सरकारी यंत्रणेच्या गलथानपणाचे दुर्दैवी बळी!

सरकारी यंत्रणेच्या गलथानपणाचे दुर्दैवी बळी!

शासकीय यंत्रणेबाबतच जनतेला वारंवार नकारात्मक अनुभव का येतात? लोकल्याणकारी लोकशाही राज्यात शासनकर्ते लोकांना उत्तरदायी असतात असे मानले जाते. लोकसेवा करण्याचे आश्वासन देऊन लोकप्रतिनिधी निवडून येतात. जनहिताला माणसे कमी पडू नयेत या सद्हेतूने (?) वेळोवेळी सरकारी भरती होतच असते.

शासकीय कर्मचार्यांची संख्या दरवर्षी सतत फुगतच आहेे. विविध महामंडळांवर नेत्यांच्या बगलबच्च्यांची वर्णी लावली जाते. तरीही कल्याण साधले गेले असा अनुभव जनतेला का येत नसावा? वारंवार जनहिताचा आणि अधूनमधून जनतेचाच बळी का जात असावा?

राज्यात सर्वत्र दिवाळी उत्साहात साजरी होत असताना नगर जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतीदक्षता विभाग आगीच्या तांडवात होरपळला. त्यात 10 रुग्णांचा हकनाक जीव गेला. ऐन दिवाळीत त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाची कुर्हाड कोसळली.

या घटनेनंतर सगळे काही सरकारी शिरस्त्याप्रमाणेच घडले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज घाईघाईने व्यक्त करण्यात आला. रीतीप्रमाणे मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची सरकारी मदत जाहीर झाली. दोषींना कडक शासन केले जाईल असे आश्वासन दिले गेले. चौकशी समितीही नेमली गेली. नेतेमंडळींनी पीडितांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी धावाधाव सुरु केली. यथावकाश काही दिवसांनी याचे सर्वांना विस्मरण होईल. जनतेच्या दुदैर्वाने पुन्हा अशी दुर्घटना घडली तर हेच सोपस्कार मागच्या पानावरून पुढे चालू राहातील. भंडारा जिल्हा रुग्णालय आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आग दुर्घटनेनंतरही हेच घडले होते. तथापि अशा दुर्घटनांमध्ये ज्यांचा हकनाक जीव गेला आणि त्यांच्या कुटुंबियांचा जीव वेदनेने होरपळला त्याची किंमत कशाने तरी होईल का?

घरातील माणूस जाण्याची भरपाई पैसे करतात का? रुग्णांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी विश्वासाने शासकीय आरोग्य यंत्रणेचा आधार घेतला हा त्यांचा दोष आहे का? आर्थिक परिस्थितीअभावी समाजाच्या फार मोठ्या हिश्श्याला शासकीय आरोग्य सेवेशिवाय पर्याय नाही हाही त्यांचाच दोष आहे का? याची किंमत त्यांनी प्रसंगी आपल्या जीवाचे मोल देऊन चुकवावी हा ही शासकीय शिरस्ताच बनला आहे का? राजकारण कोणत्या घटनेचे करावे आणि करु नये याचा विवेक कोणीच का दाखवू नये? आता सगळीकडून राजकीय पक्षांचे नेते नगरकडे धाव घेतील.

त्यांच्या भेटीच्या बातम्या झळकण्याची व्यवस्था आठवणीने केली जाईल. जनतेच्या दु:खावर राजकारणाची पोळी भाजण्याचा मोह कोणालाच टाळता येऊ नये का? चौकशी समितीने अहवाल दिला का? दोषींना शासन झाले का? अशा दुर्घटना वारंवार घडू नयेत यासाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत? अशा प्रश्नांचा पाठपुरावा करावा असे कोणालाही का वाटत नसावे? याला काय म्हणावे? जनतेचे दुदैर्व की यंत्रणेच्या अंगवळणी पडलेला गलथानपणा? जाहीर झालेल्या वृत्तामधून आगप्रतिबंधक उपाययोजनेबद्दलचा ( फायर ऑडीट) अहवाल सादर करण्यात आल्याचे प्रसिद्ध झाले आहे.

त्याबद्दल संबंधितांकडून दखल का घेतली गेली नाही? म्हणजे हा संबंधितांचा बेजबाबदार कामचुकारपणाच नव्हे का? रुग्णालयांच्या आगीच्या दुर्घटना हे मानवनिर्मित दुर्दैव आहे हे जाहीर झालेल्या घटनांवरुन स्पष्ट होते. ही परिस्थिती प्रगत महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार? इतरांच्या तुुलनेत आम्ही उजवे कसे हे सांगण्यात आणि त्याची शेखी मिरवण्यात सार्यांनीच धन्यता मानली. मानत आहेत.

त्याला कोणीही अपवाद नाही. अर्थात, महाराष्ट्राच्या सुधारकी बाण्याचा अभिमान वाटण्यात गैर काहीच नाही. आपापल्या राज्याची, तिथल्या परंपरांची आणि जीवनशैलीची शेखी सगळेच मिरवतात. तथापि मराठी मुलखाचा तो अभिमान पोकळ ठरु नये. सगळीच यंत्रणा आणि तिच्यातील माणसांचे काम करण्याचे तंत्र याची वरपासून खालपर्यंत बारकाईने छाननी करण्याची गरज आहे.

शासनकर्त्यांची आणि नेत्यांची भूमिका जनतेला दिलासा देण्यापर्यंतच मर्यादित राहू नये. उपाययोजना देखील आगीच्या वेगाने योजल्या जाव्यात. अशा घटना गांभिर्याने विचारात घेतल्या जातील आणि मराठी मुलखाचे नाक नेहमीच उंच ठेवले जाईल अशी अपेक्षा जनतेने करावी का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com