच्या पात्रीपुलाजवळील रेल्वेमार्गावर रुळाला तडा गेल्याचे लाईनमनच्या लक्षात आले. त्याच वेळी त्या मार्गावरुन इंद्रायणी एक्सप्रेस जाणार होती. हे लक्षात येताच लाईनमनने तातडीने त्या मार्गावर धाव घेतली आणि समोरुन येणार्‍या एक्सप्रेसला लाल सिग्नल दाखवला. त्यामुळे चालकाने एक्सप्रेस थांबवली आणि संभाव्य अपघात टळला.

चौथी घटना बंगळुरूत घडली. एका रुग्णावर तातडीची शस्त्रक्रिया करण्यासाठी एक डॉक्टर रुग्णालयात जाण्यासाठी निघाले होते. त्यांची गाडी वाहतूक जाममध्ये अडकली. रुग्णालयात पोहोचायला अनिश्चित उशीर होऊ शकतो हे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यांनी प्रसंगावधान दाखवले. गाडी चालकाकडे सोपवली आणि तब्बल तीन-साडेतीन किलोमीटर अंतर धावत जाऊन रुग्णालय गाठले. त्यानंतर शस्त्रक्रिया पार पडली आणि ती यशस्वी देखील झाल्याचे संबंधित वृत्तात म्हटले आहे.

खरे तर माणुसकी आणि आपुलकी ही माणसाची अंगभूत वैशिष्ट्ये. पण ती दूर्मिळ होत चालली आहेत. सद्यस्थितीत समाजात भेदाभेदाचे विष पेरले जात आहेत. क्षुल्लक कारणांसाठी माणसे एकमेकांचा जीव घेत आहेत. गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत आहे. हे वास्तव आहे पण कवी हिमांशू कुलकर्णी मात्र त्यांच्या कवितेतून माणसांना 'पणती जपून ठेवा' असा संदेश देतात. उपरोक्त घटनांमधील माणसे प्रत्यक्ष कृतीने त्या विश्वासाची ज्योत तेवत ठेवत आहेत. म्हणुनच कौतुकाला पात्र आहेत आणि समाजासमोरचा आदर्श ठरली आहेत. वरील सर्व घटना एकच मार्ग दाखवतात, 'पणती जपून ठेवा, अंधार फार झाला'

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com