तरुण वर्गाचे मनोधैर्य वाढवायलाच हवे !

तरुण वर्गाचे मनोधैर्य वाढवायलाच हवे !

2018 च्या तुलनेत 2019 मध्ये भारतात तरुणांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचा निष्कर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालाने नोंदवला आहे. या अहवालानुसार 2018 मध्ये एकूण 90 हजारांपेक्षा जास्त तर 2019 मध्ये सव्वा लाखांपेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली. त्यापैकी 2019 मधील 90 हजारांपेक्षा जास्त आत्महत्या तरुणांच्या आहेत. त्यांचे वय 18 ते 45 दरम्यानचे होते.

अयशस्वी प्रेमप्रकरण, घरगुती कलह, आर्थिक आणि भविष्याची चिंता, व्यसनाधीनता अशी आत्म्हत्येची अनेक कारणे तंज्ञाकडून सांगितली जातात. गेल्या काही काळापासून तरुणाई निराशाग्रस्त होत आहे असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे. शासनामध्ये अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिलेल्या स्वप्नील लोणकर या तरुणाने नुकतीच आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. स्वप्नील वयाच्या चोविसाव्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व आणि मुख्य परीक्षा दोनदा उत्तीर्ण झाला होता. शासकीय सेवेत नियुक्तीच्या प्रतीक्षेत होता. त्याच्या आत्म्हत्येवरून राजकारण पेटले आहे. राजकीय स्वार्थ साधण्यासाठी नेतेमंडळींना त्याची आत्महत्या हे निमित्त राजकारणासाठी पुरले आहे. त्यावरून एकमेकांवर दुगाण्या झाडल्या जात आहेत. तथापि जेव्हा आयुष्यात प्रचंड यश मिळवलेला सुशांतसिंग राजपूत किंवा अवघड समजली जाणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दोनदा उत्तीर्ण झालेला स्वप्नीलही आत्महत्या करतो तेव्हा कुठेतरी काहीतरी चुकत असावे हे स्पष्ट आहे. त्यादृष्टीने जाणते विचार करतही असतील.

तथापि त्याबद्दल जनसामान्यांना उपयुक्त ठरेल असे काही सुचवण्याचा प्रयत्न सहसा आढळत नाही. भारत तरुणांचा देश आहे, असे वारंवार सांगितले जाते. याच तरुणाईच्या बळावर महासत्ता होण्याचे स्वप्न कलाम यांच्यासारख्या जाणत्यांनी देशाला दाखवले होते. आजही नेतेमंडळी ते दाखवत असतात. पण तरुणाई आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलते यामागची कारणे शोधण्याचे प्रयत्न होत असतील का? नैराश्य किंवा हताशा (डिप्रेशन) कशी ओळखायचे? त्याची लक्षणे कोणती? त्याचा सामना कसा करायचा? यावर बरेच लिहिले जाते. तथापि तरुणाईला त्यांचे गांभीर्य उमजेल या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न तज्ज्ञांकडून होणे अपेक्षित आहे.

निराशेचा सामना यशस्वीपणे केलेल्यांचे आदर्श उदाहरणांचे दाखले युवावर्गाने अभ्यासले पाहिजेत. मन मोकळे करता येईल असे एकही ठिकाण किंवा व्यक्ती का त्यांना मिळत नसावी? तथापि संगणक, स्मार्ट फोन यासारख्या आधुनिक संपर्क साधनांचा वाढता वापर हाही त्याकामी अडथळा बनत असावा का? कदाचित त्यामुळेच प्रत्यक्ष संवाद जवळजवळ थांबला आहे. विश्वासाने कोणाशी बोलावे अशा मित्रांची किंवा वडीलधार्‍यांची उणीव याला कारणीभूत असेल का? समृद्धीसोबत बदललेली कौटुंबिक व्यवस्था याला कारण असेल का? विभक्त कुटुंबातील दोन्ही पालक उत्पन्न वाढवण्यासाठी बराच वेळ घराबाहेर असतात.

अशा परिस्थितीत मनात वेगवेगळे प्रश्न उभे राहिलेल्या तरुण मुलामुलींचा पालकांशी संवाद तरी कितीसा होणार? स्वप्नीलने आत्महत्या करण्यापूर्वी पत्र लिहून ठेवले होते. त्यात त्याने एमपीएससी परीक्षेला मायाजाल संबोधले आहे. त्याने एका महत्वाच्या मुद्याकडे तरुण वर्गाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला असावा का? तरुणतरुणीमध्ये शासकीय सेवेचे विलक्षण आकर्षण निर्माण झाले आहे.

राज्यात वीस लाखांपेक्षा जास्त तरुण या परीक्षेत उमेदवारी करत असल्याचे सांगितले जाते. शासनात रिक्त पदे किती? लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांची संख्या किती? त्यांची नियुक्ती का रखडली? त्या व्यस्त प्रमाणाचा उहापोह काही काळ तरी सुरूच राहील. तथापि स्वप्नीलने त्याच्या पत्रात उपस्थित केलेल्या मुद्यांचीही दखल घेतली जाईल का? त्याच्या आत्महत्येचा दोष कोणत्याही एकाच घटकाला देऊन चालेल का? ‘देशदूत’ ने आयोजित केलेल्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यात नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी उपस्थित तरुणाईचे एका मुद्याकडे लक्ष वेधले होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार्‍या उमेदवारांनी भविष्यातील वाटचालीचा दुसरा पर्याय (प्लान बी) तयार ठेवायला हवा, तसा तो ठेवला तर उमेदवारांना निराशेचा सामना करणे सोपे जाईल किंवा करावाही लागणार नाही असा नेमका सल्ला त्यांनी दिला होता.

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना व्यावसायिक जीवनाची दिशा घडवण्याचे इतर दोर कापून टाकू नका असेही त्यांनी सांगितले होते. तरुणपणाची बरीच वर्षे या परीक्षांच्या अभ्यासात व्यतीत होतात. त्याचकाळात दुसरा पर्याय नजरेसमोर ठेवला नाही तर भावी जीवनात मोठीच गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली होती. काळ झपाट्याने बदलत आहे. अनपेक्षित आलेल्या करोना संकटाने तर परिस्थितीचे सगळे संदर्भच बदलून टाकले. एकूणच नोकर्‍यांची संख्या कमी झाली. सरकारी भरतीवर देखील मर्यादा आल्या आहेत.

कामे अचूक व्हावीत म्हणून यांत्रिकीकरणावर भर दिला जात असल्याने खासगी नोकर्‍यांची संख्या दिवसेंदिवस कमी होणारच आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तरुणांनाही केवळ नोकरीमागे धावण्याचे टाळले पाहिजे. पर्यायी व्यवसायाची योजना अंमलात आणण्याचे धाडस दाखवावे लागेल. त्यासाठी जाणत्यांनी दिलेले सल्ले गंभीरपणे विचारात घ्यावेत. करियरच्या शक्य त्या वाटा चोखाळण्याचे धाडस दाखवावे लागेल.

हे एकट्या तरुणाईचे काम नाही. निराशेचा सामना यशस्वीपणे करण्याचे शिवधनुष्य पेलण्याची ताकद तरुणाईत निर्माण करणे ही तरुणाईबरोबरच सर्व समाजाची आणि प्रामुख्याने पालक व अध्यापक वर्गाचीही जबाबदारी आहे याचा विसर पडू नये.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com