Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखअनुभवी प्रशासकीय अधिकार्‍यांचा समयोचित सल्ला!

अनुभवी प्रशासकीय अधिकार्‍यांचा समयोचित सल्ला!

शासनाच्या विविध विभागांमध्ये अमूक लाख पदे रिक्त आहेत आणि त्या पदांवर भरती केली जाणार असल्याचे वृत्त अधूुनमधुन माध्यमात प्रसिद्ध होत असते. क्वचित काही वेळा काही विभागांसाठी भरती प्रक्रियाही सुरु झाल्याच्या बातम्याही झळकतात. तथापि त्या बातम्या किती तथ्यपूर्ण असतात? सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी श्री. महेश झगडे (Senior Chartered Officer Shri. Mahesh fights) यांनी यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले आहे.

उपलब्ध शासकीय नोकर्‍या आणि त्यासाठी इच्छूक यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते. त्यामुळे भरती प्रक्रियेबरोबरच त्यातील गैरप्रकारही गाजू लागतात. आणि मग नंतर त्या भरतीचे पुढे काय होते हे किती इच्छूक सांगू शकतील? शासनाच्या अनेक पदांवर भरतीसाठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या सर्वच क्षमतांचा कस लागतो. अनेक विद्यार्थ्यांची परिस्थिती साधारण असते. पण तरीही असे विद्यार्थी व त्यांचे पालक प्रसंगी पोटाला चिमटा काढत स्पर्धा परीक्षेचे स्वप्न बघतात.

- Advertisement -

दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षा देतात. कष्टसाध्य यश मिळवल्यानंतरही त्यापैकी किती विद्यार्थ्यांना अपेक्षित नेमणूक मिळू शकते? नेमणुकीसाठी पात्र विद्यार्थी नेमणूकीच्या प्रतीक्षेत, असेही वृत्त माध्यमातच अनेकदा झळकते. त्यांना दीर्घकाळ प्रतीक्षेचा ताण सहन होत नाही. त्यातील अनेक जण नैराश्याने ग्रासले जातात. काही अत्यंत गरजू तरुण नको तो मार्ग चोखाळतात. पालकांच्या आयुष्यात कायमचा अंधार करुन निघून जातात. अशी दुर्दैवी घटना घडली की सामाजिक वातावरण ढवळून निघते. वादविवाद झडतात. सरकारही खडबडून जागे होते. मंत्रीमहोदय काहीतरी घोषणा करतात. नंतर सारे काही शांत होते आणि विद्यार्थी पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाच्या घाण्याला स्वत:ला जुंपून घेतात. ‘सध्या केवळ अडीच-पावणेतीन टक्के शासकीय नोकर्या शिल्लक राहिल्या आहेत. कालांतराने त्याही कमी कमी होत जाणार आहेत. तेव्हा विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांकडे करियरची पर्यायी योजना (‘प्लॅन बी’) म्हणून पाहावे’ असा अनुभवी सल्ला महेश झगडे यांनी दिला आहे.

तरुणाईला शासकीय नोकरीचेच आकर्षण का वाटते? कारण त्या नोकरीत मिळणार्या विविध सोयीसुविधा, निवृत्तीपर्यंतची नोकरीची हमी आणि निवृत्तीनंतरही आयुष्याच्या अखेरपर्यंत निवृत्तीवेतनाची शाश्वती, या आकर्षणांचा मोह तरुणाईला आकर्षित करत असतो. पण धोक्याचा लाल कंदील झगडे यांनी दाखवला आहे. झगडे यांच्यासारखा सल्ला याआधीही काही ज्येष्ठ अधिकार्यांनी दिला आहे. त्यातील मथितार्थ तरुणाई लक्षात घेईल का? शासकीय नोकर्यांच्या तुलनेत खासगी क्षेत्रात नोकरीच्या लाखो संधी उपलब्ध आहेत याकडे तरुणाईचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झगडे यांनी केला आहे. तथापि बहुतेकदा खासगी नोकर्या कौशल्याधारित असतात. कोणत्याही छोट्या मोठ्या व्यवसायासाठी काही विशिष्ट कौशल्य अपेक्षित असते.

विशिष्ट चवीचे पदार्थ खाण्यासाठी लोक शहराच्या कानाकोपर्यातील ठेल्यांवर गर्दी करतात. जुन्या वाड्यांची डागडुजी करणारी माणसे शहरात देखील दूर्मिळ झाली आहेत. घरीच फर्निचर तयार करुन घेण्याकडे बहुतेकांचा कल आढळतो. समाज संपन्न होत आहे तसतशा त्याच्या गरजाही बदलत आहेत व दिवसेदिवस वाढतही आहेत. समाजमाध्यमांनी तर नोकर्यांची नवनवी क्षेत्रे निर्माण केली आहेत. त्यातील कोणतेही कौशल्य आत्मसात केले तर परिस्थितीतून कदाचित मार्ग काढता येईल. ते करता करता शासकीय नोकरीच्या स्वप्नपूर्तीचेही प्रयत्न सुुरु ठेवता येतात. कोणी कितीही लंब्याचवड्या गप्पा मारल्या तरी शासकीय नोकर्या कमीच होत जाणार आहेत.

तेव्हा पारंपरिक शिक्षण घेता घेता तरुणाईने कौशल्यविकासावरही लक्ष केंद्रीत करावे हेच त्यांच्या फायद्याचे आहे. स्पर्धा परीक्षांच्या वाढत्या आकर्षणातून फक्त नैराश्य वाट्याला येण्याची शक्यता जास्त आहे असेच झगडे यांना सुचवायचे असावे. त्यांच्या म्हणण्याचे मर्म तरुणाईने लक्षात घेतले तर जीवनाची दिशा बदलणारा योग्य मार्ग त्यांना मिळू शकेल. पण तरुणाई सरकारी नोकरीच्या आकर्षक मोहातून बाहेर पडू शकेल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या