Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखअभिनयाची चालती-बोलती पाठशाळा शांत झाली !

अभिनयाची चालती-बोलती पाठशाळा शांत झाली !

भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘आधारवड गेला’ अशीच चित्रपटसृष्टीशी संबंधित प्रत्येकाची भावना आहे. त्यांना अभिनयाची चालती-बोलती पाठशाळा म्हंटले जायचे.

प्रसिद्ध चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे त्यांना ‘मेथड अभिनेता’ म्हणत. ते का याचे अनेक किस्से सांगितले जातात. त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिका ते शब्दशः जगत. कोहिनूर या चित्रपटात त्यांना एका गाण्यात सतार वाजवण्याचा अभिनय करायचा होता. त्यासाठी त्यांनी उस्ताद अब्दूल हलीम जाफर खान यांच्याकडे सतार वाजवण्याचे प्रशिक्षण घेतले. सतार कशी पकडायची हे शिकण्यासाठी मी काही महिने घालवले होते अशी आठवण दिलीपकुमार यांनीच एका कार्यक्रमात सांगितली होती. नया दौर चित्रपटात त्यांनी टांगा चालवला आहे. त्याचेही प्रशिक्षण त्यांनी एका सामान्य टांगेवाल्याकडे घेतले होते. एका चित्रपटात वैजयंतीमाला यांच्याबरोबर नृत्य करण्यासाठी ते नृत्यही शिकले. त्यांची कारकीर्द गाजवण्यात अनेक सुमधुर गाण्यांचाही समावेश करावा लागेल.

- Advertisement -

प्रेक्षकांची संवाद साधायचे एक वेगळेच कसब त्यांच्याकडे होते. ‘जो लोग सच्चाई की कसम खाते है, जिंदगी उनके बडे कठीण इम्तहान लेती है’ , ‘मोहब्बत जो डरती है वो मोहब्बत नहीं..अय्याशी है गुनाह है|’ , ‘हालात, किस्मते, इन्सान और जिंदगी, वक्त के साथ साथ सब बदल जाता हैं’ या असे अनेक संवाद लकबींसहित रसिकांना तोंडपाठ आहेत. भूमिकेत शिरण्याच्या त्यांच्या या सवयीचा त्यांना खूप त्रास झाला होता असे सांगितले जाते.

सलग काही चित्रपटात दुःखी नायकाच्या भूमिका त्यांच्या वाट्याला आल्या. त्याही भूमिका ते समरसून जगले. पण त्याचमुळे त्यांना निराशेच्या विकाराचा सामना करावा लागला आणि त्यावर त्यांनी लंडनला जाऊन उपचार घेतले असे सांगितले जाते. १९४४ साली त्यांनी ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. ११९९८ सालचा ‘किला’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट होता.

१९४९ साली त्यांनी राजकपूर समवेत ‘अंदाज’मध्ये अभिनय केला आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. दीदार, देवदास, बाबूल, आन, गंगा और जमूना, नया दौर, मधुमती अशा ६० पेक्षा जास्त चित्रपटातून त्यांनी तब्बल पाच दशकांपेक्षा जास्त काळ रसिकांच्या मनावर राज्य केले. त्यांचे खरे नाव महमद युसूफखान होते. युसूफखान ते दिलीपकुमार हा त्यांच्या नावाचा प्रवास देविकाराणी यांच्यामुळे झाला. तो कसा, याचे लालित्यपूर्ण वर्णन त्यांनी त्यांचे आत्मचरित्र ‘द सबस्टन्स अँड शॅडो’ यात केले आहे. देविकाराणी बॉम्बे टॉकीजच्या मालक होत्या. युसफखान यांनी आपले नाव बदलावे अशी देविकाराणी यांची इच्छा होती. त्यांनीच दिलीपकुमार हे नाव सुचवले होते. वाडवडिलांनी ठेवलेले नाव बदलण्याची त्यांची तयारीच नव्हती. पण देविकाराणी यांनी त्यांना समजावले आणि दिलीपकुमार या नावाने त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

पाकिस्तानमधील पेशावर हे त्यांचे जन्मस्थळ. तथापि त्यांचे वडील लाला गुलाम सरवर हे आपल्या कुटुंबासहित मुंबईला आले. ते साल होते १९३०. नंतरच्या काळात कधीतरी वडिलांशी वाद झाला म्हणून त्यांनी घर सोडले. काम मिळत नाही तोपर्यंत घरी परत जायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. त्यांनी आपले ते शब्द खरे केले. त्यांच्या मैत्रीचेही अनेक किस्से सांगितले जातात. राज कपूर त्यांना ‘लाडे’ म्हणायचे.

ज्या दिवशी लग्न करशील त्या दिवशी मी गुढघ्यावर चालत तुझ्या घरी येईल असे वचन राजकपूर यांनी दिले होते आणि त्यांनी ते पाळले देखील. त्यांना पद्मविभूषण, दादासाहेब फाळके, फिल्मफेअर अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. पाकिस्तानने त्यांना ‘निशान-ए-इम्तिआज’ हा पुरस्कार प्रदान केला होता. काही काळ ते राज्यसभेचे खासदारही होते.

गेल्या काही वर्षात त्यांना अनेकदा उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. पण लढवय्या वृत्तीने त्यांनी आजारपणावर अनेकदा मात केली होती. तथापि काल-परवाच्या लढाईत मात्र काळाने त्यावर मात केली आणि दिलीपकुमार नावाची अभिनयाची चालती-बोलती पाठशाळा कायमची शांत झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या