Tuesday, April 23, 2024
Homeअग्रलेखसाहित्य संमेलनाची अनिश्चितता संपली!

साहित्य संमेलनाची अनिश्चितता संपली!

नाशकात मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याची तिसरी संधी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने नाशिककरांना दिली. यापूर्वी नाशकात झालेली दोन संमेलने रसिकांच्या दृष्टीने अविस्मरणीय ठरली आहेत.

साहजिकच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिक आणि साहित्यप्रेमींमध्ये 94 व्या साहित्य संमेलनाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. संमेलन आयोजनाची तयारीही चालू होती. मध्यंतरीच्या काळात करोना संसर्ग नियंत्रणात आला होता. त्यामुळे राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा आणि करोना योद्धांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. मात्र ‘करोना’ने पुन्हा डोके वर काढल्याने संमेलनाचे आयोजक चिंताग्रस्त होते.

- Advertisement -

नाशिकमध्येही ‘करोना’ जोर करीत आहे. त्यामुळे नाशकात होऊ घातलेल्या साहित्य संमेलनावर अनिश्चिततेचे ढग जमू लागले होते. करोना बळावत असताना संमेलन होणार का? होणार असेल तर कशा तर्हेने? अशी कुजबुज आणि चर्चा सर्वत्र सुरू होती. त्याबद्दल ठोस उत्तर कोणाकडूनही मिळत नव्हते. स्वागताध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ स्वत: करोनाबाधित झाले. त्यामुळे होऊ घातलेल्या संमेलनावरसुद्धा करोनाची छाया वाढली. भुजबळांच्या संपर्कात आल्याने संमेलनाचे अनेक पदाधिकारी आणि समित्यांच्या सदस्यांत काहीशी अस्वस्थता निर्माण झाली होती.

परिणामी संमेलन तोंडावर असताना सभामंडप उभारणी, निमंत्रण पत्रिकांसह इतर महत्त्वाच्या कामांना गती तरी कशी दिसावी? अशा वेळी अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या उपस्थितीत काल साहित्य महामंडळाची बैठक औरंगाबादमध्ये झाली. करोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नाशिकचे साहित्य संमेलन तूर्त स्थगित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ठाले-पाटील यांनी या निर्णयाची माहिती माध्यमांना दिली. संसर्ग ओसरला व परिस्थिती सुधारली, असे निश्चित दिसू लागले तर संमेलन मे महिन्यात घेण्यास परवानगी देण्याबाबत सूतोवाचही केले आहेत. ठाले-पाटलांच्या घोषणेनंतर नाशिकच्या संमेलनाबाबतचा संभ्रम आता दूर झाला आहे. करोना उद्रेक पुन्हा होऊ लागल्याने राज्य सरकारने जिल्ह्या-जिल्ह्यांत परिस्थितीचे अवलोकन करून त्या-त्या ठिकाणचे निर्बंध पुन्हा कडक केले आहेत. कोणत्याही कार्यक्रमांना 50 पेक्षा जास्त लोकांची गर्दी होऊ नये याबाबत स्पष्ट निर्देश दिले गेले आहेत. त्यांची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

नियमभंग करणार्यांविरुद्ध दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई सुरू आहे. साहित्य संमेलन म्हटल्यावर साहित्यिक आणि साहित्यप्रेमींची गर्दी अटळ होती. त्या गर्दीच्या आरोग्य सुरक्षेची जोखीम मोठी होती. कार्यक्रमांना उपस्थितांच्या संख्येबाबत मर्यादा असताना संमेलन आयोजित करणे अशक्य होते. राज्य आणि देशाच्या विविध भागांतून साहित्यिक व साहित्य रसिक येणार असल्याने संमेलनस्थळी करोनाचा धोका वाढण्याची दाट शक्यता होती. या सगळ्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नाशिकचे साहित्य संमेलन तूर्त स्थगित करण्याचा साहित्य महामंडळाने घेतलेला निर्णय जबाबदारीचे भान राखणारा आहे व नाशिकच्या आयोजकांना धीर देणारा आहे. संमेलन स्थगित झाल्याने तमाम मराठी साहित्य रसिकांचा तूर्तास थोडासा हिरमोड होईल. तथापि राज्यावर पुन्हा आक्रमण करू पाहणारे करोनाचे संकट लक्षात घेता संमेलन स्थगितीचा निर्णय सगळ्यांनाच योग्य वाटेल. संमेलन स्थगित झाले आहे. ते रद्द झालेले नाही.

करोनाचा धोका टळल्यानंतर संमेलन आयोजनाची नाशिकला पुन्हा संधी देण्याबाबत साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी तयारी दर्शवली आहे. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील साहित्यिक आणि साहित्यप्रेमींची उमेद टिकून राहावी, असा दिलासाही महामंडळाने दिला आहे. साहित्य महामंडळाच्या या निर्णयाचे स्वागत करताना पुढील काळात अधिक उत्साहाने साहित्य संमेलन चांगल्या रितीने पार पाडून यशस्वी करण्याची संधी नाशिकलाच मिळेल, अशी अपेक्षा करूया!

- Advertisment -

ताज्या बातम्या