ठसकेबाज मराठी सूर हरपला!

ठसकेबाज मराठी सूर हरपला!

ढोलकी आणि तुणतुण्याचा आवाज कानावर पडल्यावर तमाशा सुरू झाल्याचे दर्दी रसिकाला सांगावे लागत नाही. लावणी हा तर तमाशाचा आत्मा! लावणीला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. वर्षानुवर्षे लावणी मराठी रसिकांवर राज्य करीत आहे. काळानुरूप अनेक बदलांचा स्वीकार करीत वाटचाल करणारी लावणी  आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. महाराष्ट्राची आणि मराठी लोकसंस्कृतीची शान असलेल्या लावणीला लोकप्रिय करण्यात कितीतरी शाहीर, कलावंत, गायक-गायिका यांनी योगदान दिले आहे. ‘फड सांभाळ तुर्‍याला गं आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा...’ ही ठसकेबाज लावणी ऐकू येताच लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे नाव डोळ्यांसमोर येते. ठसकेबाज लावणी कशी सादर करावी याचा उत्तम वस्तूपाठ सुलोचना यांनी होऊ घातलेल्या कलाकारांच्या पिढीसमोर घालून ठेवला आहे. लावणीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आणि तिला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. अभिनय आणि कलाक्षेत्रातील प्रवेशासाठी मोठ्या बहिणीने त्यांना प्रोत्साहित केले. चौथीपर्यंत शिकलेल्या सुलोचनांनी बालपणातच अभिनयाचे धडे गिरवायला सुरूवात केली. त्यांनी बालमेळ्यात काम केले. नंतर मराठी, हिंदी, ऊर्दू तसेच गुजराती नाटकांत त्यांनी बालभूमिका साकारल्या. अभिनय करीत असताना वयाच्या दहाव्या वर्षी चित्रपटासाठी गायनाची संधी त्यांना मिळाली. गायनाचे कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण नसताना केवळ आवड म्हणून गायनाकडे वळलेल्या सुलोचना पुढे त्यातच रमल्या. हिंदी चित्रपटसृष्टीत त्या काळातील पद्धतीप्रमाणे सुलोचना कदम किंवा के. सुलोचना नावाने त्यांची ओळख होती. मास्टर भगवान यांच्या चित्रपटात त्यांनी सी. रामचंद्र यांच्या समवेत पार्श्‍वगायन केले. मोहमद रफी, मन्नाडे, शमशाद बेगम, गीता दत्त, शामसुंदर आदी नावाजलेल्या गायकांसोबत सहगायनाची संधीही त्यांना लाभली. मराठीच नव्हे तर हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी आदी भाषांतील गीतेही त्यांनी गायली. हिंदी चित्रपटांतून जवळपास अडीचशे गाणी त्यांनी गायली. अभिनय आणि चित्रपट गायनात रमलेल्या सुलोचना यांना संगीतकार वसंत पवार यांनी लावणी गायनाचा आग्रह केला, पण लावणी गाण्यासाठी त्या राजी नव्हत्या. तरीही पवारांच्या आग्रहाखातर त्यांनी लावणीला होकार दिला. ‘नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची...’ ही त्यांनी गायलेली पहिली लावणी ध्वनिमुद्रीत झाली. तिथून पुढे मराठी लावणी आणि मराठी रसिकांना ठसकेबाज आवाज गवसला. ‘फड सांभाळ तुर्‍याला गं आला’, ‘पदरावरती जरतारीचा’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘सोळावं वरीस धोक्याचं’, ‘आई मला नेसव शालू नवा’, ‘मला म्हणतात लवंगी मिरची’ अशा त्यांनी गायलेल्या बहारदार लावण्या मराठी चित्रपटांमधून गाजू लागल्या. चित्रपटातील लावण्या पुढे तमाशांमधूनही सादर होऊ लागल्या. आकाशवाणीवर घरोघरी सुलोचनाबाईंचा सूर कानी पडू लागला. लावणी गायनाचे हजारो कार्यक्रम त्यांनी सादर केले. त्याला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. चित्रपट दिग्दर्शक असलेले त्यांचे पती श्यामराव चव्हाण यांनी त्यांना लावणी गायनासाठी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच मराठी लावणीला आणि रसिकांना कानात सतत गुंजणारा ठसकेबाज आवाज पुढे आला आणि मराठी रसिकांच्या मनात रूजला. लावणीनेच त्यांना प्रसिद्धी आणि यशाच्या शिखरावर पोहोचवले. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल याचवर्षी सुलोचना यांना केंद्र सरकारकडून ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात आले. सहा दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा आवाज देहरूपाने काळाच्या पडद्याआड गेला आहे, पण सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या आणि अजरामर झालेल्या ठसकेबाज लावण्या आकाशवाणी, छोटा पडदा, चित्रपट, तमाशा आणि लावण्यांच्या कार्यक्रमांमधून रसिकांचे मनोरंजन दीर्घकाळ करीत राहतील.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com