
‘ सांगा कसे जगायचे’ ही कवी मंगेश पाडगावकर यांची प्रसिद्ध कविता. ‘सांगा कसे जगायचे..कण्हत कण्हत की गाणे म्हणत? ’असा प्रश्न ते माणसांना विचारतात. मंगेशकरांनी ही कविता लिहिली त्या काळापेक्षा सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीत हा प्रश्न अधिक समर्पक ठरत आहे. अनेकांना तो क्षणाक्षणाला तो डाचू लागला असेल. पाडगावकर यांची माफी मागून कवी संजय रोंघे विचारतात, ‘ताणतणाव किती सारा..सांगा कसे जगायचे..नाही सुख कुठेच उरले..सांगा दु:खात कसे हसायचे?’ कवी संजयना जो प्रश्न पडला आहे तोच कोट्यवधी जनतेलाही सतावतो आहे. कोंडलेल्या वाफेला बाहेर पडायला जागा ठेवली नाही तर तिचा स्फोट होतो. तसेच लोकभावनेचे झाले आहे. परिस्थितीने गांजलेल्या लोकांच्या संतापाचा उद्रेक वारंवार होऊ लागला आहे. छोट्या मोठ्या कारणांचे निमित्त होऊन लोक रस्त्यावर उतरायला लागले आहेत. ‘अग्नीवीर’ या योजनेला विरोध हे त्याचे ताजे निमित्त. या योजनेच्या विरोधात तरुण देशभर आंदोलन करत आहेत. काही राज्यांमध्ये या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी रेल्वेगाड्यांना आगी लावल्या. रेलरोको आणि रास्तारोकोही केला. यामुळे गेल्या तीन-चार दिवसात शेकडो रेल्वे गाड्या रद्द कराव्या लागल्या. प्रवाशांना गाड्या सोडून खाली उतरावे लागले. त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी वेगळे मार्ग शोधावे लागले. प्रवाशांची विलक्षण गैरसोय झाली. या आंदोलनामुळे भारतीय रेल्वेचे साधारणत: एक हजार कोटींचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते. सामान्यत: जनआंदोलनांनी जर हिंसक वळण घेतले तर सर्वात आधी सार्वजनिक मालमत्तेलाच लक्ष्य केले जाते. सार्वजनिक मालमत्ता ही जनतेची संपत्ती आहे याचाही विसर आंदोलकांना पडतो. सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीची भलावण कोणीही करणार नाही. कोणत्याही पद्धतीने सार्वजनिक हिंसेचे आणि जाळपोळीचे समर्थन होऊ शकत नाही. तथापि जनतेच्या संतापाचा उद्रेक वारंवार का होऊ लागला याचा विचार जाणत्यांनीही करायला हवा. कोट्यवधी लोकांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे. कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी माणसे दिवसाचे बारा-चौदा तास राबत आहेत. निवांत बसून दोन घास खाणेही चैन ठरावी अशीच सध्याची परिस्थिती आहे. तरीही लोक आंदोलनात का सहभागी होत आहेत? रस्त्यावर का उतरत आहेत? मनातील संतापाला वाट करुन देण्यासाठी जाळपोळ का करत आहेत? उद्रेक इतके टोकाला का जात आहेत? याची कारणे कधीतरी शोधली जातील का? वाढत्या इंधनदराने वाहनचालकांच्या पोटात गोळा आणला. स्वयंपाकासाठी लागणार्या गॅसच्या किमती आवाक्याबाहेर गेल्या आहेत. अन्नधान्याच्या, भाजीपाल्याच्या आणि गॅस सिलेंडरच्या किमतीने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. टोलची टोळधाड आणि बेरोजगारी वाढतच आहे. तथापि या सर्व बाबींचा जनतेचा आक्रोश ऐकायला सुद्धा कोणालाच सवड नाही. किंबहुना तो आक्रोश ऐकायचाच नाही या निश्चयाने फक्त लोकांना ‘मन की बात’चे डोस ऐकवले जात आहेत. यातील चर्चेत जनतेच्या दैनंदिन प्रश्नाबाबत शब्दही उच्चारला जात नाही. सहानुभूतीची फुंकर सुद्धा घातली जात नाही. मग उद्रेकाची वाफ अधिक कोंडली जाऊ लागणारच! लोकांच्या संतापाच्या उद्रेकाची कोंडी कोण फोडणार? ‘जन की बात’ कोण ऐकणार? त्यामुळेच लोकांच्या असंतोषाचा उद्रेक वारंवार होत असावा. यावर आता नेत्यांनी आणि जाणत्यांनी सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे. फक्त आपल्या मनातले विचार ऐकवण्याची उबळ थांबवून लोकांच्या मनातील असंतोष समजावून घेण्याचे सौजन्य या देशात नव्याने निर्माण झालेल्या विश्वगुरुंची पलटण दाखवू शकेल का?