वेळ गेलेली नाही…!

jalgaon-digital
4 Min Read

गेल्या आठवड्यात गोदावरीच्या तटावरील पायर्‍यांमध्ये काही जिवंत जलस्त्रोत दिसले. खरं बघितलं तर नाशिकमध्ये असलेली गर्मी, उष्णता आणि वाढते तापमान बघता पर्यावरण बिघडलेले आहे हे दिसून येते. भूगर्भातीलदेखील पाणी कमी होत आहे असे अनेक पुरावे समोर येत असताना जिवंत जलस्त्रोत सापडणे ही आश्चर्यकारक घटना असल्यासारखे वाटते. मात्र, ही घटना गोदावरी नदीसाठी आनंदाचीच होय. गोदावरी नदीमध्ये अनेक जिवंत जलस्त्रोत आहेत हे वारंवार गोदावरीचे अभ्यासक सांगत आहेत.त्यांच्या या अहवालावरच कोर्टानेदेखील गोदावरीच्या तळाचे केलेले काँक्रिटीकरण काढावे हा आदेश दिला होता. मोठ्या लढ्यानंतर व प्रतीक्षेनंतर हे काँक्रीटीकरण काढायचे काम सुरू झाले खरे मात्र काही अंशी झाल्यावर ते थांबलेले दिसते. काँक्रीट काढल्यानंतरही नदीच्या तळाखाली जलस्त्रोत आहेत की नाही याची खातरजमा स्मार्ट सिटीने केली आणि बोअर घेतले गेले. अवघ्या 80 फुटावर पाणी लागले व ते सुद्धा 24 तास प्रवाहित राहिले. हा पुरावा कमी पडत होता की काय म्हणून निसर्गानेच तिचे जलस्त्रोत उघडे केले. गोदावरीची ही सत्यस्थिती सर्वसामान्यांना जरी समजली असली तरी ती स्मार्ट सिटी नामक गोदावरीची काळजी घेण्याचा आव आणणार्‍यांना समजेल की नाही, ही शंकाच आहे. एकीकडे काँक्रिटीकरण काढायचे आणि दुसरीकडे काँक्रीट ओतायचे असाच काही नित्यक्रम गोदावरीबाबत सध्या दिसतो. विविध काळात दानशूरांनी गोदावरीच्या तटी दगडी घाट बांधले. त्याला सुंदरसा आकार होता. मात्र एका कुंभमेळ्यात ते सगळे नाहीसे झाले आणि काँक्रीटचे साम्राज्य वाढले. नदीच्या तळाचे काँक्रीट काढायला खूप मोठा लढा उभारावा लागला. मात्र, त्याचा विसर पडलाय की काय? असेच चित्र सध्या दिसते. दगडी घाटांवर काँक्रीट आणि आता तो घाट स्मार्ट व्हावा यासाठी त्यावर चाललेला फरशांचा घाट हे सर्वसामान्यांना न समजणारे कोडे वाटते. ज्या फरशा बसवल्या जात आहेत त्या सहा इंच उंचीच्या आहेत. त्यावर पावसाळ्यात येणार्‍या पुराच्या पाण्याचा अंदाज आपण घेतला तर गोदावरीचा पूर हा सहा इंच आणखीन उंच वाढेल म्हणजेच ते पाणी गावात आणखीन शिरेल, हे साधे गणित सुद्धा फरशा लावणार्‍यांना समजले नसेल काय? निसर्गाशी माणसांनी खेळायचे ठरवले तर अनेक पद्धतीने खेळता येते आणि त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्याची आपली जीवनपद्धती. मी माझा माझ्यासाठी जगणारी ही जीवनपद्धती. नाशिकसारख्या थंड हवेच्या ठिकाणी वाढत असलेल्या तापमानावरूनदेखील हे सिद्ध होत आहे. कधी नव्हती एवढी गर्मी आणि उष्णता आपण सर्वांनीच यावर्षी अख्ख्या उत्तर महाराष्ट्राने अनुभवली. जे तापमानाचे झाले तेच पाण्याचे होणार हे विसरता कामा नये. कुठे अती दुष्काळ तर कुठे पूर ही परीस्थिती आपण सध्याच्या दिवसांमध्ये अनुभवतो. झाडे लावा यासाठी मोहिमा हाती घाव्या लागत आहेत. पाणी वाचवा ही गोष्ट सांगावी लागते, डोंगर पोखरू नका यासाठीदेखील लढा उभा करावा लागतोय, माती वाचवा ही मोहीमदेखील जगभरात हाती घ्यावी लागत आहे. ईशा फाउंडेशनचे श्री सद्गुरू जगभरात 27 देशांत मोटरसायकलवर फिरून माती वाचवाबाबत जनजागृती करत आहेत. सध्याची मातीची परिस्थिती बघता मातीचा कस कमी झालेला आढळतो. मातीतील कमी होणारी जैवविविधता कमी झाली तर माती पोषक राहणार नाही अर्थात ती उपजाऊ पण राहणार नाही. हा प्रश्न खरच गंभीर आहे. 2050 पर्यंत हे असेच चालत राहिले तर जगभरात अन्नासाठी युद्धदेखील आपल्याला बघावी लागतील. हा र्‍हास थांबवायचा असेल तर आपल्याला आत्ताच पावले उचलणे गरजेचे आहे.असे पाऊल उचलण्याचा छोटासा एक प्रयत्न देशदूत करीत आहे. दै.देशदूत व मविप्र संस्था दि. 11 जून 2022 रोजी श्री सद्गुरू यांचा माती वाचवा हा कार्यक्रम केटीएचएम कॉलेजच्या मैदानावर आयोजित करत आहे. आपली माती, गोदावरी, सह्याद्री, झाडे, शेती, प्राणी, पक्षी, जैवविविधता या सगळ्यांचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी होय. शासनाने यात पुढाकार घेऊन पर्यावरण व जीवनपद्धती शाश्वत होईल, यासाठी ठोस पावले उचलावीत. यात दूरदृष्टी निश्चित असावी ही अपेक्षा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *