समाजमाध्यम साक्षरता हाच उपाय

समाजमाध्यम साक्षरता हाच उपाय

आक्षेपार्ह स्थितीतील छायाचित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याच्या धमकीमुळे पुण्यातील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. काही दिवसांपूर्वी याच परिसरातील एका 19 वर्षाच्या युवकाने आत्महत्या केल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. अश्लील व्हिडियो कॉल करुन त्याचे चित्रिकरण प्रसारित करण्याची धमकी देऊन खंडणी वसूल करण्याच्या घटनाही वाढत आहेत.

मुंबईमध्ये नुकतीच अशी घटना उघडकीस आली. मध्यंतरी घडलेल्या चंदीगड विद्यापीठातील अशाच एका प्रकरणाने समाजात चांगलीच खळबळ उडाली होती. अशा प्रकारच्या फसवणुकीचे अनेक दुष्परिणाम होतात. फसवणूक झालेली व्यक्ती नैराश्यात जाते. काही जण आत्महत्येचा प्रयत्न करतात. बदनामीच्या भीतीने अनेकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. समाजमाध्यमांचे चांगले उपयोग असले तरी ते दुधारी शस्त्र बनले आहे. समाजमाध्यमांवरील वावर हा गांभियाने घेण्याचा विषय आहे.

समाजमाध्यमांच्या जगाला आभासी जग म्हटले जाते. पण वास्तवातील जग आणि आभासी जगात फरक उरला आहे का? समाजमाध्यमांवरील तुमची प्रत्येक कृती (डिजिटल फुटप्रिंट) कधीही पुसली जात नाही. व्यक्तीने त्याच्या मोबाईल फोनमधून ती कृती काढून टाकली तरी समाजमाध्यमांवर मात्र ती कायमच असते. कधीतरी त्या कृतीचा गैरवापर होण्याचा धोकाही सतत वाढतच असतो. चोवीस तास आपण काय करतो हे समाजमाध्यमांवर टाकण्याकडे सर्वांचा, विशेषत: युवा पिढीचा कल असतो. त्यात वैयक्तिक आणि खासगी माहितीचा देखील समावेश असतो. आर्थिक बाबींची चर्चाही अगदी खुलेपणाने केली जाते. दोन व्यक्तींमधील संवाद इतरांना समजणार नाही हा भ्रम आहे असे सायबर तज्ञ सातत्याने सांगतात.

सायबर जगात वैयक्तिक असे काहीच नसते. म्हणुनच त्याला समाजमाध्यम म्हणतात. त्यामुळेच त्यांचा वापर विवेकाने केला जायला हवा. वैयक्तिक माहिती, खासगी छायाचित्रे  समाजमाध्यमावर टाकू नयेत. प्रसंगी त्याचा गैरवापर होऊ शकतो हे पुण्यासारख्या अनेक घटनांमधून समोर आले आहे. अशा घटनांमध्ये सायबर पोलीस कारवाई करतच असतात. तथापि गुन्हेगारी प्रवृत्तीने माहितीचा गैरवापर करण्यापेक्षा आपण काय शेअर करतो आहोत याचे भान सायबर जगात वावरताना युवा वर्गाने ठेवायलाच हवे.

सायबर जगात ‘डार्क वेब’ नावाचे खूप मोठे जाळे कार्यरत आहे. ज्याला सर्व प्रकारच्या गुन्हेगारीचा अड्डा मानले जाते. समाजमाध्यमे हे त्या हिमनगाचे वरचे टोक आहे. समाजमाध्यमांवरील वावर कळत-नकळत त्या गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकवू शकतो हे वापरकर्त्यांनी लक्षात घेण्याची गरज आहे. पालकांनाही जागरूक राहायला हवे. मुलांनी समाजमाध्यमांचा वापर विवेकबुद्धीने करावा यासाठी त्यांच्याशी सातत्याने संवाद साधायला हवा. सामाजिक संस्थांनाही यात पुढाकार घेता येऊ शकेल. समाजातील सर्व घटकांसाठी समाजमाध्यम साक्षरतेचा प्रसार सातत्याने करायला हवा.

समाजमाध्यमे हे आभासी जग नाही हे वापरकर्त्यांच्या मनावर ठसवायला हवे. सायबर जगात आपण कसे वावरतो आहोत याविषयी वापरकर्त्यांमध्ये साक्षरता आणि जागरुकता निर्माण करणे हे संबंधित सर्व घटकांची जबाबदारी आहे. ती पार पाडली न गेल्यास सायबर गुन्हेगारीला आळा कसा बसू शकेल?

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com