लोकांच्या अंधाराचे गडदपण लवकर दूर व्हावे!

लोकांच्या अंधाराचे गडदपण लवकर दूर व्हावे!
दरड कोसळून नष्ट झालेलेे माळीणगाव संग्रहित छायाचित्र

सध्याचे वातावरण भलतेच चमत्कारिक आहे. ऋतुचक्रानुसार उन्हाळा संपून पावसाळा सुरु झाला आहे. पण पावसाचा मात्र टिपुसही अद्यापर्यंत महाराष्ट्राच्या काही भागात पडलेला नाही. तर काही भागात पावसासोबत जुनी घरे देखील पडली आहेत. काही ठिकाणी उकाडा जराही कमी झालेला नाही. दुपारी तर जीवाची तगमग व्हावी इतके कडक ऊन कधीकधी पडते. अधुनमधून पावसाचे ढग दाटून आले याचा आनंद होईपर्यंत ते हवेच्या झोताबरोबर पांगतात देखील. सामाजिक वातावरणही निरुत्साह वाढवणारेच आहे. बेरोजगारी दिवसेदिवस वाढत आहे. शिकलेल्या तरुण पोरांच्या हाताला तर कामच नाही. पाऊसही ओढ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरीही पावसाची चातकासारखी वाट पाहात आहेत. दुसरीकडे राज्यातील ज्या भागांना नेहमीच पुराचा तडाखा बसतो अशी गावे यंदाही पूर येईल का, या दडपणाखाली आहेत. अशा काही ठिकाणी छोटे मोठे पूर आलेही आहेत. राज्यातील अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे. ही माहिती आणि पुनर्वसन मंत्र्यांनीच माध्यमांना दिली. अशा गावातील माणसे पावसाळ्यात मृत्यूच्या छायेखाली जगतात असे म्हटले तर ते अतिशयोक्त ठरेल का? दरड म्हटले की लोकांना अजुनही ‘माळीण’ गाव आठवते. आपापल्या गावाचे ‘माळीण’ होऊ नये असे त्या त्या गावातील लोकांना वाटत असले तरी नुसते वाटून काय साध्य होईल? नागरिकांशी संबंधित सर्वच पातळ्यांवर सरकारचे घोडे वरातीमागुन धावणे ही तर आता पद्धतच रुढ झाली आहे. सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. त्याबरोबरच पीओपी गणेशमुर्तींवरील बंदीची चर्चा सुरु झाली आहे. सरकारने पीओपीच्या मुर्तीवर बंदी घालू नये अशी मागणी मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीने सरकारकडे केली आहे. तर पर्यावरण प्रदुषण विरोधी कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था बंदी असलीच पाहिजे यावर ठाम आहेत. पीओपीपासून बनवलेल्या गणेशमुर्तींची आठवण सर्वांना आणि खास करुन सरकारलाही गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच का येते? याबाबतातील एक ठाम धोरण सरकार जाहीर का करत नाही? अलीकडच्या महिन्या-दोन महिन्यात महागाईने सर्वांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. नागरिकांच्या या परिस्थितीची दखल मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारमधील विविध मंत्र्यांनी घेतली पाहिजे. पण लोकांनी सरकारकडे दाद मागावी तर सरकारमधील लोक आपापल्या कामात गुंतलेले दिसतात. कोणी देवदर्शन करण्यात मग्न आहे तर कोणाला पोलीस स्थानकाच्या चकरा माराव्या लागत आहेत. कोणावर निलंबनाची टांगती तलवार आहे तर कोणाला जेलमध्ये अजून किती दिवस राहावे लागेल हे त्यांनाही माहित नाही. काही जणांच्या मनावर विविध प्रकारच्या चौकशांचे दडपण आहे. उर्वरित सगळे कुरघोड्या आणि कोलांटउड्यांच्या राजकारणात मग्न आहेत. घोडेबाजाराच्या नावाने सगळेच राजकीय पक्ष शंख करत असले तरी घोडेबाजार करणे कोणालाही वावगे वाटत नाही. आता तर भाऊंबंदकीचे रोज नवनवे नाट्य सादर केले जात आहे. सगळी सरकारे विकासाच्या गप्पा मारतात पण सध्याचे वातावरण मात्र जनतेला भकास विकासाचा अनुभव देत आहे. अशा निराशाजनक वातावरणात आशेचा दिवा दिसावा म्हणून लोकांचे आणि खास करुन शेतकर्‍यांचे डोळे पावसासाठी आभाळाकडे लागणे स्वाभाविकच आहे. निसर्गाने तशी कृपा लवकरच केली तरच लोकांच्या आशेला काहीसे धुमारे फुटतील.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com