सामाजिक सुधारणांचे लखलखीत कवडसे!

सामाजिक सुधारणांचे लखलखीत कवडसे!

भारताला सामाजिक चळवळींचा फार मोठा इतिहास आहे. या चळवळींनी सामाजिक परिवर्तनाचा पाया रचला. सती प्रथा विरोध, विधवा विवाहाला चालना, बालविवाहाला प्रतिबंध, एकल महिलांना पुनर्विवाहाचा हक्क मिळवून देणे, अस्पृश्यतेला विरोध, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे, आंतरजातीय विवाहाला मान्यता अशी याची कितीतरी उदाहरणे. एवढेच कशाला पर्यावरण संवर्धन करणार्‍या ‘चिपको आंदोलन’ सारख्या चळवळीमध्ये सुद्धा अनेक महिलांना सक्रीय सहभाग घेतला. सामाजिक परिवर्तन घडवणे हा शब्द वाचण्याइतके प्रत्यक्ष परिवर्तन घडवणे मात्र सोपे नाही. परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करणारांना नानाविध अडचणींचा सामना सतत करावा लागतो.

सनातनी समजुतींखाली दबलेल्या समाजाच्या विरोधाला तोंड द्यावे लागते. बहुधा म्हणुनच सामाजिक जागरुकता ही निरंतर चालणारी प्रकिया मानली जाते. चळवळीचा आणि सामाजिक जागरुकतेचा आधार घेत अनेक अनिष्ट रुढी आणि परंपरांना कायमची मुठमाती देण्याचे प्रयत्न केले व आजही सुरु आहेत. स्त्रियांच्या मासिकपाळीशी संबंधित अनेक बुरसट प्रथा आजही पाळल्या जातात.

या विषयावर चर्चा करणे आताच्या बदललेल्या परिस्थितीतही अयोग्य मानले जाते. अनेक घरांमध्ये मुलींनी या विषयावर चर्चा करणे म्हणजे मुलींचा आगाऊपणा मानला जातो. याकाळात अनेकींना शारीरिक त्रास होतात. मानसिक परिणामही जाणवतात. पण त्यावर चर्चा होणे सुद्धा अशक्यच! त्यामुळेच असा त्रास होणार्‍या महिलांना ‘तोंड दाबून बुक्क्याचा मार’ सहन करावा लागतो.

हरियाणा राज्यातील बीबीपूर गावातील सामाजिक कार्यकत्याचे या परिस्थितीकडे लक्ष वेधले गेले. त्यांनी त्यात बदल घडवण्याचा निर्धार केला. त्यांनी मासिक पाळीच्या चक्राचा एक तक्ता तयार केला. गावातील तरुणींनी तो घरात लावावा यासाठी प्रयत्न सुरु केले ते वर्षे होते 2019. सुरुवातीला या उपक्रमाला परंपरावाद्यांनी प्रखर विरोध केला. ज्या विषयावर मोकळेपणाने बोलणे देखील अशक्य त्याविषयाचा तक्ता घरात लावायला तरुणीही सुरुवातीला अवघडल्या. तथापि सामाजिक स्वयंसेवकांनी प्रयत्न सोडले नाहीत. गेल्या तीन वर्षात हरियाणासह उत्तरप्रदेश आणि तेलंगणा राज्यातील साधारणत: तीस हजारांपेक्षा जास्त तरुणी या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. त्यांनी त्यांच्या घरात मासिक पाळीचा तक्ता लावला आहे. या तक्त्यामुळे मासिक पाळीशी संबंधित अनेक छोट्या-मोठ्या आजारांचे निराकरण वेळेवर होत असल्याची प्रतिक्रिया तरुणींनी माध्यमांकडे व्यक्त केली.

स्त्रिया शिकल्या तरच समाजाची प्रगती होईल या धारणेने महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी चळवळ सुरु केली होती. त्यासाठी प्रसंगी समाजाकडून दगडगोट्यांचा माराही सहन केला. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात महिलांचे बचतगट आहेत. बचतगटांच्या 700 पेक्षा जास्त महिला सदस्यांनी ‘सावित्रीच्या लेकी’ बनायचा निर्धार केला आहे. यातील बहुतेक महिलांना अक्षरओळख नव्हती. त्यामुळे बचतगटांशी संबंधित कागदपत्रांवर त्या सहीची निशाणी म्हणून अंगठा उमटवीत. पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांच्या प्रयत्नांमुळे या महिलांची ‘अंगठेबहाद्दर’ ही ओळख बरीचशी पुसट झाली आहे. या महिला साक्षर होत असून स्वाक्षरी करायला शिकल्या आहेत.

शिक्षणाचा वसा पुढे सुरुच ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे. समाजपरिवर्तनाचे शिवधनुष्य पेलताना अडचणी येणारच. तथापि ते धनुष्य पेलण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करणारे प्रकाशाचे हे छोटे छोटे कवडसे आहेत. त्यांच्या प्रकाशाची तिरीप इतरांना मार्ग दाखवू शकते. त्यामुळे सामाजिक चळवळींचा वारसा नेहमीच पुढे चालवला जात राहिल अशी आशा पल्लवित होते.

तळागाळातील लोकांनी त्यांच्यापुरते समाजसुधारणेचे काम सुरु केले आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांच्यामागे पाठबळ उभे करणे हे नेत्यांचे कर्तव्यच आहे. तथापि त्यांनाच ‘मुस्कटदाबी’ विरुद्ध आंदोलन करावे लागेल की काय अशी सद्यस्थिती आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींकडून सुद्धा परिवर्तनाच्या कार्यात फारसे काही घडू शकेल अशी आशा तरी कशी करावी? तेव्हा कार्यकर्त्यांनी व स्वयंसेवकांनी आपापले अथक प्रयत्न सतत चालू ठेवावेत हे बरे!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com