Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखअथक मेहनतीचे नेत्रदीपक यश!

अथक मेहनतीचे नेत्रदीपक यश!

पुसारला वेंकटा सिंधू! हे तिचेच पूर्ण नाव आहे, जिने टोकियो इथे सुरू असणार्‍या ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले. पी.व्ही.सिंधूने P.V. Sindhu चीनची खेळाडू बिन्गजियायो हिचा पराभव करत हा पराक्रम गाजवला. सलग दोन ऑलिम्पिक Olympics स्पर्धांमध्ये दोन वैयक्तिक पदके जिंकणारी ती पहिलीच भारतीय महिला खेळाडू आणि जगातील केवळ चौथी महिला बॅडमिंटनपटू आहे.

गतवर्षी झालेल्या रियो ऑलिम्पिकमध्ये तिने रजत पदक पटकावले होते. टोकियो ऑलिम्पिकमध्ये पराक्रम गाजवल्यानंतर माध्यमांशी बोलताना सिंधू म्हणाली, ‘कांस्य पदक जिंकले म्हणून आनंद व्यक्त करू की अंतिम सामन्यात खेळण्याची संधी गमावली म्हणून दुःख व्यक्त करू हेच मला कळत नाही.’ यश साजरे करावे की नाही अशा भावना सिंधूने प्रामाणिकपणे व्यक्त केल्या असल्या तरी देशाने मात्र तिचे यश उत्साहात साजरे केले. माध्यमांमध्ये तिच्याविषयी भरभरून लिहिले आणि बोलले गेले.

- Advertisement -

सिंधूचा विजय हा भारताचा गौरव आहे असे पंतप्रधान मोदी यांनीही म्हंटले आहे. सिंधूला ‘चाईल्ड प्रॉडिजी’ Child Prodigy म्हणजे असाधारण प्रतिभाशाली बालक मानले जाते. तिच्या प्रत्येक लढतीतून ती ते दाखवून देते. टोकियो ऑलिम्पिकच्याच उपांत्य सामन्यात चायनीज तैपेईच्या ताई जू यिंग Tai Xu Ying ने तिचा पराभव केला होता. ताई जगातील पहिल्या क्रमांकाची खेळाडू मानली जाते. सिंधू आणि ताईमध्ये आत्तापर्यंत 19 सामने झाले. त्यात सिंधू फक्त पाच सामने जिंकू शकली. टोकियो ऑलिम्पिकमध्ये याच ताईने तिचा पुन्हा एकदा पराभव केला. यानंतर एखादी खेळाडू निराश झाली असती. तथापि पराभवानंतरच्या चोवीस तासात सिंधूने बॅडमिंटनच्या कोर्टावर आक्रमक आणि अचूक खेळ करून कांस्यपदकाची कमाई केली.

गतवर्षीच्या रियो ऑलिम्पिकपूर्वी तिला दुखापत झाली होती. सहा महिने तिला खेळाचा सराव करणे अशक्य झाले होते. तरीही तिने त्या ऑलिम्पिकमध्ये रजत पदकाची कमाई केली. ती तासनतास एकाग्रतेने सराव करू शकते. वयाच्या आठव्या वर्षी तिने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. दहाव्या वर्षी ती गोपीचंद अकादमीत दाखल झाली होती. वयाच्या अठराव्या वर्षी तिने वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये कांस्य पदक जिंकले होते. आणि असे करणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू होती. ‘फोर्ब्ज’च्या 2018 साली सर्वाधिक कमाई करणार्‍या जगभरातील महिला खेळाडूंची यादी फोर्ब्जने जाहीर केली होती. त्या यादीत सिंधू तेराव्या स्थानी होती. तिला आत्तापर्यंत राजीव गांधी खेलरत्न, पद्श्री,अर्जुन अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे.

वयाच्या पंचविशीत या सगळ्या प्रकाशझोताचे दडपण येत नाही का? असा प्रश्न एकदा तिला विचारला तेव्हा तिने बॅडमिंटनबद्दलची तिची आवड आणि सलग निष्ठा कारणीभूत आहे असे सांगितले होते. फक्त खेळाचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे बॅडमिंटनसाठी माझी अन्य कुठलीही आवड बाजूला सारावी लागली नाही. असेही ती म्हणाली होती. भारतीयांना फक्त क्रिकेटचं आवडते असे म्हंटले जाते. तथापि अभिनव बिंद्रा, सायना नेहवाल, मेरी कोम, सिंधू अशा खेळाडूंमुळे इतरही खेळ भारतात लोकप्रिय आहेत हे क्रीडाप्रेमी रसिकांना ठाऊक आहे पण फक्त सामने बघणारे रसिक त्याबाबत जाणून घेण्यास फारसे उत्सुक नसतात.

यश मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे अथक मेहनत करावी लागते हे खेळाडूंनी आणि त्यांच्या संघटनांनी देखील लक्षात घ्यायची गरज आहे. 120 कोटी लोकसंख्या असणार्‍या देशाची ऑलिम्पिक पदकांची प्राप्ती मात्र जेमतेमच का आहे याचा विचार विविध क्रीडा संघटना आणि सरकार आता तरी करेल का? फक्त कुणा खेळाडूने विशेष यश मिळवले की त्याचे अभिनंदन करण्यात पुढे असणारी नेतेमंडळी देशातील खेळांच्या विकासासाठी काही प्रयत्न करतांना क्वचितच आढळतात. अशा नेतृत्वाकडून खेळाडूंनी प्रोत्साहनाची अपेक्षा तरी किती करावी?

- Advertisment -

ताज्या बातम्या