Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखशार्विलकांचे लक्ष आता माश्यांकडेसुद्धा!

शार्विलकांचे लक्ष आता माश्यांकडेसुद्धा!

जगाच्या पाठीवर नाना तर्‍हेच्या जाती-जमाती वस्ती करून आहेत. काही जंगलात राहणे पसंत करतात तर काही गावे आणि शहरांत! काहींना भटकेपणाच आवडतो. मात्र एकाद-दोन जमाती अशा आढळतात की त्यांना कुठेच परकेपणा वाटत नाही. चोर म्हणून ओळखली जाणारी जमात अशीच सर्वत्र संचार करणारी!

अर्थात त्या-त्या देशातील जीवनमान आणि आर्थिक स्थितीनुसार कोणत्या वस्तूंवर डल्ला मारायचा याचा विवेक चोरांनाही पाळावा लागतो. सभ्य आणि कायदे-नियमांचे पालन करणारी पापभिरू माणसे कुटुंबाच्या चरितार्थासाठी नोकरी-धंदा, छोटा-मोठा उद्योग-व्यवसाय करतात. चोरी करणे हादेखील चोरजमातीचा घरंदाज व्यवसायच आहे. सुटीचा आनंद उपभोगण्यासाठी घराबाहेर गेलेल्या नागरिकांना ते मनापासून दुवा देतात. ‘घर आपलेच आहे’ या सुसंस्कृत मंडळींच्या संस्कारांचा चोर पुरेपूर आदर करतात. ‘आराम हराम आहे’ यावर चोरांची ठाम निष्ठा असते. ‘उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी वास करे’ हा सुविचार त्यांना व्यवहारिकदृष्ट्या वास्तववादी वाटतो. ‘चोराच्या मनात चांदणे’ अशी म्हण प्रचलित आहे, पण आजकाल दिवसाढवळ्या, लख्ख उजेडीसुद्धा ‘हातसफाई’ करण्याचे कसब शार्वलिकांनी अवगत केले आहे.

- Advertisement -

साहजिकच ‘चांदण्यांचे भय’ ही आता दंतकथा बनली आहे. चोरीच्या इराद्याने घराबाहेर पडले तर सहसा रिकाम्या हाती परतायचे नाही, हाती लागेल ते मिळवायचे, संधी मिळेल तिथे हात मारायचा आणि सहीसलामत पोबारा करायचा; एवढेच त्यांचे ध्येय असते. चोरीच्या पेशाचा तो दंडकच असावा. येवला तालुक्यातील नायगव्हाणमधली परवाचीच चोरीची घटना पाहा ना! ती ऐकून आणि वृत्तपत्रांमध्ये वाचून बहुतेक जण आवाक झाल्याशिवाय राहिले नसतील. नायगव्हाण ग्रामपंचायतीने मत्स्य व्यवसायासाठी गावातील पाझरतलावांचे लिलाव वर्षभरासाठी केले आहेत. गावातील दोन युवकांनी मत्स्यपालनासाठी लिलाव घेऊन ‘आत्मनिर्भर’ बनण्याचा निर्धार केला. दोन लाखांची गुंतवणूक केली.

माशांना चांगला भाव आणि मागणी असल्याने चांगली कमाई होईल या आशेपोटी विविध जातीच्या माशांची बीजे तलावात सोडली. तलावात सोडलेल्या मत्स्यबीजांपासून आता अर्धा ते एक किलो वजनाचे मासे तयार झाले होते. आपला व्यवसाय यशस्वी होणार आणि मत्स्यविक्रीतून चांगले उत्पन्न मिळणार या आशेने दोघे युवक खुशीत होते, पण काही कामानिमित्त त्यांना बाहेरगावी जावे लागले आणि चोर मंडळींचे व्यवस्थित फावले. रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवून दोन-तीन रात्री पाझर तलावात जाळे टाकून त्यांनी माशांवर डल्ला मारला. चोरी झाल्याचे ओळखून युवकांनी पोलिसांत धाव घेतली आहे. ‘बर्ड फ्लू’मुळे कोंबड्यांवर संक्रांत आल्याने खवय्ये मासे-मटणाचा पर्याय स्वीकारत आहेत.

चोरांनी ती बाब हेरली असावी. नित्याच्या व्यवसायात त्यामुळे एका नव्या वस्तूचा चोरीसाठी समावेश झाल्याच्या आनंदात त्यांनी तलावातील माशांची पळवापळवी केली असेल का? घरातील मौल्यवान चीजवस्तू चोरीला जाऊ नयेत म्हणून त्या काडी-कुलुपात लपून ठेवल्या जातात, पण चलाख चोर त्यादेखील हुडकून काढतात. चौर्यचातुर्याच्या अशा कथा अनेक बिरबलांनी गोष्टीतील बादशहांना ऐकवल्याच्या कथा पिढ्यानपिढ्या मिटक्या मारीत चघळल्या जातात. अधिक सुरक्षित उपाय म्हणून बँकांनी ग्राहकांसाठी लॉकर्सची सोय केली. मात्र बँकाही आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. लोक पैसे-आडके, दाग-दागिने बँकांमध्ये ठेवतात; म्हणून चोरांनी बँकांकडेच मोर्चा वळवला आहे. बँकांवर दरोडे टाकून मोठे घबाड एकाच जागी चोरांच्या हाती लागते. हल्ली कोणत्या वस्तूची चोरी होईल याचा नेम नाही.

मौल्यवान वस्तू अथवा पैशांची चोरी होणे ही काही नवी गोष्ट नाही. गावाकडे कधी-कधी शेतातील उभ्या पिकांची रात्रीतून चोरी होते. दावणीला वा गोठ्यात बांधलेल्या शेळ्या-मेंढ्या, गाय, बैल, म्हैस तसेच खुराड्यातील कोंबड्यांच्याही चोर्‍या होतात. नव्या आर्थिक धोरणामुळे दैनंदिन वापरातील किरकोळ वस्तूसुद्धा बहुमोल बनल्या आहेत हे चोरांचे भाग्यच! हल्लीच्या महागाईच्या जमान्यात वाहनांतील पेट्रोल-डिझेलच्या चोर्‍या होतात. काही धोरणी चोर तर दुचाकी-चारचाकी वाहनेच पळवून नेतात. कांदा महागला म्हणून शेतातील कांदा किंवा कांदा भरलेला ट्रकसुद्धा पळवला जातो. पिण्यासाठी किंवा पिकांसाठी कालव्यातून सोडल्या जाणार्‍या पाण्याची चोरी होते. सरकारच्या उत्पादनशुल्क खात्याने जप्त करून गोदामात ठेवलेल्या मद्याच्या बाटल्यासुद्धा चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. खिसा-पाकीट, पर्स चोरी नित्याचीच! रस्त्याने जाणार्‍या बाया-बापड्यांच्या गळ्यातील ‘सौभाग्यलेणी’ दुचाकीवरून चपळाईने हिरावणार्‍या चोरांचा हल्ली सर्वत्र संचार सुरु असतो. गावातील रस्ता, सरकारी योजनेतील विहीर अथवा घरकुले चोरीस गेल्याच्या तक्रारीही केल्या जातात.

एवढेच कशाला, हल्ली तर मंत्रालय किंवा सरकारी कार्यालयांमधून महत्वाच्या अथवा वादग्रस्त प्रकरणांच्या नस्तीदेखील चोरीस गेल्याचे वा गहाळ झाल्याचे प्रकार उघडकीस येतात. राजकारणात आमदारांची पळवापळवी करून बहुमताची चोरी होतेच ना? चोरांना देवांचेही भय वाटेनासे झाले आहे. ‘देवाचिया दारी’सुद्धा देवांच्या दागिन्यांची आणि खुद्द देवांच्या मूर्तींची चोरी करायला चोरांचे हात थरथरत नाहीत. तिथे हाडामासाच्या माणसांची काय कथा? ‘करोना’वरील लस पुण्यातून देशाच्या विविध भागांत पाठवली जात आहे.

या लसीच्या ट्रक्सनासुद्धा चौर्यचातुर्यापासून बचाव करण्यासाठी पोलीस संरक्षण दिले गेले आहे. लसीचे महत्व आणि अमूल्यता लक्षात घेता लसीवरसुद्धा चोरांची वाकडी नजर पडण्याची धास्ती कदाचित सरकारी यंत्रणांना असावी. एकूण काय, आधी कांदे चोरीस गेले. काल मासे चोरीस गेले. माशांसारख्या खाद्यवस्तूंची चोरी तर फारच सुरक्षित! एकदा का कोणा मत्स्यप्रेमींच्या उदरात स्थान मिळाले की सर्व काही सुरक्षित! चोरीच्या वेगवेगळ्या घटना आणि चोरांच्या करामती पाहता आपल्या देशात आणखी काय-काय चोरीस जाईल याचा भरवसा नाही. जिवंत खाद्याच्या चोरीने ते सिद्ध केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या