बदलांच्या कासवाचा वेग वाढण्याची गरज!

बदलांच्या कासवाचा वेग वाढण्याची गरज!

स्त्री-पुरुष समानता हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. ही विषमता संपुष्टात आली पाहिजे. समाजात स्त्री-पुरुष समानता असली पाहिजे. महिलांना बरोबरीचे स्थान दिले पाहिजे. अशी महिलांची बाजू मांडणारी मते चर्चेत हिरीरीने मांडली जातात.

चर्चेत सहभागी झालेले सर्वजण तात्विक दृष्ट्या या समानतेबद्दल सहमत असतात. तथापि वास्तव वेगळे आहे. अनेक कालबाह्य रूढी आणि परंपरांच्या जोखडाखाली महिला वर्षानुवर्षे दबलेल्या आहेत. त्यांची घुसमट पिढ्यानपिढ्या चालूच आहे. रूढींना विरोध करण्याची त्यांना परवानगी नसते. घुसमट त्यांनी चुपचाप सहन करावी अशी समाजाची अपेक्षा असते. ज्या असे करतात त्यांना गृहकर्तव्यदक्ष अशी उपाधी बहाल केली जाते. ज्या विरोध करण्याचा प्रयत्न करतात त्यांना सरसकट उच्छृंखल व अतिशहाण्या ठरवले जाते.

टोमणे मारून त्यांना नामोहरम करण्याचे प्रयत्न अदयाप थांबू शकलेले नाहीत. महिलांना फक्त मारच खावा लागतो का? घरच्यांचा जाचच सहन करावा लागतो का? घरी-दारी त्यांनी फक्त ‘होयबा’ म्हणून वावरावे एवढीच अपेक्षा असते का? अन्यायाची परिभाषा इथेच संपत नाही. कोणत्याही कारणावरून समाजात जेव्हा भांडण होते तेव्हा महिलांचा उल्लेख करूनच शिव्या दिल्या जातात. घरात किंवा समाजात थोडे जरी वावगे घडले तर त्याचा दोष महिलांनाच दिला जातो.

विधवांनी कोणत्याही शुभकार्यात सहभागी होऊ नये, हळदी कुंकवाच्या समारंभाला त्यांना बोलावू नये किंवा त्यांनी जाऊ नये, वडसावित्री पोर्णिमेसारखे महिलांचे कोणतेही सण त्यांनी साजरे करू नये अशी रूढी आजही सर्वत्र पाळली जाते. जळी-स्थळी महिलांना गृहीत धरण्याची मानसिकता किती खोलवर रुजली आहे हे यावरून लक्षात येते. तथापि काळ मुंगीच्या गतीने बदलत आहे. महिलाही कालबाह्य रूढी आणि परंपरांविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता काही महिला देखील धीट होत आहेत. सामाजिक बदलांची सुरुवात स्वतःपासून आणि घरापासून केली पाहिजे हे त्यांना हळूहळू पटत आहे. अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो असे म्हटले जाते.

याची जाणीव महिलांना होऊ लागली आहे. काही महिला स्वयंस्फूर्तीने कालबाह्य किंवा अतार्किक रूढी बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. अकोला शहरातील विधवा आणि घटस्फोटित महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. पूजेनंतर एकमेकींना हळद-कुंकूही लावले. यावेळी महिलांना अश्रू आवरले नाहीत. यासाठी श्री विकास सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला. ‘पती निधनानंतर देखील मी वटपौर्णिमेच्या पूजेत खंड पडू दिला नाही.

सार्वजनिक ठिकाणी वडाची पूजा केली. माझ्यासारख्या इतर महिलांनाही हा सन्मान मिळावा यासाठी यंदा सार्वजनिक उपक्रम हाती घेतला होता’ असे या संस्थेच्या अध्यक्षा वैष्णवी दातकर यांनी माध्यमांना सांगितले. कंजारभाट समाजात विवाहित नववधूची कौमार्य चाचणी करण्याची प्रथा आहे. त्याविरोधात विवेक आणि रुपाली तमायचीकर यांनी आवाज उठवला आहे. रूपा कुलकर्णी यांनी रोजंदारी, शेतमजूर, घरेलू कामगार महिलांचे संघटन उभे केले. महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे असावीत यासाठी अनेक महिला संघटनानी एकत्र आवाज उठवला. अशा बदलांना समाजही हळूहळू स्वीकारू लागला आहे.

अशा प्रयत्नांना ठळकपणे प्रसिद्धी दिली जात आहे हेही त्या बदलाचेच निदर्शक आहे. समाजाची मानसिकता बदलणे सोपे नसते. सामाजिक बदलांची प्रक्रिया कासवाच्या गतीने चालते. त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवावे लागतील. महिलांसंदर्भातील बदलांची लढाई दिर्घकाळ चालेल आणि समाजातील सर्व घटकांना बरोबर घेऊनच ती लढावी लागेल याची जाणीव बदलाचे प्रयत्न करणारांनी लक्षात घेणे हितकारक आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com