Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखशाळा भरवण्याचा समयोचित निर्णय!

शाळा भरवण्याचा समयोचित निर्णय!

कोरोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यावर राज्यात शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाने नुकतेच सर्व्हेक्षण केले. त्यात ऐंशी टक्क्यांहून जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवायला होकार दिला. ग्रामीण भागातील पालकांनी शाळा सुरू व्हावी, असेच सुचवले आहे.

पालकांचा दृष्टिकोन लक्षात घेऊन ग्रामीण भागातील करोनामुक्त गावांत पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. त्यानुसार करोनाविषयक निर्बंध पाळून ग्रामीण भागात 15 जुलैपासून शाळा सुरू झाल्या आहेत. सुरू झालेल्या शाळा आणि विद्यार्थी उपस्थितीची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ‘ट्विट’ केली आहे. नाशिक, मुंबई, मुंबई मनपा, पालघर, रायगड, सातारा, नागपूर, परभणी आदी 8 जिल्हे वगळून इतर जिल्ह्यांत जवळपास 6 हजार शाळा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांची उपस्थिती चार लाखांहून जास्त आहे.

- Advertisement -

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 940 शाळा सुरू झाल्या. रत्नागिरी जिल्ह्यात मात्र अवघ्या चारच शाळा सुरू होऊ शकल्या. शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. ग्रामपंचायत ठराव तसेच शाळा आणि पालकांची संमती घेऊन शाळा सुरू करण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश आहेत. आजपासून नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सव्वा तीनशेहून जास्त शाळा सुरू होत आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्व्हेक्षणात सव्वा लाखांहून जास्त पालक सहभागी झाले. त्यातील 42 हजार पालकांनी शाळा सुरू करायला संमती दिली. विद्यार्थ्यांच्या येण्याने आजपासून शाळा गजबजणार आहेत

करोना रोखण्यासाठी केलेली टाळेबंदी, विविध निर्बंध तसेच संसर्ग धोका आदी कारणांमुळे बहुतेक शाळा दीर्घकाळ बंदच होत्या. ज्या शाळा सुरू होत्या त्या ‘ऑनलाईन’ होत्या. त्यातील बहुसंख्य शाळा शहरी भागातील होत्या. ‘ऑनलाईन’ शाळा भरवायला ग्रामीण भागात अनेक अडचणी आल्या. परिणामी शाळा बंदच ठेवाव्या लागल्या. तब्बल दीड वर्षांनंतर आता शाळा उघडल्या आहेत. उघडतील. करोनामुक्त गावे व शहरांचे प्रमाण हळूहळू वाढत जाईल, तसतशा तेथेही यथावकाश शाळा सुरू होतील. करोना भीतीने सगळेच जण घरात राहत होते. शिक्षकांकडून वर्गात जे शिक्षण मिळते त्याची सर ‘ऑनलाईन’ शिक्षणाला येत नसल्याचा अनुभव विद्यार्थी आणि पालकांना आला.

‘ऑनलाईन’ शिक्षणासाठी मोबाईल, लॅपटॉप, संगणकासारखी उपकरणे नाहीत, असे ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थी नाईलाजाने त्यापासून दूरच होते. शाळा केव्हा उघडणार? नवी पुस्तके कधी मिळणार? शाळेतील मित्र आणि शिक्षक कधी भेटणार? याची उत्सुकता त्यांना होती. शाळा उघडल्याने ते विद्यार्थी पुन्हा शिक्षण प्रवाहात आले आहेत. करोनाची संकटछाया राज्यात कायम असताना करोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय धाडसी आणि समयोचित आहे.

ज्या गावांत वा शहरांत शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत तेथील विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळाचालकांना या निर्णयाने प्रेरणा मिळू शकेल. ग्रामीण भागात करोना आटोक्यात येत असला तरी शहरी भागात संसर्ग अजून कायम आहे. सर्वतोपरी दक्षता घेऊन नियमांचे पालन केल्यास शहरी भागातील करोना संसर्ग संपुष्टात येईल. शहरातील शाळा सुरू करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.

‘करोनासोबत जगायला शिका’ असे जागतिक आरोग्य संघटनेने जगाला सांगितले आहे. तो संदेश ध्यानात घेऊन करोनाविषयक नियम पाळल्यास जनजीवन सुरळीत होऊ शकेल. सगळ्या अडचणींचा विचार करून वास्तवाच्या पातळीवर उभे राहण्यासाठी ग्रामपंचायती आणि पालकवर्गाने दुजोरा दिला. आपापल्या पाल्यांना शाळेत पाठवण्याची संमती पालकांनी दिली. त्यामुळे शाळा सुरू करण्याचा रखडलेला प्रश्न मार्गी लागू शकला. याच रितीने ज्या-ज्या गोष्टी वा व्यवहार अजून बंद आहेत त्यांचादेखील वास्तवाच्या पातळीवर विचार होईल, अशी अपेक्षा लोकांमध्ये वाढली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या