Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेख..जितकी शिते तितकी भूते!

..जितकी शिते तितकी भूते!

गेले आठवडाभर मराठी मुलखातील लोकांचे भरपूर मनोरंजन सुरु आहे. करोनाच्या दोन वर्षांच्या काळात गावच्या जत्रा भरल्याच नव्हत्या. त्यामुळे कुठल्याही जत्रेत देखील तमाशा आणि कुस्त्यांची दंगल रंगलीच नव्हती. ती कसर भरुन काढणारा, किंबहुना कोणत्याही जत्रेत रंगले नसेल असे वगनाट्य सध्या राज्यात सुरु आहे. वगातील सवाल-जबाब फिके पडतील असे वार आणि पलटवार सुरु आहेत. खरे तर

‘हिमायतीच्या बळे गरीबगुरीबाला गुरकावू नको
दो दिवसांची जाईल सत्ता अपयश माथा घेऊ नको’

- Advertisement -

असा फटका अनंत फंदी यांनी दोनशे वर्षांपुर्वीच मारला होता. त्यांना त्यावेळी कदाचित पुढे येणार्‍या लोकशाहीचे स्वप्न त्यांनी पाहिले असावे. फंदी एवढ्यावरच थांबलेले नाहींत. ते पुढे म्हणतात,
‘उगीच निंदास्तुती कुणाची स्वहितासाठी करु नको
बरी खुशामत शहाण्याची
पण मुर्खाची ती मैत्री नको’

असेही त्यांनी बजावले होते. पण गाढ झोपलेल्याला झोपेतून जागे करणे सोपे असते. झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे महाकठीण. तद्वतच करोनाने गांजलेल्या जनतेचे मनोरंजन करायचे राजकारण्यांनी ठरवलेच असेल तर त्याला फंदींचा फटका तरी कुठवर पुरेसे ठरेल? राजकारण्यांनी सुरु केलेले हे मनोरंजन लोकांनी सुद्धा किती मनावर घेतले आहे हे जाणवून देणारे वृत्त नुकतेच माध्यमात झळकले.

बीडच्या एका शेतकर्‍याने त्याची मुख्यमंत्री पदी नियुक्ती करावी असे फर्मावणारे पत्र बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिले आहे. त्या व्यक्तीच्या हिंमतीचे कौतूक करावे तेवढे कमीच! हे पत्र जिल्हाधिकार्‍यांनी राज्यपालांकडे पाठवावे अशी विनंतीही त्याने केली आहे. घटनेप्रमाणे राज्यपाल हे राज्याचे प्रमुख मानले जातात. तथापि राज्यपाल या घटनात्मक पदाची गेले काही दिवस चालू असलेली ओढाताण सुद्धा राजकीय नेत्यांकडून होणार्‍या करमणुकीच्या ताज्या तमाशात भरच घालत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री म्हणून राज्यपाल कोणाचीही नेमणूक करु शकतात असे बीडच्या त्या व्यक्तीला वाटले असावे. त्या शेतकरी माणसाला कारभारातील बारीकसारीक बारकावे कुठे माहित असणार? राज्याचा मुख्यमंत्री बनण्याचे काही निकष आहेत. विधिमंडळाचे सदस्यत्व हा त्यापैकीच एक निकष. राज्याच्या विधानसभेत मुख्यमंत्र्यांची बहुमताने निवड होते. पण ते निकष पार न करताही राज्याचा मुख्यमंत्री होता येते असेही त्या भल्या माणसाला वाटले असावे. राज्यात रंगलेल्या वगनाट्याचे विदारक चित्र जाणवून देणारीच ही घटना म्हणावी. तमाशातील वगनाट्य आणि सवालजबाबातही वापरली जाणार नाही इतकी असभ्य आणि अर्वाच्य भाषा राज्यात सध्या रंगलेल्या वगनाट्यात वापरली जाते. सध्या देशात सगळी व्यवस्था पूर्णपणे बदलण्याची मोहिम सुरु आहे. त्यात पहिला क्रम इतिहासापासून सुरु होत आहे. मागोमाग पुराणे, भूगोल आणि विज्ञान सुद्धा त्या बदलण्याच्या क्रमात असू शकतील. हे लोकशाहीचे आणि राजकारणाचे अप्रतिम विडंबन ठरावे. सगळ्याच राजकीय पक्षांचे एकतर्‍हेने वस्त्रहरण सुरु आहे. त्याचे कोणालाच काही वाटेनासे झाले आहे हे मराठी मुलखाचे दुर्दैवच! भारतीय लोकशाहीची अशीच चेष्टा कमी अधिक देशात सर्वत्र सुरु आहे. राज्यकर्ते, यंत्रणा आणि राजकारण हा जनतेच्या दृष्टीने विडंबानाचा विनोदी विषय झाला आहे. वाट्याला नामुष्की आली तर चालेल पण सर्वांनीच धोपटमार्ग सोडल्याशिवाय भारतीय लोकशाहीतून विश्वगुरुत्वाचे स्थान तयार होऊ शकणार नाही अशी बहुतेक नेत्यांची खात्री झाली असावी का?

- Advertisment -

ताज्या बातम्या