अपघाती मृत्यूंची भयावहता मिस्त्रींच्या मृत्यूनेच जाणवली?

अपघाती मृत्यूंची भयावहता मिस्त्रींच्या मृत्यूनेच जाणवली?

देशातील रस्त्यांचा दर्जा हा नेहमीच सतत चघळल्या जाणार्‍या विषयांपैकी एक. रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे याविषयी लोक तक्रारी करुन थकले असावेत आणि रस्त्यांवर खड्डे असणारच या निष्कषापर्यंत जनता पोहोचली असावी. वास्तव असे असले तरी सरकारही रस्त्यांच्या दर्जाबाबत गंभीर आहे असे संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी माध्यमांनी सांगितले. रस्ते बांधणी कामाच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने विशेष यंत्रणा निर्माण केल्याचेही माध्यमांना सांगितले गेले. ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेने रस्त्यांचे डिजिटल प्रोफाईल तयार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यासाठी सहा हजार चालकांचे सर्वेक्षण केले गेले होते. अपघातांचे वाढते प्रमाण रोखणे हाच त्यामागचा उद्देश होता असेही त्यावेळी सांगितले गेले होते. रस्ते बांधणीचा दर्जा राखण्यासाठी आणि अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी विविध स्तरांवर होणार्‍या प्रयत्नांचे फलित खरेच तपासले जात असेल का? रस्त्यांना विकासाचा मार्ग म्हणतात. एखाद्या गावात रस्ता झाला की त्या गावाचा चेहरामोहरा बदलू लागतो, विकासाच्या दृष्टीने ते गाव कात टाकू लागते. रस्त्यांचा दर्जा सुधारतोय. रस्ते रुंद होताहेत. नव्याने बांधलेही जात आहेत. 2025 पर्यंत राष्ट्रीय महामार्गांचे जाळे दोन लाख किलोमीटरपर्यंत वाढवण्याचे आणि दररोज किमान 50 किलोमीटर महामार्ग बांधण्याचे उद्दिष्ट सरकारने जाहीर केले आहे. रस्ते बांधणीतील दर्जाही राखण्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही सांगितले जाते. पण यातून नेमके काय साधायचे आहे? रस्ते दर्जेदार आणि गुळगुळीत बनले तर वाहनांचा वेग वाढणे स्वाभाविक आहे. पण त्यामुळे होणारे अपघात स्वाभाविक मानता येतील का? वाहनांचा वेग, गुळगुळीत रस्त्यांवरुन वाहने चालवताना घ्यावी लागणारी दक्षता आणि वाहतुकीचे नियम याच्याशी समाजजागृतीची सांगड घातली जाते का? तशी ती घातली गेली नाही तर त्याचे काय परिणाम संभवतात याचे काहीसे भयावह चित्र राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या ताज्या अहवालातील नोंदींमधून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी म्हणजे 2021 मध्ये देशात रस्ते अपघातांमध्ये दीड लाखांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचे या अहवालात नमूद आहे. या अहवालात नोंदवण्यात आलेली कारणेही त्याविषयीच्या समाजजागृतीची निकडीची स्पष्ट करतात. वेगमर्यादेचे उल्लंघन आणि वाहने बेदरकारपणे हाकण्याची वृत्ती ही अपघातांची दोन प्रमुख कारणे आहेत. तथापि समाजजागृती ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे हे सर्वांना माहित आहे, तरीही असे का व्हावे? त्याची जाणीव होण्यासाठी प्रत्येकवेळी एखाद्या नामवंतांच्या वाहनाच रस्त्यावर अपघात व्हायलाच हवा का? सायरस मिस्त्रींसारख्या एका नामवंत उद्योगपतींचा रस्ते अपघातात परवा दुर्दैवी मृत्यू झाला. लगेच माध्यमांमध्ये रस्ते अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू याची आकडेवारी प्रसिद्ध होउ लागली आहे. वाहनचालकांना सल्ले देणार्‍या सल्ल्यांचा समाजमाध्यमांवर खच पडला आहे. चारचाकीचे चालक आणि त्यातील प्रवाशांनी सीटबेल्ट बांधणे किती गरजेचे आहे यावरही बरेच चर्वितचर्वण सुरु आहे. म्हणजे रस्ते अपघातांमध्ये एका वर्षात दीड लाख लोक मरण पावले यातील गांभिर्य लक्षात यायला सायरस मिस्त्रींचा रस्त्यावरील अपघातात दुर्दैवी मृत्यू व्हावा लागला. तोपर्यंत दीड लाख मृत्यूंच्या आकड्यातील भयावहता माध्यमांना आणि जनतेला का जाणवू नये? नामवंतांच्या मृत्यूसोबत दीड लाख मृत्यूंची आठवण येणे भुषणावह नाही. माध्यमांनीही यातून धडा घेण्याची गरज आहे. ‘शहाणे करुन सोडावे सकल जन’ हे माध्यमांचे देखील आद्य कर्तव्य आहे. माध्यमांबरोबरच सरकार, प्रशासकीय यंत्रणा आणि विविध सामाजिक संस्थांनी त्या कर्तव्याची जाण ठेवली असती तर अपघात आणि त्यामुळे होणारे मृत्यू यांची संख्या कदाचित कमी होऊ शकली असती. वाहनांची संख्या वेगाने वाढत आहे. सोबतच अननुभवी नवख्या वाहनचालकांची संख्याही वाढत आहे. त्या तरुणाईला जबाबदारीची जाणीव करुन देण्याचा खास कार्यक्रम तयार करुन अंमलात आणण्याचीही आवश्यकता आहे. समाजाला किमान शिस्तीची जाणीव करुन देण्याचा कार्यक्रम हाती घेणे ही रस्ते बांधणीत सुधारणा करणार्‍या खात्याची सुद्धा जबाबदारी आहे. याची जाणीव प्रशासकीय यंत्रणा ठेवेल का? त्यासाठी एखाद्या नामवंताच्या अपघाताची वाट न पाहाण्याइतके सावधपण यंत्रणेत आता तरी येईल का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com