जगप्रसिद्ध भारतीय खेळाडूचा समयोचित सल्ला!

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar

ऑलिम्पिकचा समारोप होऊन 9-10 दिवस झाले आहेत. तरीही भारतीय खेळाडूंच्या विजयाने देशात विशेषतः तरुणाई आणि लहान मुलांमध्ये संचारलेला उत्साह कमी झालेला नाही. भारताच्या खेळाडूंनी पदकांबरोबरच लोकांची मनेही जिंकली आहेत.

नीरज चोप्राच्या सुवर्णपदकाने लोकांना भालाफेकीतही रस निर्माण झाला आहे. हॉकी सामन्यानंतर अनेक मुलांनी छोट्या काठ्यांच्या साहाय्याने गल्ली-बोळात हॉकी खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक नागरिकांनी विशेषतः हॉकी, थाळीफेक, भालाफेक, बॉक्सिंगचे सामने मध्यरात्री, पहाटे उठूनही पाहिले. कदाचीत इतक्या उत्साहाने दूरवर सुरु असलेले ऑलिंपिक सामने बघितले गेले असे पहिल्यांदाच घडले असावे.

मुलांमधील याच ऊर्जेचे आणि खेळाचे महत्च गांभीर्याने घ्यावे असा सल्ला भारतरत्न व ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी दिला आहे. भारत तरुणांचा देश म्हणून जगात ओळखला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. 10 ते 24 वर्षे वयोगटाची भारताची लोकसंख्या 35 कोटी असल्याचा निष्कर्ष या अहवालात नोंदवला गेला आहे. तथापि तरुणाई पुरेशी तंदुरुस्त नाही. लोक व्यायाम आणि खेळाला प्राधान्य देत नाहीत. लोकांनी ऑलिम्पिकमधील सामने पाहिले ही आनंदाची गोष्ट आहे. तथापि किती तरुण खेळाडूंच्या कामगिरीमधून प्रेरणा घेऊन एखादा खेळ खेळायला सुरुवात करतात असा प्रश्न तेंडुलकर यांनी विचारला आहे.

करोनामुळे सक्तीचे केलेले निर्बंध हळूहळू कमी केले जात आहेत. बाजारपेठेतील दुकाने आणि हॉटेल्स रात्री 10 पर्यंत उघडी ठेवली जात आहेत. खासगी आस्थापना आणि सरकारी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरु झाली आहेत. शाळा मात्र अजूनही सुरु झालेल्या नाहीत. गेले दीड वर्ष मुले शाळाबाह्य आहेत. कोणतीही परीक्षा न देता मुले पुढच्या इयत्तेत गेली आहेत. हीच पद्धत कदाचित पुढेही कायम राहील व विनासायास शालान्त परीक्षा उत्तीर्ण होता येईल अशीही आशा अनेकांना वाटू लागली असेल. पहिली ते बारावी पर्यंतचा 25 टक्के अभ्यास राज्य शासनाने कमी केला आहे. तरीही येत्या महिन्यात शाळा सुरु झाल्याच तर पूर्ण वर्षभराचा अभ्यास उर्वरित 8-9 महिन्यात संपवण्याचे आव्हान शाळा व्यवस्थापनासमोर आहे. या पार्श्वभूमीवर अभ्यास भरून काढण्यासाठी खेळाचे आणि व्यायामाचे तास कमी केले जाण्याची भीती भेडसावत असल्याचे तेंडूलकर यांनी म्हंटले आहे. खेळाचा समावेश अभ्यास म्हणून व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तेंडूलकर हे महान खेळाडू आहेत.

क्रिकेटमधील अनेक विश्वविक्रम त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांनी व्यक्त केलेली भीती त्यांच्या दृष्टिकोनातून रास्त आहे. तथापि असे होण्याला दुसरी बाजूही आहे. शाळांनी अभ्यास पूर्ण न करण्याला किती पालकांची तयारी असेल? अभ्यास न करता मुलांना फक्त खेळू देण्यास किती पालक तयार होतील? पालकच तयार नसतील तर अभ्यासक्रम पूर्ण करून घेण्यावर शाळा भर देणार असतील तर ते चूक ठरवता येईल का? स्पर्धेच्या युगात मुलांनी अभ्यासात मागे पडू नये अशीच बहुतेक पालकांची इच्छा असते. जिंकलेल्या खेळाडूंपैकी बहुतेक त्यांच्या वैयक्तिक जीवनातही उल्लेखनीय करियर करत आहेत.

त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन भारतातील मुलेही खेळू लागतील. तेव्हा सगळेच पदक विजेते झाले नाही तरी चांगले डॉक्टर, वकील, अभियंता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चांगला माणूस होतील याकडे तेंडुलकर यांनी शाळांचे आणि पालकांचे लक्ष वेधले आहे. देशात दर्जेदार खेळाडू तयार व्हायला हवेत. जागतिक स्पर्धांमधील पदकांची संख्या वाढायलाच हवी. ऑलिम्पिकमधील विजयाचा क्रीडा संस्कृती रुजवण्यासाठी उपयोग करून घेतला जायला हवा.

तेंडूलकरांचीही तीच इच्छा असणार. तथापि त्यासाठी या क्षेत्राशी संबंधीत सर्वानी एकत्र येऊन सरकारच्या क्रीडा विषयक धोरणाला योग्य स्वरूप दिशा देण्याची जबाबदारी पार पाडावयास हवी, ते कितपत शक्य होईल? सरकारला आपल्या कारभारामध्ये जाणत्या व कार्यक्षम लोकांचे मार्गदर्शन मानवते असे क्वचितच आढळते. तो अडथळा तेंडुलकरांसारख्यांच्या प्रभावाने तरी दूर होईल का?

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com