निकाल कौतुकास्पद, पण गुणांचे आकडे शंकास्पद!

निकाल कौतुकास्पद, पण गुणांचे आकडे शंकास्पद!
Result

हाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाकडून दरवर्षी घेतल्या जाणार्‍या दहावी, बारावी परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण टप्पे आहेत. या परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील उच्चशिक्षणाची दारे खुली होतात. आठवडाभरापूर्वी बारावी परीक्षा निकाल लागला. त्यानंतर परवा दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. परीक्षा मंडळाने पत्रकार परिषद घेऊन निकालाविषयी माहिती दिली. टक्केवारीनुसार कोकण विभागाने राज्यात यंदाही अव्वल स्थान पटकावले. नाशिक, पुणे, मुंबई विभागांनीसुद्धा 95 टक्क्यांच्या वर मजल गाठली. निकालाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे उत्तीर्ण होण्यात नेहमीप्रमाणे चालू वर्षीही मुलींनीच बाजी मारली. उत्तीर्ण होण्यासोबत गुणांची कमाई करण्यात मुले काहीशी मागे पडली आहेत. वंशाच्या दिव्याबाबत आग्रही भूमिका घेणारी रूढीप्रिय माणसे समाजात अजूनही असली तरी कोणत्याही परीक्षेत अथवा स्पर्धेत आम्ही कुठेही कमी नाही ही बाब मुलींनी दहावी परीक्षेत पुन्हा सिद्ध केली आहे. मुलींना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कमी लेखणार्‍या रूढी-परंपरावाद्यांना मुलींचे यश जोरदार धक्का देणारे आहे. दहावी-बारावी तसेच अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये मुले का मागे पडत आहेत? हा प्रश्‍न गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. त्यामागची कारणेही शोधण्याची गरज आहे. मुलगा-मुलगी समान मानण्याच्या काळात मुलांची सतत पीछेहाट व्हावी ही बाब दुर्लक्षिण्याजोगी नाही. गुणवत्तेत मुलीच सरस ठरणार असतील तर सगळे कारभार मुलींकडेच सोपवले जावेत, अशीसुद्धा मागणी पुढे येऊ शकेल. परीक्षेत 122 विद्यार्थ्यांना शंभरपैकी शंभर गुण देण्याची किमया परीक्षा मंडळाने केली. पैकीच्या पैकी गुण मिळवणारे विद्यार्थी कौतुकास पात्र आहेतच, पण त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करावे की परीक्षा मंडळाच्या सदोष गुणपद्धतीबद्दल खेद व्यक्त करावा, असा प्रश्‍न शिक्षणक्षेत्रातील तज्ञांना पडला पाहिजे. कधीकाळी परीक्षा मंडळाकडून दहावी-बारावी परीक्षांमध्ये उज्ज्वल यश मिळवणार्‍या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी जाहीर केली जात असे. ‘बोर्डात पहिला कोण आला वा कोण आली?’ याची सर्वांना उत्सूकता असायची. तथापि गुणवत्ता यादीने इतर अनेक गुणवान विद्यार्थ्यांमध्ये नाराजीची भावना निर्माण होत असे. गुणवंतांमध्ये तुलना वा भेदभाव केल्याचा भाव त्यातून प्रकट होत असे. कदाचित हा आक्षेप ग्राह्य मानूनच परीक्षा मंडळाने गुणवत्ता यादीची प्रथा बंद केली असावी. गुणपद्धतीत काही दोष असतील तर ते वेळीच दुरुस्त करण्याबाबत तज्ञांनी परीक्षा मंडळाला मार्गदर्शन करावे. करोना संकटकाळ बर्‍याच प्रमाणात संपुष्टात आल्यावरसुद्धा 29 शाळांचा निकाल शून्य टक्के लागावा याबद्दल सखेद आश्‍चर्याखेरीज चिंताही वाटते. एकही विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नसेल तर संबंधित शाळांच्या कार्यपद्धती सुधारणेकडे विशेष लक्ष पुरवण्याची गरज आहे. चार-पाच दशकांपूर्वी दहावी-बारावी परीक्षांच्या निकालात असे भरघोस गुण कधीच आढळत नसत. तरीसुद्धा त्यावेळचे शिक्षण प्रभावी आणि परिणामकारक वाटत होते. आता टक्केवारीत 35 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, पण पूर्वीसारखे यशाचे परिपूर्ण समाधान आज मात्र मिळत नाही. अधिकाधिक टक्के गुण मिळवूनसुद्धा पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना अग्निदिव्यातून जावे लागते. परीक्षा पद्धती आणि निकाल पद्धती यांच्यात काहीतरी उणीव असावी, असे निश्‍चितच जाणवते. दहावी-बारावी परीक्षा निकाल नि:संशय वाटावेत म्हणून या उणिवा दूर करण्याची गरज शिक्षणशास्त्री लक्षात घेतील का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com