म्हातारी मेल्याच्या दु:खापेक्षा काळ सोकावल्याचे दु:खच मोठे

म्हातारी मेल्याच्या दु:खापेक्षा काळ सोकावल्याचे दु:खच मोठे

जगातील प्रत्येक गोष्ट वा घटनेचा चांगले किंवा वाईट या दोन अंगांनी विचार केला जातो. समाजात चांगलेही बरेच काही घडते. त्यात्यावेळी त्याची नोंदही घेतली जाते. नव्हे, तशी ती घेतली जायलाच हवी. समाजासमोर आदर्श उभे करण्याची जबाबदारी माध्यमांची देखील आहे आणि माध्यमे ती वेळोवेळी पार पाडतही असतात. तथापि काहीवेळा समाजात अशा काही घटना घडतात ज्या हतबुद्ध करणार्‍या असतात. माणुसकी व माणसाच्या संवेदनशीलतेवरचा विश्वास उडवणार्‍या असतात.

मात्र या संवेदनशीलतेची चिंताजनक कमतरता सध्या आढळते ती सरकारी यंत्रणेशी संबंधित असलेल्या माणसांमध्ये! भारत ‘विश्वगुरु’होत असल्याचे गाजर सध्या वेळोवेळी दाखवले जात आहे. त्यासाठी भारतीय संस्कृतीने जगाला दिलेल्या सांस्कृतिक मूल्यांचा हवाला दिला जातो. पण विश्वगुरुत्वाच्या पायरीला स्पर्श करण्याइतपत तरी त्या मूल्यांची बुज भारतीयांच्या जीवनात सध्या आढळते का? याची खात्री पटावी अशा काही घटना घडतात आणि संवेदनशील मनांना विषण्ण करतात. नंदूरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात नुकतीच घडलेली घटना त्यापैकीच एक. नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात ‘खडक्या’ गावच्या परिसरातील एका महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला होता.

महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. अत्याचार झाल्यानंतर मुलीने फोन करुन तशी माहिती दिल्याचेही वडिलांचे म्हणणे होते. यासंबंधीचे वृत्त माध्यमात प्रसिद्ध झाले होते. स्थानिक पोलीसांनी शवविच्छेदनाचे आदेश दिले होते. तथापि शवविच्छेदन करताना बलात्काराच्या तक्रारीशी संबंधित कुठलीही तपासणी झाली नसल्याचा आरोप तरुणीच्या वडिलांनी केला. पोलीसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवल्याची तक्रारही केली. मुलीला न्याय मिळावा म्हणून मुलीचा मृतदेह तब्बल 45 दिवस मीठाच्या ढिगात झाकून ठेवला.

प्रसारमाध्यमांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. या. घटनाक्रमामुळे यंत्रणेची धावपळ उडाली. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले गेले. कुटुंबियांच्या मागणीची दखल घेऊन मुलीचा मृतदेह पुन्हा एकदा शवविच्छेदन करण्यासाठी मुंबईच्या जे.जे.रुग्णालयात पाठवण्यात आला. पण शवविच्छेदनासाठी आवश्यक त्या कागदपत्रांअभावी नियोजित दिवशी शवविच्छेदन होऊ शकले नाही. तरुणीवर बलात्कार झाला का? तिच्या कुटुंबियांची तक्रार खरी होती का? हे तपासाअंती निष्पन्न  होईल. पण बलात्काराच्या तक्रारीसारख्या या गंभीर घटनेत देखील सरकारी पातळीवर माणुसकीची वागणूक वाट्याला येऊ नये का?

तरुणीचा मृतदेह 1 ऑगस्ट 2022 रोजी सापडला होता. आज 17 सप्टेंबर 2022. न्यायासाठी दीड महिना पोटच्या गोळ्याचा मृतदेह मीठात झाकून ठेवणार्‍या तिच्या आईवडिलांची मनस्थिती काय झाली असेल? दोन घास तरी त्यांच्या घशाखाली  याकाळात उतरले असतील का? प्रसारमाध्यमांमध्ये या घटनेचा गवगवा झाला नसता तर हे प्रकरण धसास तरी लावले गेले असते का? अशा घटना सामाजिक वातावरणावर विपरित परिणाम करतात इतकेही पोलीसांच्या लक्षात का येऊ नये? तरुणीच्या मृत्यूनंतर दीड महिन्यांनी देखील शवविच्छेदनासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता का झाली नसेल? ही फक्त प्रशासकीय दप्तर दिरंगाई मानली जाऊ शकेल का?

या प्रकरणाच्या तपासात आवश्यक असलेल्या संवेदनशीलतेचा सर्वस्वी अभाव जाणवतो. ‘म्हातारी मेल्याचे दु:ख नसते, पण काळ मात्र सोकावतो’ही म्हण रुढ आहे. तथापि या विशिष्ट घटनेमध्ये म्हातारी मेलीच आहे पण काळही सोकावला आहे. अशा घटना समाजाचा यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत करतात. अशा घटना घडल्या की शक्ती कायद्याचा दाखला दिला जातो. बलात्काराच्या गुन्हयात फाशी आणि अ‍ॅसिड हल्ला करणार्‍यांना 15 वर्षांचा कारावास अशा शिक्षेच्या कडक तरतुदी या कायद्यात असल्याचे सांगून पांडित्य प्रदर्शन करण्यात धन्यता मानली जाते.

तथापि या कलमांची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती खटल्यात झालेली असेल? याचा खुलासा संबंधित मंडळी करु शकतील का? शिवाय महिलांवर अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी केवळ कायदे फारसे पुरेसे ठरत नाहीत हा आजवरचा अनुभव यंत्रणेला माहित नसावा का? तसे असते तर न्यायासाठी मुलीचा मृतदेह सांभाळण्याची वेळ एका बापावर आली नसती. अशा घटनांची दखल अगदी तातडीनेच घ्यावी लागेल. कोणत्याही सबबीखाली त्यात विलंब होऊ नये याची जाणीव यंत्रणेला कधी होणार? 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com