दिवाळी पाडव्याचे महत्त्व पुनर्स्थापित केले जावे!

दिवाळी पाडव्याचे महत्त्व पुनर्स्थापित केले जावे!

आज कार्तिक शुद्ध प्रतिपदा, म्हणजे दिवाळीचा पाडवा! पाडव्याचीही एक पौराणिक कथा वर्षानुवर्षे सांगितली जाते. वामन रूप घेतलेले भगवान विष्णू आणि औदार्याचे प्रतीक मानला गेलेला बळीराजा यांची ती गोष्ट. आज सगळीकडे बळीराजाचेही पूजन करतात. शेतकरी शेतात कणकेचा दिवा लावतात. घरोघरी घराच्या अंगणात किंवा दारात बळीराजाची आकृती काढून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. जी आजही पाळली जाते. हे झाले पाडव्याचे पारंपरिक महत्व. तथापि पूर्वी याच दिवशी व्यापार्‍यांचे नवे आर्थिक वर्ष सुरु होत असे.

व्यापार्‍यांचे हिशेब दिवाळी ते दिवाळी असेच व्हायचे. जमाखर्चाच्या नवीन चोपड्या (वही) याच दिवशी सुरु केल्या जायच्या. दिवाळी पाडव्याला चोपड्यांची पूजा केली जायची आणि दुसर्‍या दिवशीपासून त्या वापरात आणल्या जायच्या. आजही पुस्तकांच्या दुकानात चोपडी मागायला गेले तर एप्रिल ते मार्च पाहिजे की दिवाळी ते दिवाळी पाहिजे असे विचारले जाते. ही परंपरा बाजारातील अर्थकारणाशी निगडित होती असे या क्षेत्रातील जाणकार सांगतात. भारत हा कृषिप्रधान देश मानला जातो.

देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे असे तज्ज्ञही सांगतात. दिवाळीच्या दिवसात शेतीतील खरिपाचा हंगाम संपुष्टात येतो. कापूस, मका, बाजरी, ज्वारी, तांदूळ, तूर, सोयाबीन ही खरिपाची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. ती विकून शेतकर्‍याच्या हाती पैसे आलेला असतो. दिवाळीच्या निमित्ताने कामगार आणि कष्टकरी वर्गाला बोनस देण्याची जुनी परंपरा आहे.

दिवाळी हा भारतीय संस्कृतीतील मोठा सण मानला जातो आणि दिवाळीचा पाडवा तर साडेतीन मुहूर्तांपैकी एक! लोकांच्या हातात पैसा खेळत असल्याने याच काळात बाजारही तेजीत येतो. सणाला नाट लावू नये अशी लोकभावना समाजात खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार लोक खरेदी करतात.

पाडव्याला विशेष मुहूर्त मानला जात असल्याने या दिवशी लोक वाहन, घर आणि वस्तू खरेदीला प्राधान्य देतात. दिवाळीचे 4-5 दिवस शेअर मार्केटला सुट्टी असते. पण दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुहूर्ताच्या सौद्यांची परंपरा आहे. एक तासासाठी शेअर मार्केट सुरु होते. व्यापारी लक्ष्मीपूजनानंतर व्यवहार करतात. आर्थिक वर्षाची शुभ सुरुवात म्हणून या सौद्यांना महत्व आहे. ही परंपरा कशी बदलली? ब्रिटनमधील आर्थिक वर्षाशी मेळ बसावा म्हणून ब्रिटिश सरकारने 1 एप्रिल 1867 पासून भारतीय आर्थिक वर्ष एप्रिल ते मार्च असे सुरु केले असे सांगितले जाते.

देशाचे आर्थिक वर्ष 1 जानेवारीपासून सुरु करण्याची कल्पना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मांडली आहे असेही सांगितले जाते. एप्रिल ते मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाऊ लागल्याने दिवाळीच्या पाडव्याचे आर्थिक महत्व तांत्रिकदृष्ट्या संपुष्टात आले. तथापि भारतीय जनमानसावर परंपरांचा पगडा आहे. सरकारी कामकाजाकरता आर्थिक वर्ष वेगळे मानले जाते हा भाग अलाहिदा. पण पाडवा हाच व्यापारी वर्गात आजही महत्वाचा दिवस मानला जातो. सध्या भारतीयत्वाला जास्त महत्व दिले जाताना आढळते.

भारतीय परंपरा दृगोच्चर व्हाव्यात यासाठी अनेक संस्था विशेष प्रयत्न करताना आढळतात. त्यासाठी समाजमाध्यमांचाही मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घेतला जात आहे. शासनाकडूनही या बदलाच्या कल्पनेला कळत-नकळत महत्व दिले जात आहे. खरिपाचा हंगाम संपत असताना ऑक्टोबरमध्ये अर्थसंकल्प ठरणे आवश्यक आहे अशी सूचना नीती आयोगाच्या एका समितीने केली होती असे सांगितले जाते. त्यामुळे दिवाळी ते दिवाळी हे आर्थिक वर्ष भारतीय चालीरीतींशी जोडलेले आहे असे आजही मानले जाते.

आर्थिक वर्षाची हीच परंपरा पुन्हा सुरु करण्याचा विचार सरकारने का करू नये? अर्थात कोणताही बदल एकदम होत नसतो. बदल होताना खडखडाट होतच असतो. आर्थिक वर्ष बदलणे सोपे नसेल. त्यासाठी यंत्रणेत मोठ्या प्रमाणात अनेक बदल करावे लागतील. तथापि पाडव्याला सुरु होणार्‍या आर्थिक वर्षाचा मुद्दा मात्र विचाराधीन ठेवता येऊ शकेल का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com