न्यायमूर्ती चपळगावकरांचे समयोचित मार्गदर्शन!

न्यायमूर्ती चपळगावकरांचे समयोचित मार्गदर्शन!

मराठी मुलखातील जनतेने बोध घ्यावा असे एक भाषण ऐकण्याची मेजवानी श्रोत्यांना बर्‍याच दिवसांनी मिळाली. निवृत्त न्यायमुर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने श्रोत्यांशी संवाद साधला. अलीकडच्या काळात उत्कृष्ट आणि अभ्यासू भाषणे दुर्मिळ झाली आहेत. निमित्त कोणतेही असो, भाषणांना राजकीय सभेचे स्वरूप कधी येते हे श्रोत्यांना कळेनासे झाले आहे. एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढणे व भेदाभेदाला प्रोत्साहन देणे हीच सध्याच्या भाषणांची काही वैशिष्ट्ये आढळतात. त्यातुन जनतेच्या पदरात नेमके काय पडते आणि लोकशिक्षण किती घडते हा संशोधनाचा विषय होऊ शकेल.

अर्थात यालाही काही अपवाद जरूर आहेत. संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे शब्द हेच कात्री आहेत याची जाणीव असलेले आणि अभ्यास करून बोलावे याची जाण असलेले वक्तेही महाराष्ट्राला लाभले आहेत. पण अशा भाषणांना श्रोतेही लाभत नाहीत ही खंत अनेक विचारवंत व्यक्त करतात. न्यायमूर्तींच्या भाषणाने मात्र उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. करोनामुळे लोकांपुढे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. बेरोजगारी वाढली आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकले नाही.

तथापि जनतेचे प्रश्न बाजूला सारून भलतेच मुद्दे उकरून काढण्यात नेतेमंडळी तरबेज झाली आहेत. लोकांचे लक्ष त्यांच्या प्रश्नांकडून दुसरीकडे वळवण्यात राजकारण्यांचा स्वार्थ असतो. पण जनतेने राजकारण्यांच्या स्वार्थी उद्योगाला हातभार लावू नये. महाराष्ट्र स्वतंत्रपणे विचार करण्याची शक्ती गमावून बसणार नाही याची सर्वानीच दक्षता घेण्याची गरज आहे असे आवाहन न्यायमूर्ती चपळगावकर यांनी उपस्थितांना केले. त्यांनी मांडलेल्या मुद्यांशी कोणीच असहमत होणार नाही. महागाई प्रचंड वाढली आहे.

पेट्रोल आणि गॅसच्या किमती सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. हजारो लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. शेतकरी आणि एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. शिक्षणाचा पुरता खेळखन्डोबा झाला आहे. या मुद्यांची दखल सध्या किती नेते घेताना दिसतात? जनतेची फिकीर किती नेत्यांना असावी? त्याउलट नको तेच मुद्दे सध्या धोपटले जात आहेत. याच वस्तुस्थितीकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न न्यायमूर्तीनी केला आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीचे अत्यंत कमी शब्दात समर्पक वर्णन त्यांनी केले आहे. हे एकप्रकारचे लोकशिक्षणच असते.

प्रभावी वक्तृत्व आणि चांगली भाषणे याला जुन्या पिढीने फार महत्व दिले. त्यामुळे महाराष्ट्रात याची फार मोठी परंपरा निर्माण झाली. देशपातळीवरचे नेतृत्व आणि वक्ते महाराष्ट्राने घडवले. सामाजिक क्षेत्रात महाराष्ट्राने देशात क्रांती घडवली. ही सर्वमान्य वस्तुस्थिती आहे. त्यात संतांचाही मोठा हातभार आहे. या पार्श्वभूमीवर चपळगावकरांच्या भाषणाकडे जनतेचे लक्ष वेधून घेण्याचा हा प्रयत्न आहे.

तरुण आणि शिक्षकांनी त्याचा जाणीवपूर्वक अभ्यास करण्याची गरज आहे. जनतेची दिशाभूल करण्याचे राजकारण्यांचे उद्योग सुरूच राहाणार आहेत. त्याला फशी पडायचे की नाही हे जनतेलाच ठरवावे लागणार आहे. आणि तरुणाईत तो विवेक जागा करण्याचे काम शिक्षकांना पार पाडावे लागेल. भविष्याची मदार तरुणाईवर आहे. शिक्षक देशाचे सुजाण नागरिक घडवतात. तथापि तरुणाईकडे त्या अर्थाने लक्ष देण्याची फुरसत कोणाकडे आहे? उलट समाजमाध्यमांच्या आधारे तरुणाईला भरकटवण्याचे अस्थानी उदयग सुरूच आहेत.

शिक्षण खाते सरकारी पद्धतीने काम करून परिस्थितीत भरच टाकत आहे. नाही रे वर्गातील विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचलेले नाही याची जाणीव किती नेत्यांना आहे? जुनी पिढी त्यांच्या वेळच्या शिक्षकांच्या आठवणी आजही विसरू शकत नाही. त्यातून मिळालेल्या संस्कारांचा वेळोवेळी आवर्जून कृतज्ञतेने उल्लेख करत असतात. आजही असे शिक्षक असतील यात शंका नाही. यावर न्यायमूर्तीनी प्रकाश टाकला आहे. त्यातील मर्म सर्वानी लक्षात घेण्याची गरज आहे.

राजकारणी नेतेमंडळी कितीही उच्चपदस्थ असली तरी तेही स्वार्थी राजकारणाला अपवाद नसतात असा जनतेचा आजवरचा अनुभव आहे. नेत्यांना त्यांचा राजकीय व्यवसाय चालवायचा असतो. मूल्याधिष्टित राजकारण करण्यात किती नेत्यांना रस असेल? त्याकडे जनतेचे लक्ष वेधले जाऊ नये यासाठी प्रयत्न होतच राहातील. नको त्या विषयांना महत्व येतच राहील.

अशा वेळी जनतेमधील विवेक जागवण्याचा प्रयत्न चपळगावकरांनी केला आहे. निर्भीड न्यायाधीश म्हणून त्यांचा राज्याला परिचय आहे. जनहितासाठी त्यांनी याआधीही अनेकदा राजकारण्यांना खडे बोल सुनावले आहेत. ते बोल अनुभवसिद्ध आहेत. त्याचा गांभीर्याने विचार सर्वानी केला पाहिजे. पण तसे खरेच घडेल का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com