Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखभारतीय महिला क्रिकेटमधील झुलन नावाच्या तार्‍याचा अस्त!

भारतीय महिला क्रिकेटमधील झुलन नावाच्या तार्‍याचा अस्त!

भारतीय महिला क्रिकेट युगातील एक तारा निखळला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने देखील ‘एक युग संपले’ असेच या प्रसंगाचे वर्णन केले आहे. झुलन गोस्वामी हे त्या तार्‍याचे, त्या युगाचे नाव. ती भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्वात वेगवान गोलंदाज होती. नुकतीने तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली.  क्रिकेट रसिक झुलनला ‘चकदा एक्सप्रेस’ म्हणत.

या एक्सप्रेसने आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातून विश्रांती घेतली आहे. झुलनने तब्बल 20 वर्षे क्रिकेटचे मैदान गाजवले. अनेक विक्रम नावावर केले. भारतीय महिला क्रिकेट संघाला अनेक विजय मिळवून दिले. महिला क्रिकेटपटूंना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी तिने कायमच प्रयत्न केले. एक ‘बॉल गर्ल’ ते वेगवान गोलंदाज ही तिची कारकिर्द कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. बॉल गर्ल म्हणजे मैदानाबाहेर गेलेला चेंडू आणून देणारी मुलगी. झुलनने क्रिकेटच्या मैदानात पहिले पाऊल टाकले तेव्हा मुलींनी मैदानावर जाणे हे देखील समाजमान्यतेविरुद्ध केलेले बंड मानले जायचे.

- Advertisement -

मुलींनी घराच्या अंगणात खेळणे देखील दुरापास्त होते तेव्हा झुलन नावाच्या या मुलीने क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहिले होते. पश्चिम बंगालमधील चकदा हे छोटेसे खेडे झुलनचे जन्मगाव. ‘गावातील सगळी मुले क्रिकेट खेळायची आणि मी त्यांचा अंगणाबाहेर गेलेला बॉल परत आणून द्यायची. तेव्हापासूनच मला मैदानाचा नाद लागला. हे मैदान एक दिवस आपणही गाजवायचे असे स्वप्न पाहिले होते’ असे झुलननेच एका मुलाखतीत सांगितले होते. प्रवाहाविरुद्ध पोहणे सोपे नसते.

त्यासाठी विलक्षण ताकद लागते. समाजाचे बोलणे ‘मनावर घेणे’ सोडून द्यावे लागते. निवडलेल्या वेगळ्या वाटेवर चालण्यात सातत्य ठेवावे लागते. पाय मागे खेचले जाऊ शकतात हे माहित असुनही पुढे चालायची ताकद पायात निर्माण करावी लागेत. हे सगळे झुलनच्याही वाट्याला आले. लहान असताना ती ज्यांना चेंडू आणून द्यायची ती मुले देखील मुलगी म्हणून तिला खेळू द्यायची नाहीत. मग मुलांचा खेळ संपला की झुलनची इनिंग सुरु व्हायची. ती एकटीच क्रिकेट खेळायची. त्यानंतर सराव करण्यासाठी झुलन रोज कोलकात्याला जायला लागली. त्यासाठी पहाटे लवकर उठून रेल्वेने कोलकात्याला जावे लागायचे. सराव संपवून गावी परत आल्यावर शाळा आणि अभ्यास.

ती स्वत:च्या या वेळापत्रकावर खुश होती. पण गाव आणि तिचे कुटुंबिय मात्र यासाठी राजी नव्हते. मुली क्रिकेट खेळतात का, हाच सर्वांचा प्रश्न होता. त्यामुळे झुलनचे मैदानावर जाणे थांबले पण तिची इच्छाशक्ती मात्र दुर्दम्य होती. प्रशिक्षकांनीही झुलनमधील क्षमता ओळखली होती. त्यांच्याच प्रयत्नांनी झुलनचे आणि क्रिकेटचे पुन्हा एकदा मैत्र जमले ते कायमचेच. 20 वषार्र्ंच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत झुलनने अनेक व्रिकम नोंदवले. एक दिवसीय सामन्यात 250 बळी, सामन्यात दहा बळी मिळवणारी सर्वात लहान वयाची खेळाडू, महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक चेंडू टाकणारी गोलंदाज, महिला क्रिकेटमध्ये पायचितचे सर्वाधिक बळी मिळवणारी गोलंदाज हे त्यापैकीच काही विक्रम.

आयसीसी क्रिकेट रँकिंगमध्ये तिने अनेकदा पहिले स्थान पटकावले होते. आज भारतातील महिला क्रिकेटचे चित्र पालटले आहेत. महिला क्रिकेटपटूंची संख्या वाढत आहे. लहान लहान गावातील मुली क्रिकेट खेळू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मुली देखील महाराष्ट्र  राज्याचे मैदान गाजवू लागल्या आहेत हे त्याचे चपखल उदाहरण. हे चित्र पालटण्यात झुलनसारख्या लढवय्या क्रिकेटपटूंचे निश्चितच मोठे योगदान आहे. सद्यस्थितीत चित्र थोडेसे बदलत चालले असले तरी सुुरुवातीला महिला क्रिकेटच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा आली.

झुलनच्या निवृत्तीचीही दखल मोठ्या प्रमाणावर घेतली गेल्याचे फारसे आढळले नाही. पण तिच्यासोबत एका युगाचा अस्त झाला आहे हेच वास्तव आहे. सर्वत्र आदिशक्तीचा उत्सव सुरु आहे. भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर झुलनसारखेच आणखी चमकदार तारे आदिशक्ती निर्माण करेल अशी आशा करु या.

- Advertisment -

ताज्या बातम्या