Tuesday, April 23, 2024
Homeअग्रलेखकरोनाचे सामाजिक उपकार!

करोनाचे सामाजिक उपकार!

वाईटातून कधीकधी चांगलेही निष्पन्न होते असे बोलले जाते. विजिगिषु वृत्तीचे माणसे संकटातूनही संधी निर्माण करतात. करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात समाजावर नकारात्मक परिणामच जास्त जाणवले.

लाखो लोकांचे रोजगार गेले. कित्येकांच्या जगण्याचा आधार गेला. लोकांचे रोजचे जगणे कठीण झाले. हे परिणाम आगामी काही काळ जाणवतच राहातील. आगामी काळात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता शासनाने वर्तवली आहे. पण लोक आता या वातावरणाला आणि करोनाला कदाचित सरावले आहेत. करोनाची दहशत कमी होताना दिसत आहे. सुरुवातीच्या काळात करोनाचे रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याच्या घटना घडल्या. पण आता एखाद्या इमारतीत करोनाचा रुग्ण आढळला तरी त्या इमारतीतील इतर रहिवाशांची प्रतिक्रिया बदलली आहे.

- Advertisement -

प्रारंभीच्या काळात करोनाबाधित व्यक्तीशी संपर्क ठेवण्यासही लोक घाबरत. आता ती धास्ती कमी झाली आहे. अशा बाधितांना मदतीचा हात पुढे केला जात आहे. करोनाची दुसरी लाट आली तरी लॉकडाऊन मात्र नको असे ठाम मत लोक व्यक्त करत आहेत. अनेक जण स्वतःहून करोनाची चाचणी करून घेताना आढळतात. करोनामुळे समाजात काही चांगल्या सवयी रुजत आहेत. हात धुणे, सामाजिक अंतर पाळणे आणि तोंडाला मुसके बांधणे या गोष्टी आता अंगवळणी पडल्या आहेत. विवाहासारखे पारंपरिक सोहळे-समारंभाचे रितीरिवाजही बदलत आहेत. काही समाजात सध्याच्या काळातही विवाहसोहळे किमान 4-5 दिवस चालतात. हौसेला मोल नसते असे म्हंटले जाते.

अलीकडच्या काळात विवाहपूर्व ध्वनिचित्रफीत करणे, विशिष्ट पद्धतीने लग्न, विवाहानंतरच्या चित्रफिती (प्री वेडिंग शूट, थीम बेस मॅरेज, पोस्ट वेडिंग शूट) अशा नव्या खर्चिक प्रथा रुजत आहेत. शाही विवाह सोहळे पार पडत आहेत. लग्नसोहळे दोन कुटुंबांपुरते मर्यादित राहिले नसून ते प्रतिष्ठेचे मानक बनत आहेत. शाही विवाह, मानपान, त्यावरून क्वचित काही ठिकाणी होणारे वाद हे ओघाने आलेच. करोनाने या प्रथा-परंपरांनाच धक्का दिला आहे. पायाला स्पर्श करून नमस्कार, गळाभेट, व्याह्यांचे पाय धुऊन गंध लावून स्वागत करणे या प्रथांची सुद्धा दहशत निर्माण झाली आहे. नमस्कार आणि आशीर्वाद दुरूनच पार पडत आहेत. राजस्थानमध्ये नव्या रीतीभाती निर्माण झाल्या आहेत.

विवाहसोहळ्यातील वर्‍हाडींच्या संख्येवर सरकारने बंधन घातले आहे. जे आप्तेष्ट विवाहसोहळ्यात सहभागी होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी विवाह सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. लग्नपत्रिकेवर त्याची लिंक आणि पासवर्ड छापले जाते आहेत. अनेक ठिकाणी विवाहसोहळ्याच्या भोजनाची पाकिटे नातेवाईकांना घरपोच केली जात आहेत. लग्नपत्रिकेवर म तुमचे आरोग्य महत्वाचे म असे छापले जात आहे. तुम्ही घरी बसूनच सोहळ्यात सहभागी व्हा आणि भोजनाचा आनंद लुटा अशी विनंतीही पत्रिकेत नमूद केली जात आहे. पूर्वी लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ शूटिंग केले जायचे. आता थेट प्रक्षेपणाची मागणी सुरू झाल्याची प्रतिक्रिया या क्षेत्रातील व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ दिगदर्शक आणि निर्माते रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेने समाजावर नजीकच्या भूतकाळात गारुड केले होते. या मालिकेचा पगडा इतका होता की या मालिकेचे प्रक्षेपण सुरु झाले कि रस्ते ओस पडत असे सांगितले जाते.

या मालिकेमुळे मुले आपल्या आईवडिलांना माताश्री, पिताश्री म्हणू लागली होती. तरुण पिढी ज्येष्ठांसमोर वाकून पायाला हात लावून नमस्कार करू लागली, आशीर्वाद मागू लागली होती. या मालिकेतील प्रभू रामचंद्र आणि सीतामाता यांच्या विवाहसोहळ्याप्रमाणेच आपले लग्न व्हावे असे तरुणांना वाटायचे. तरुणांमधील या बदलाने तत्कालीन ज्येष्ठ मंडळी सुखावली नसतील तरच नवल. तथापि करोनामुळे आता वाकू नका असे सांगायची वेळ आली आहे. करोनाची साथ संपली तरी हे बदल मात्र कायमच राहावेत अशीच विशेषतः वधूच्या मातापित्यांची इच्छा असेल. वाईटातून चांगले निष्पन्न होणे यालाच म्हंटले जात असेल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या