Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखबाजारात तुरी...!

बाजारात तुरी…!

कुस्तीच्या फडात कुस्त्या सुरू व्हायला थोडाफार अवकाश असताना वातावरण निर्मितीसाठी हलगी वाजत असते. फडात उतरण्याची तयारीतील पहिलवानांना त्या आवाजाने स्फुरण चढते. मुंबई मनपा निवडणुकीचा आखाडा आतापासूनच हलग्यांच्या आवाजाने गर्जू लागला आहे.

मुंबई मनपाची मुदत संपायला व पुढची निवडणूक व्हायला अजून दीड वर्ष बाकी आहे. तरीही राज्यातील मजबूत विरोधी पक्षाच्या दमदार नेत्यांनी आताच मुंबई मनपा निवडणुकीचा फड जिंकण्यासाठी दंड थोपटायला आणि आरोळ्या ठोकायला सुरूवात केली आहे. ‘आमचे पहिलवान तेल लावून तयार आहेत, पण समोर कोणाचे आव्हानच नाही’ अशा गमजा गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीवेळी जाहीरपणे मारल्या गेल्या होत्या, पण बारामतीच्या वस्तादाने तत्कालीन सत्ताधार्‍यांना चांगलाच धोबीपछाड दिला.

- Advertisement -

आता तर एक-दोन नव्हे तर तीन-तीन पहिलवानांचे आव्हान विरोधकांपुढे उभे ठाकणार आहे. सगळ्यांनाच मुंबई ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे असे वाटते. त्या कोंबडीवर ताव मारायला सर्वच टपलेले असतात. गेले पाव शतक ती कोंबडी शिवसेनेचे खुराडे उबवत आहे. अन्य सर्व पक्ष त्यामुळे सतत बेचैन असतात. सध्या देशाच्या राजकारणात भाजप प्रभावी आहे. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असा सार्थ अभिमान बारगीरांपासून खासदारांपर्यंत पक्षाचे सगळेच कार्यकर्ते व्यक्त करतात. मुंबई मनपावर ‘शुद्ध भगवा’ फडकवण्याचा निर्धार राज्यातील ज्येष्ठ भाजप नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीरपणे व्यक्त केला. कदाचित तो शिवसेनेला डिवचण्यासाठीही असू शकेल. बिहार मोहिमेवरून परतल्यापासून त्यांचे मनोबल कमालीचे उंचावले असावे.

मुंबई मनपाची सत्ता ही शिवसेनेच्या राजकारणाचे आद्यपीठ आहे. म्हणून त्याबद्दल इतर कोणी वक्रदृष्टी ठेऊन आहे असे वाटले की तिकडे काणाडोळा करणे शिवसेनेला कधीच शक्य होत नाही. ते स्वाभाविकही आहे. गेल्या पाव शतकाहून अधिक काळ सत्तेचे वाटेकरी राहिलेल्या शिवसेनेबद्दल भाजपची आपुलकी फडणवीसांच्या बोलण्यात अधूनमधून व्यक्त होतच असते. वरचेवर त्यांच्याकडून दिली जाणारी ‘पुन्हा येणार-पुन्हा येणार’ ही घोषणा अजून तरी वल्गना ठरली आहे. म्हणून कदाचित मुंबई मनपा हे विशेष ‘लक्ष्य’ भाजप आणि खास करून ज्येष्ठ नेत्यांच्या नजरेपुढे असणारच! ‘कोणाचा भगवा शुद्ध ते मुंबईकरच ठरवतील. तुमच्या शंभर पिढ्या खाली उतरल्या तरी मुंबई मनपावरून शिवरायांचा भगवा कोणी खाली उतरवू शकणार नाही’ अशा शेलक्या शब्दांत खासदार संजय राऊत यांनी सुनावले आहे.

‘मुंबई मनपा शिवसेनेच्याच ताब्यात राहील. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठीशी असेपर्यंत भाजपचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही’ असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही लगावला आहे. शब्द फिरवल्याने राज्याची सत्ता हातून निसटली. आमदार, नेते आणि कार्यकर्ते सत्ताविरहामुळे व्याकुळणे स्वाभाविक आहे. ‘पुन्हा येणार’च्या गर्जना अद्याप तरी फुसक्याच ठरल्यामुळे कासाविशी वाढतच जाणार. भारतीय राजकारणाला नेतेमंडळींनी धंदेवाईक स्वरुप आणले आहे. दिवसेंदिवस त्या धंद्यातील बरकत प्रत्येक पक्ष आपापल्या परीने वाढवत आहे.

सत्ताधारी पक्ष त्याबाबतीत रामायणातील ‘वाली’ ठरणारच! विरोध कोणी करीत असले तरी विरोधकांचे निम्मे बळ विनासायास सत्ताधारी पक्षाकडे फिरकते. त्या जोरावरच विरोधकांच्या ताब्यातील उरली-सुरली सत्तास्थाने काबीज करण्याची महत्त्वाकांक्षा वाढत जाणेही स्वाभाविक आहे. कुत्सितपणे या प्रवृत्तीला सत्तालोलुपताही म्हटले जाते, पण त्यापासून राजकीय पक्ष कसे बाजूला होऊ शकणार? राजकारणातून पैसा आणि तोच पैसा वापरून सत्ता हे आता राजकारणाचे जागतिक सूत्र बनले असताना भारत किंवा मुंबई त्याला अपवाद कसा ठरणार? त्यासाठी मुंबईच्या तुरी आता बाजारात आणल्या गेल्या एवढे खरे!

- Advertisment -

ताज्या बातम्या