शाळा उघडल्याचा आनंद तात्पुरता ठरु नये!
शाळा

शाळा उघडल्याचा आनंद तात्पुरता ठरु नये!

आज नवरात्रीचा सातवा दिवस! पारंपरिक भाषेत सातवी माळ! हा सण महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात उत्साहाने साजरा होत आहे. पारंपरिक पद्धतीच्या यात्रा आणि जत्रा भरलेल्या नाहीत. देवीचे दर्शन घेण्यासाठीही शासनाने अनेक मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. अनेक ठिकाणी देवी दर्शनासाठी ऑनलाईन पास काढणे बंधनकारक आहे. एवढ्या सूचना वाचल्यानंतरही सण साजरा करण्याचा लोकांचा उत्साह मात्र तसुभरही कमी झालेला आढळत नाही.

पास काढल्यानंतर लोक दिलेल्या वेळेनुसार दर्शनाला जात आहेत. घरोघरी सकाळ-सायंकाळ आरत्यांचे सूर ऐकू येत आहेत. लोक सक्तीच्या निर्बंधांना किती कंटाळले होते याचेच हे द्योतक आहे. देवस्थाने आणि शाळा सुरु कराव्यात की नाही यावरुन काही काळ घमासान सुरु होते. या मुद्यांवर वेगवेगळ्या संस्थांनी सर्वेक्षणे केली. काही सर्वेक्षणांचे निष्कर्ष होकारात्मक तर काहींचे नकारात्मक जाहीर झाले.

त्यामुळे गोंधळात आणखीच भर पडली होती. राज्य शासनाच्या कृती दलाच्या सदस्यांमध्येही याविषयी एकमत आढळत नव्हते. पालकही मुलांना शाळेत पाठवण्यास नाखुश असल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे राज्याच्या कारभार्‍यांची द्विधा मनस्थिती झाल्यास नवल ते काय? पण अखेर राज्य सरकारने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरु करण्याचा आणि दुसर्‍या आठवड्यात देवस्थाने उघडण्याचा निर्णय घेतला. त्याला अनुक्रमे विद्यार्थी आणि लोकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

ग्रामीण आणि शहरी भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय असल्याचे राज्याच्या शिक्षण विभागाने माध्यमांना सांगितले. राज्यातील किती टक्के शाळा सुरु झाल्या आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची पाहाणी करुन शिक्षण विभागाने यासंदर्भातील आकडेवारी संकलित केली. या आकडेवारीचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. राज्याच्या ग्रामीण भागातील साधारणत: 95 टक्के तर शहरी भागातील 85 टक्के शाळा सुरु झाल्या आहेत.

ग्रामीण भागातील 60 टक्के तर शहरी भागातील सुमारे निम्मे विद्यार्थी शाळेत येऊ लागले आहेत. शाळा सुरु झाल्याच्या पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय असल्याचे आणि नंतर ती वाढत असल्याचेही शिक्षण विभागाने सांगितले. विद्यार्थी उपस्थितीचा आलेख चढताच राहिल अशा आशा या आकडेवारीने जाग्या केल्या आहेत. दिवसभर घरात कोंडून राहावे लागल्यामुळे कधी एकदा मोकळिक मिळते याची विद्यार्थी जणू वाटतच बघत होते. घरी थांबायला विद्यार्थीही किती कंटाळले होते हे यावरुन लक्षात येते.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शाळा महत्वाची भूमिका बजावतात. मुले शाळेत फक्त अभ्यासच करतात का? देशाचे उत्तम नागरिक होण्यासाठीची आणि भविष्यात उदरनिवार्हासाठी नोकरी-व्यवसायासाठीची आवश्यक कौशल्येही शाळेतच विकसित होतात. सामुहिकतेचे, खिलाडूवृत्तीचे, सयंमाचे, सहनशिलतेचे, शिस्तीचे, वेळापत्रकाचे आणि चांगल्या अर्थाने स्पर्धेचे संस्कार शाळेतच रुजतात.

जगातील दारिद्य्र संपवण्याचा शिक्षण हा एकमेव राजमार्ग आहेफ असे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ गिलबर्थ यांचे मत आहे. तथापि गेली दीड वर्षे शाळा करोनामुळे बंद होत्या. त्याचा विद्यार्थ्यांच्या कौशल्यांवर किती विपरित परिणाम झाला आहे याचा अनुभव शिक्षक घेत आहेत. एका पिढीचे सर्वार्थाने कायमचे नुकसान झाले आहे. जे झाले तो भूतकाळ आहे. आता शाळा सुरु झाल्या आहेत.

करोनाची साथ कधी संपेल याविषयी तज्ञात एकमत आढळत नाही. शाळांमधील काही विद्यार्थ्यांना करोनाचा संसर्ग होण्याचा संभवही व्यक्त केला जातो. तथापि शाळा बंद ठेवण्यानेच तो संसर्ग टळू शकेल का? याउलट संसर्गग्रस्त आढळणार्या मुलांच्या उपचाराची विशेष दक्षता घेऊन वर्गातील इतर विद्यार्थ्यांना सुरक्षित ठेवण्याची काळजी घेणे शक्य आहे. शाळा बंद ठेवण्याऐवजी तोच जास्त योग्य पर्याय ठरेल. करोना संसर्गाचा बाऊ करुन पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना शिकण्यापासून वंचित ठेवणे योग्य ठरणार नाही. शिक्षणाची झाली एवढी हेळसांड पुरे झाली. आता तरी शाळांविषयी एक धोरण ठरवून त्याची ठामपणे अंमलबजावणी सरकार करेल का?

Related Stories

No stories found.