रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर आव्हान!

रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर आव्हान!
रेल्वे

कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यात केंद्र आणि राज्य सरकारांना बरेच यश मिळत असल्याचे घटत्या रुग्णसंख्येवरून स्पष्ट होत आहे. याउलट गुन्हेगारीची महामारी मात्र मोकाट सुटली आहे. देशाच्या विविध भागात महिला, मुले व इतर समाजघटकांवरील अन्याय-अत्याचारांच्या घटना पुन्हा वाढत आहेत.

उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये आंदोलन करणार्या शेतकर्यांवर चारचाकी चालवून एका केंद्रीय मंत्रिपुत्राने महापराक्रम केला. त्या हिंसक घटनेने देश हादरला आहे. सर्वत्र त्याचे पडसाद उमटत असताना महाराष्ट्रातही स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटना घडत आहेत. मुंबई-ठाणे परिसरात अशा घटनांनी राज्यभर संतप्त प्रतिक्रिया अजूनही व्यक्त होत आहेत.

मराठी जीवन ढवळून निघाले आहे. त्याचवेळी धावत्या प्रवाशी रेल्वेला दरोडेखोरांनी लक्ष्य करण्याची घटना सायंकाळी सहानंतर इगतपुरीहून मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये इगतपुरी-कसारादरम्यान नुकतीच घडली. आठ दरोडेखोर इगतपुरीतून या रेल्वेगाडीत शिरले. शस्त्रांचा धाक दाखवून व मारहाण करून त्यांनी प्रवाशांना लुबाडले. प्रवाशांचे मोबाईल, पैसे आदी लुटण्यासोबत एका प्रवासी महिलेची अब्रूही त्या नराधमांनी लुटली.

काही महिलांचा विनयभंगही त्यांनी केल्याचे माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांवरून समजते. दरोडेखोरांचा हा धिंगाणा तासभर चालू होता. रेल्वेडब्यात अनेक प्रवासी होते, पण दरोडेखोरांकडील शस्त्रे व मारहाणीच्या भीतीने त्यांना कोण प्रतिकार करणार? कसारा स्थानकावर गाडी थांबताच दरोडेखोर पळून जाताना काही तरुणांनी दोन दरोडेखोरांना पकडून पोलिसांच्या हवाली केले.

पकडलेल्या दरोडेखोरांनी दिलेल्या माहितीवरून आणखी दोन जणांना पोलिसांनी पकडले. सात दरोडेखोर घोटी परिसरातील तर एक जण मुंबईचा असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. सायंकाळचे सहा-सात वाजेची वेळ तशी फार नाही. रेल्वेडब्यात शे-पन्नास प्रवासी सहज असतात. असे असताना दरोडेखोरांपुढे सगळेच गप्प कसे राहिले?

त्यापैकी काही प्रवाशांनी धाडस केले असते तर कदाचित दरोडेखोरांनी पळ काढला असता व पुढील अनर्थही टळला असता. अर्थात आपल्या मुक्कामाजवळ पोहोचत असलेल्या बेसावध प्रवाशांना ते धाडस कसे सुचवणार? रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाकडून दरवर्षीच्या अर्थसंकल्पावेळी मोठमोठ्या घोषणा केल्या जातात, पण त्यांची अंमलबजावणी का होत नाही?

सगळ्या सुरक्षा योजना कागदावरच का राहतात? प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लांबपल्ल्याच्या गाड्यांमध्ये रेल्वे सुरक्षा बलाचे जवान तैनात असतात व ते गस्त घालून लक्ष ठेवतात, असे सांगितले जाते. आरक्षित डब्यांसाठी तिकीट निरीक्षक नेमलेले असतात. पुष्पक एक्स्प्रेसवर दरोडा पडत असताना रेल्वे सुरक्षा बलाचे जवान कुठे गेले होते?

प्रवासी सुरक्षेपेक्षाही अधिक महत्त्वाच्या अशा कोणत्या कामात ते व्यस्त होते? ताब्यातील दरोडेखोरांकडून माहिती मिळवून पळून गेलेल्यांच्या मुसक्याही पोलीस लवकरच आवळतील. या घटनेप्रकरणी लूटमार, मारहाण आणि अत्याचाराचा गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात नोंदवला गेला आहे. तथापि दरोडेखोर इगतपुरी स्थानकातून रेल्वेत बसल्याने इगतपुरीतील रेल्वे सुरक्षा बलाप्रमाणे नाशिक शहर व ग्रामीण पोलिसांनादेखील ही घटना सतर्क करणारी आहे.

या दरोडेखोरांनी आधीसुद्धा अनेक ठिकाणी किंवा धावत्या रेल्वेगाड्यांमध्ये धूमाकूळ घालून लूट आणि स्त्रियांवर अत्याचार केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस तपासात ते सगळे उघड होईलच, पण पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रकारामुळे प्रवासी गाड्या आणि प्रवाशांच्या सुरक्षेबाबत खूप मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे.

नाशिक-मुंबई रेल्वेप्रवास अधिक जोखमीचा झाला आहे हेच ही घटना सूचित करीत नाही का? लोहमार्ग पोलीस आपल्या परीने या प्रकरणाचा तपास करतीलच, पण नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांनीसुद्धा याबाबत सावध होण्याची गरज आहे.

विविध घटनांवरून राज्य सरकारवर निशाणा साधणारे व राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेवर बोट ठेवणारे विरोधक रेल्वेतील लूट व अत्याचाराच्या घटनेबद्दल केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधण्याचे काम पुरेशा गांभीर्याने व आक्रमकपणे करतील का?

Related Stories

No stories found.