Saturday, April 27, 2024
Homeअग्रलेख‘करोनामुक्ती’चे स्वप्न... किती समीप? किती दूर?

‘करोनामुक्ती’चे स्वप्न… किती समीप? किती दूर?

गेल्या वर्षी ‘करोना’ची साथ अनेक देशांत पसरली. पाहता-पाहता तिने ‘महामारी’चे (पँडेमिक) स्वरुप धारण केले. जगात ‘करोना’ग्रस्तांची संख्या आता पावणे सात कोटींजवळ पोहोचत आहे. शेकडो अर्थव्यवस्था या साथीने कोलमडून टाकल्या आहेत.

लोकांचे सहकार्य, प्रत्येक देशाची आरोग्य यंत्रणा आणि ‘करोना’योध्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आता या संकटाची तीव्रता कमी होत असल्याचे दिसत आहे. माध्यम क्रांतीमुळे दहशत मात्र कायमच आहे; किंबहुना वाढत आहे. रुग्णसंख्येत दररोज भर पडत आहे, पण सध्या इतर कुठल्याही दुखण्याने किंवा कारणाने मृत्यू होतच नाहीत, असे एकांगी चित्र निर्माण झाले आहे. पूर्वीच्या तुलनेत संसर्ग मंदावला आहे एवढाच काय तो दिलासा! ‘करोना’प्रतिबंधक लस शोधण्याचे काम जगभर सुरू आहे.

- Advertisement -

औषध कंपन्यांकडून विकसित होणार्‍या लशींच्या चाचण्याही सुरू आहेत. काही लसींचे सकारात्मक निष्कर्ष आल्याचे व त्या लसी परिणामकारक ठरल्याचे दावेही केले जात आहेत. चाचण्यांचे सर्व सोपास्कार यथायोग्य पार पडून परिपूर्ण लस केव्हा उपलब्ध होते याकडे जगाचे लक्ष लागले आहे. परिस्थितीवर जागतिक आरोग्य संघटनाही लक्ष ठेऊन आहे. ‘करोना’ची स्थिती आणि त्यावरील लसनिर्मितीचे प्रयत्न याबाबत या संघटनेच्या नावाने नुकतेच सूचक, पण महत्त्वपूर्ण विधान करणारे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

लस-चाचण्यांचे सकारात्मक परिणाम येत आहेत, जगाला ‘करोनामुक्ती’चे स्वप्न त्यावरून पाहता येऊ शकते, असा आशावाद जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांकडून व्यक्त केला गेला आहे. महामारीला अटकाव करता येईल, पण पुढचा रस्ता अधिकच खडतर आहे, अशी काहीशी सावधगिरीची सूचनाही त्या पत्रकात आढळते. लस संशोधनाबाबत अजून जागतिक आरोग्य संघटनासुद्धा पूर्णपणे आश्वस्त नाही, असाच त्या सूचक व सावध शब्दांतून अर्थ निघतो. ‘करोनामुक्ती’साठी सुरू असलेले प्रयत्न वास्तवात अनुभवास यायला अजून किती काळ लागेल ते जागतिक आरोग्य संघटनाही खात्रीने सांगू शकत नाही. ‘करोनामुक्ती’ हे तूर्तास स्वप्न आहे, हेच मोकळ्या शब्दांत आरोग्य संघटनेने सांगितले असावे. लस चाचण्यांमध्ये काही हौशी मंडळीसुद्धा सहभागी होत आहेत.

हरयाणाच्या आरोग्यमंत्र्यांनी एका औषध कंपनीकडून स्वत:वर लस टोचून घेण्याचा प्रयोग केला. मात्र त्यांनासुद्धा ‘करोना’ने गाठलेच. त्यामुळे लशीच्या परिणामकारकतेबद्दल साहजिकच शंकेला वाव मिळतो. संबंधित कंपनीने त्याविषयी स्पष्टीकरणही दिले आहे. एकूणच ही सगळी प्रक्रिया अजून समाधानकारकरित्या पुरी व्हायची आहे. लस संशोधन वेगात सुरू आहे. तरीही अनेक देशांत महामारीच्या दुसर्‍या तर काही देशांत तिसर्‍या लाटेची गाज ऐकू येत आहे. हा धोका टाळण्यासाठी अनेक देशांना पुन्हा टाळेबंदीचा मार्ग अवलंबावा लागत आहे. म्हणजे धोका पूर्णपणे टळलेला नाही. संसर्गावर नियंत्रण न ठेवले गेल्यास लाटेची ‘त्सुनामी’ व्हायला वेळ लागणार नाही, अशीही भीती व्यक्त होत आहे.

हल्लीच्या राजकारणात लोकांना स्वप्ने दाखवण्याचे काम केवळ भारतातच सुरू आहे असे नव्हे; तर त्याला जागतिक स्वरुप प्राप्त झाले आहे याचा या बातम्या हा नमुना आहे. ‘करोना’ प्रतिबंधक लस अजून प्रयोगावस्थेत आहे, असाच इशारा जागतिक आरोग्य संघटनेने वेगळ्या शब्दांत दिला आहे. त्याचा योग्य तो बोध घेतला पाहिजे. परिणामकारक आणि परिपूर्ण लस विकसित होईपर्यंत ‘दो गज दुरी, मास्क है जरुरी’ या सूत्राचे पालन करून सावधगिरी बाळगण्यातच शहाणपणा आहे हे लोकांनी विसरू नये हेच बरे!

- Advertisment -

ताज्या बातम्या