Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखशिक्षणाच्या बट्ट्याबोळाचे श्रेय नेमके कोणाला?

शिक्षणाच्या बट्ट्याबोळाचे श्रेय नेमके कोणाला?

करोनाची साथ आणि सक्तीच्या ‘टाळेबंदी’चे विपरीत परिणाम शासन-प्रशासनासह सर्व समाजाला भोगावे लागत आहेत. तथापि राज्यशासनाच्या शिक्षण खात्याला ‘करोना’ सर्वाधिक का बाधला याचा शासनाने नीट शोध घ्यायला हवा.

शाळा व शिक्षणसंस्था अजून सुरु नाहीत. विद्यार्थी या दीर्घ सुट्टीला घरी बसून वैतागले आहेत अशी घराघरातील प्रतिक्रिया आहे. एरवी सुट्टी विद्यार्थ्यांना कधी नको असते का? तथापि करोनानिर्मित सुट्टीमुळे मात्र सुट्टीचा तो आनंद विद्यार्थीवर्गात दिसत नाही. किंबहुना त्यांच्यापेक्षाही त्यांचे पालक सुट्टीच्या या अतिरेकाने अधिक चिंतीत आहेत. तरीही शिक्षण विभागातील सुट्टीचा माहोल मात्र संपायचे नाव घेत नाही. शिक्षण विभागाचे घोडे वरातीमागूनच धावत आहे. राज्यातील सर्व शाळांना कुलूप आहे. पण शैक्षणिक सत्र 15 जुन 2020 पासून सुरु झाल्याचे शिक्षण खात्याने आधीच जाहीर केले आहे. पण तसे लेखी आदेश दिले आहेत का? तसे कोणतेही आदेश शिक्षणसंस्थांना दिलेले नसल्याचे बोलले जाते. शैक्षिणक सत्र सुरु असणे म्हणजे काय याचा खुलासा शिक्षण खाते करेल का? राज्यात सुमारे एक लाखांपेक्षा जास्त शाळा असल्या तरी 7-8 महिने त्या बंदच आहेत. या शाळांमध्ये दोन कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. ते घरीच आहेत. सहामाही परीक्षा होणार आहेत की नाही याविषयी कोणतीही स्पष्टता नाही. दरवर्षी दहावी आणि बारावीला दरवर्षी साधारणपणे 35 ते 40 लाख मुले परीक्षेला पात्र ठरतात. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या आणि पालकांच्या दृष्टीने या परीक्षा महत्वाच्या मानल्या जातात. शिक्षण विभागाने या परीक्षांचे वेळापत्रक तयारच केलेले नाही असे बोलले जाते. शालेय शिक्षण विभागाने वार्षिक सुट्ट्यांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे परीक्षांचे वेळापत्रक तयार होऊ शकले नाही असा निराधार खुलासा काही अधिकारी खासगी गप्पांमध्ये व्यक्त करतांना आढळतात. सर्व स्तरावर असा नन्नाचा पाढा आहे. तरी शैक्षणिक सत्र मात्र सुरु आहे असे शिक्षण विभाग कशाच्या आधारावर जाहीर करतो हे जनतेला समजेल का? सक्तीच्या बंदच्या या काळात मुलांचे ऑनलाईन शिक्षण सुरु असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितले जाते. शिक्षण सुरु असले तरी मुलांचे शिकणे सुरु नाही ही वस्तुस्थिती जनतेपासून लपून राहिलेली नाही. शिक्षक काय शिकवतात ते कळत नाही, शिकवलेले नीट समजत नाही अशी तक्रार ऑनलाईन शिकवले जाणारे बारावीचे विद्यार्थी करत आहेत. बारावीचे वर्ष सुरु होऊन किमान चार महिने उलटले आहेत. दहावी आणि बारावीचे विद्यार्थी दरवषी या सुमाराला वार्षिक परीक्षेसाठी तयारी सुरु करतात. बारावीची पुस्तके आणि परीक्षेची पद्धत याच वर्षी बदलली आहे. या अभ्यासक्रमाचे आणि बदललेल्या परीक्षा पद्धतीचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्याची तयारी राज्य शिक्षण मंडळाने केली आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी शेवटी काही विषयांचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात झाली आहे. शैक्षणिक सत्र जर जून महिन्यात सुरु झाले तर बदललेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कसा शिकवायचा याचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्याची आठवण राज्य शिक्षण मंडळ आजवर कसे विसरले? शिक्षकांना आत्ता प्रशिक्षित केले तरी विदयार्थी शिकण्याच्या मूडमध्ये असतील की परीक्षेच्या तयारीच्या? शिक्षण विभागातही माणसेच काम करतात. माणसे चुकू शकतात. पण प्रशिक्षण वर्गाच्या तारखा कोणत्या माहितीच्या आधारावर कशा ठरवल्या? हे प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षा एकाच वेळी येत आहेत. काही विषयांचे प्रशिक्षण सुरु असल्याचे सांगितले जाते. एका विषयाचे प्रशिक्षन अवघ्या अडीच तासात उरकले असल्याची शिक्षकांची तक्रार आहे. गणित, विज्ञान आणि भाषेसारखे विषय वर्षभर कसे शिकवायचे हे अडीच तासात शिक्षकांना कळावे अशी शिक्षण विभागाची अपेक्षा आहे का? खुद्द शिक्षण विभागात वर्षाचे काम दोन-अडीच तासात आत्मसात करणारे किती विद्वान आढळतील? भारतीय प्रशासकीय परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कार्यक्षम अधिकाऱयांकडून तरी दोन तासात वर्षभराचा एखाद्या जबाबदारीचा उरक अपेक्षित असेल का? करोनाची साथ सुरु झाल्यावर लॉकडाऊन अनपेक्षितपणे सुरु झाला. तसे काही होईल याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे सर्वांचा गोंधळ उडाला हे समजण्यासारखे आहे. तथापि इतके दिवस शिक्षण खाते झोपले होते का? चार महिन्यानंतर का जागे झाले असावे की ठरलेले निर्णय अंमलात आले हे दाखवण्यासाठी ही सारी धडपड सुरु असावी? या प्रश्नांची उत्तरे जनतेला कोण देईल? शिक्षण विभागाच्या या विलंबित तालामुळे शिक्षक भांबावले नसतील तरच नवल. या गदारोळात विद्यार्थ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. त्यांची अवस्था मात्र ‘शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वातड कशी’ अशी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या