Saturday, April 27, 2024
Homeअग्रलेखसत्वपरीक्षा देवांची की भक्तांची?

सत्वपरीक्षा देवांची की भक्तांची?

‘कोरोना’मुळे कुलुपबंद झालेली कवाडे टप्प्याटप्प्याने, आवश्यक खबरदारी घेऊन सावधगिरीने उघडली जात आहेत. ‘कोरोना’ उद्रेक होण्यास निमित्त मिळू नये म्हणून सुरक्षित अंतर पालन व मुसके वापराची काळजी सर्वांनी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी याबाबत विशेष दक्ष राहावे यावर भर दिला जात आहे.

बाजारपेठा, बस व रेल्वे वाहतूकसेवा हळूहळू पूर्ववत बहाल केल्या जात आहेत. महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे उघडण्याची बहुप्रतिक्षित मागणी अखेर पूर्ण करण्याचेही सरकारने ठरवले आहे. ‘मंदिरे उघडा’ अशी मागणी भाविक, ‘देवभोळे’ विरोधी पक्षांचे नेते आणि विशेषत: मंदिरांवर रोजीरोटी अवलंबून असलेल्या व्यावसायिकांकडून केली जात होती. ठिकठिकाणी संबंधितांनी आंदोलनेही केली. सरकारवर बरीच टीका-टिप्पणीही केली गेली. ‘मद्यालये उघडली आहेत. मग देवालये का उघडत नाही?’ अशा प्रश्नांचा भडीमार विरोधी पक्षांतील ‘भक्त-भाविकां’कडून सरकारवर होत होता. सरकारच्या भूमिकेबद्दल संशयी नजरेने पाहिले जात होते. हल्ली सरकारऐवजी ‘राज’दरबारी किंवा ‘राजभवनी’ आपले प्रश्न घेऊन जाण्याचे नवे खूळ काही ‘विशिष्ट’ नेत्यांना लागले आहे. त्यामुळे तुरुंगातील काही कैद्यांच्या तब्येतीची खास काळजी घेण्याच्या सूचनाही सरकारला केल्या गेल्या.

- Advertisement -

मंदिरे उडण्याचा मुद्दाही राजभवनात पोहोचला. विरोधी पक्षाची नेतेमंडळी राज्यपालांचे कान फुंकत होती. ‘तुम्ही आता सेक्युलर झाला आहात का?’ असा सवाल मुख्यमंत्र्यांना विचारण्याचा अनाधिकारी उपद्व्यापसुद्धा भोळेभाबडेपणे घडला. ‘आरे’ला ‘कारे’ म्हणण्याची संधी मुख्यमंत्र्यांना अनायसेच मिळाली. राजभवनाचे निधर्मीपण त्या प्रकरणातून उजळून निघाले. परिस्थितीचा अंदाज घेऊनच सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय सरकारने आता घेतला आहे. दिवाळी-पाडव्याच्या मुहूर्तावर देवालये आज खुली होणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा नुकतीच केली.

‘हा केवळ सरकारी आदेश नसून ही ‘श्रीं’ची इच्छा समजावी’ असेही मुख्यमंत्र्यांनी भाविकांना नम्रपणे सुचवले आहे. ‘दिवाळीचे मंगलपर्व सुरू झाले आहे. प्रथेनुसार अभ्यंगस्नान आणि नरकासुराचा वधही झाला. मात्र ‘कोरोना’रुपी नरकासुराने वर्षभर घातलेला धुमाकूळ विसरता येत नाही. त्याबाबत बेसावधही राहून चालणार नाही. आता प्रार्थनास्थळे उघडली जात असली तरी प्रवेश करताना तोंडावरील मुसके महत्त्वाचे आहे हे विसरू नका’ असे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. प्रार्थनास्थळांत प्रवेश करताना तोंडावरील मुसके सक्तीचे आहे याचीही जाणीवही त्यांनी करून दिली.

दिवाळीनंतरच मंदिरे उघडली जातील, असे संकेत सरकारने याआधी दिले होते. तथापि दिवाळी सणाला देवालयात दर्शनासाठी वर्दळ वाढते. ते लक्षात घेता सरकारने दिवाळी पाडव्यापासून देवदर्शनाची संधी भाविकांना उपलब्ध करून समतोल साधला आहे. त्यामुळे निदान दिवाळीत तरी देव ‘करोना’मुक्त राहिले. ‘कोरोना’वरील लस संशोधनाने जोर पकडला आहे, पण ती लस सर्वांसाठी केव्हा उपलब्ध होईल ते अजून निश्चित नाही. अशा अनिश्चिततेच्या वातावरणात ‘करोना’ची दुसरी लाट येण्याची शक्यता नेतेमंडळी व्यक्त करीत आहेत. तसे कदाचित घडल्यास देवालये उघडण्यास भाग पाडले गेले; म्हणून ‘करोना’ला पुन्हा बळ मिळाल्याचे खापर भाविकांवर फोडणे सरकारला सोपे जाईल, असेही म्हटले जात आह.

अभाविक मंडळींना भाविकांच्या श्रद्धेला कमकुवत ठरवण्याचे निमित्तही मिळेल. गेले आठ महिने मंदिरात कोंडलेले देव आता मुक्त होणार आहेत. मात्र ‘कोरोना’चा राक्षस पुन्हा आक्रमक झाला तर त्या संकटातून देवांचे रक्षण करण्याची जबाबदारी भक्तांवर येऊन पडेल. ‘देव तर भक्तांना तारणारच’ ही श्रद्धादेखील उजळून निघण्याची एक वेगळीच संधी भक्तांसोबत देवांनाही मिळणार आहे. मिळून काय, सत्वपरीक्षा देवांची की भक्तांची? याकडे सामान्य भाविकांचे लक्ष असेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या