कार्यकर्ते घडवण्याला समाजाने आणि सरकारने प्राधान्य द्यावे!

कार्यकर्ते घडवण्याला समाजाने आणि सरकारने प्राधान्य द्यावे!

सामाजिक परिवर्तन ही कासवाच्या गतीने पण निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत प्रामाणिकपणे काम करणार्‍या सामाजिक संस्था आणि निरलस वृत्तीचे कार्यकर्ते कळीची भूमिका बजावतात. ते त्यांच्या ध्येयापासून न ढळता निरपेक्ष वृत्तीने ध्येयसिद्धीच्या दिशेने वर्षानुवर्षे प्रयत्न करत राहातात. समाजपरिवर्तनाचा हा जगन्नाथाचा रथ निरलस वृत्तीने काम करणार्‍या कार्यकर्त्यांच्या भरवशावरच आजवर हाकला जात आहे. पुढेही अशा कार्यांची मदार ध्येयनिष्ठ निरपेक्ष कार्यकर्त्यांवरचर आधारलेली असेल. तेच खर्‍या अर्थाने परिवर्तनाचे आधारस्तंभ मानले जातात. कार्यकर्त्यांचे अथक परिश्रमच संस्थेला उद्दिष्टपूर्तीच्या दिशेने आणि समाजाला बदलाच्या दिशेने घेऊन जातात. आणि तेच सध्याचे मोठे दुखणे बनले आहे. दिवसेदिवस सामाजिक संस्थांची संख्या गतीने वाढत आहे. पण त्यांचा कारभार हाकणार्‍या आणि लोकांमध्ये मिळूनमिसळून काम करणार्‍या प्रशिक्षित कार्यकर्त्यांची उणीवही मोठ्ठ्या प्रमाणात जाणवत आहे. यावर मात करण्यासाठी डॉ. अभय बंग यांची ‘सर्च’संस्था आणि गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठ यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. विद्यापीठांतर्गत ‘स्पार्क’ नावाचा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु केला आहे. हा अभ्यासक्रम विशेषत: दारु आणि तंबाखुमुक्तीसाठी काम करु इच्छिणार्‍या युवक-युवतींसाठी चालवला जाणार आहे. या कामासाठी अहिंसक सामाजिक आधार कसा घ्यावा, ग्रामीण व आदिवासी लोकांचे संघटन कसे करावे, समुदायात आरोग्यशिक्षण काय आणि कसे द्यावे, प्रशासनाचे सहकार्य आणि प्रसारमाध्यमांची मदत कशी मिळवावी आणि व्यसनांवर उपचार कसे करावेत याचे धडे या अभ्यासक्रमांतर्गत दिले जातील. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्याला ताालुक्याच्या ठिकाणी राहून वर्षभर किमान 100 गावात काम करावे लागेल. डॉ.अभय आणि डॉ.राणी बंग यांचा कार्यकर्ता घडवण्याचा अनुभव मोठा आहे. निरलस कार्यकर्त्यांची समाजाला उणीव जाणवणार आहे याची जाणीव त्यांना फार पूर्वीच झाली होती. ही कमतरता भरुन काढण्यासाठी त्यांनी त्यांच्या संस्थेत 2006 पासुनच कार्यक्रम सुरु केला. कार्यकर्ता घडवणारा ‘निर्माण’ नावाचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाने असंख्य कार्यकर्ते आजवर घडवले आहेत. ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी आपापल्या परीने कुठल्या न कुठल्या विधायक कार्याची धुरा वाहात आहेत. डॉ.बंग दांपत्याचा तोच अनुभव आता गोंडवाना विद्यापीठाला उपयोगी पडणार आहे. वास्तविक अशा सामाजिक उपक्रमांना मदत करणे ही प्रामुख्याने सरकारची जबाबदारी आहे. पण सध्या सरकारी कामाच्या पद्धतीत ‘रात्र थोडी आणि सोंगे फार’ अशी अवस्था विविध योजना जाहीर करुन झालेली आहे. त्यामुळे सरकारी मदतीचे नाऊमेद करणारे अनुभव लोक रोजच घेतात. सरकारी मदत म्हटले की लोकच एक पाऊल मागे घेतात. कारण सरकारी मदत चिमुटभर आणि त्यासाठी दाखल करावी लागणारी कागदपत्रे मात्र गाडीभर अशीच योजनांची अवस्था आहे. उदाहरणार्थ, एखाद्या दाखल्यासाठी किती प्रकारची कागदपत्रे अर्जाला जोडावी लागतात हे लोकांना एकदाच फार क्वचितच सांगितले जाते. किंबहुना तसे न करता पुन्हा पुन्हा एकाच कामासाठी वारंवार नागरिकांना हेलपाटे मारायला लावल्याशिवाय सरकारी सेवकांचे काम अधिकार्‍यांनाही मान्य होत नसावे. त्यामुळेच चांगल्या कामांना सरकार दरबारी नेहमीच खो घातला जातो असा जनतेचा अनुभव आहे. त्याऐवजी समाजोपयोगी कामे कुठे कुठे सुरु आहेत याचा सरकारने शोध घ्यावा. त्याकामांमागे पाठबळ उभे करावे. परस्पर सहकार्याचा कार्यक्रम हाती घ्यावा. या अपेक्षेवर सरकारने लक्ष केंद्रीत केले वर्षानुवर्षे रेंगाळणारी विकास कामे सध्यापेक्षा कितीतरी कमी वेळात पुर्ण होऊ शकतील. अर्थात सरकारी कामातही त्या हेतूला प्राधान्य असेल तरच!

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com