झाडांच्या रूपाने ते श्वास पेरतात

झाडांच्या रूपाने ते श्वास पेरतात

निसर्गाचे आणि माणसाचे ऋणानुबंध वेगळे समजावून सांगण्याची गरज नाही. लहानपनापासूनच माणसे ते शिकत आली आहेत. झाडं सावली आणि फळं देतात. त्यांच्यामुळे हवा शुद्ध राहते. जमिनीची धूप थांबते. पूर येत नाहीत. झाडांपासून औषधे व लाकूड मिळते. झाड पशु-पक्ष्यांना आसरा देते. त्यांना अन्न पुरवते. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' असे संत तुकाराम महाराजांनी म्हंटलेच आहे. झाडाजवळ जे असते ते सगळे माणसासाठीच असते असे म्हंटले तर ते वावगे ठरणार नाही. 'परोपकाराय फलन्ति वृक्षा' अर्थात वृक्ष परोपकारासाठीच फुलतात. वाढत्या काहिलीत झाडच माणसाला थंडावा देऊ शकते. भारतीय शास्त्रज्ञ डॉ.जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतींमध्ये जीव शोधला होता.

वनस्पतींना संवेदना असतात हे त्यांनी सिद्ध केले होते. जीवसृष्टीचे चक्र सुरळीत सुरु राहण्यात झाडे अनमोल भूमिका निभावतात. माणसाचे अस्तित्व झाडांवर अवलंबून आहे, ही जाणीव हळूहळू समाजात रुजत आहे. प्रयत्न केले गेले तर लोकसहभागातून वृक्षारोपण आणि त्यांचे संवर्धन यासाठी मोठी चळवळ उभी राहू शकेल. याच भावनेने एका कांचन वृक्षाला दसऱ्याच्या दिवशी बोडके होण्यापासून नाशिकच्या एका वृक्षप्रेमीने वाचवले. कांचन या वृक्षाची पाने आपट्याच्या पानासारखीच दिसतात. त्यामुळे या झाडाची पाने दसऱ्याच्या निमित्ताने अक्षरशः ओरबाडली जातात. सोसायटीच्या आवारातील कांचन वृक्षाबाबत तसे घडू नये यासाठी तेथील रहिवासी अनिता जोशी यांनी अभिनव शक्कल लढवली. कांचन वृक्षासाठी चक्क दोन दिवस स्वखर्चाने सुरक्षारक्षक नेमला.

त्यामुळे झाड बोडके होण्यापासून वाचले. कैक किलोमीटर जंगल वसवणारे अनेक अवलिया समाजात आढळतात. आसाम मधील जोरहाट परिसरात एका व्यक्तीने तब्बल काहीशे एकरावर जंगल एकट्याने फुलवले आहे. ते काम अजून सुरूच आहे. वातावरणात ऑक्सिजन कमी होऊ नये म्हणून दोन झाडे लावून ती जगवणे प्रत्येक विद्यार्थ्याला बंधनकारास करावे आणि जो हे नाकारेल त्याला चक्क नापास करावे असे मत त्यांनी एकदा व्यक्त केले होते. त्यामागची भावना लोक समजून घेऊ शकतील का? तोडण्यापासून झाडांना वाचवणारी अमेरिकेतील जुलिया हिल ते काम पार पडेपर्यंत चक्क झाडावरच राहात होती. वडाची झाडे लावणे आणि ती जोपासणे हेच ज्यांच्या जीवनाचे ध्येय आहे अशा थिमक्का यांचा परिचय वेगळा करून द्यायला हवा का? त्यांना लोक प्रेमाने 'सालुमार्दा' म्हणतात ‘सालुमार्दा’ या शब्दाचा अर्थ आहे, एका रांगेत लावलेली झाडं.

नाशिकमधील शेखर गायकवाड यांनी दोन डोंगरांवर जंगल फुलवले आहे. आधुनिक जगात सगळीच कामे आर्थिक तराजूत तोलली जातात. जंगल फुलवून, झाडासाठी सुरक्षारक्षक नेमून, झाडावर घर बांधून त्यांना काय मिळते? असा प्रश्न एखाद्याला पडणे स्वाभाविक. तथापि झाडे जगली नाहीत तर माणूस जगणार नाही याची त्यांना जाणीव आहे. झाडे लावणे आणि ती वाढवणे याला पर्याय नाही हेही त्यांना उमगले आहे. प्रसंगी खिशाला खार लावून देखील हिरवाई फुलवण्याचा वसा त्यांनी स्वीकारला आहे. झाडांच्या रूपाने ते मानवाच्या पुढच्या पिढ्यांचे श्वास पेरत आहेत. ते जपण्यासाठी लोकांनीही साथ द्यायला हवी. लोक त्यांच्या कामातून प्रेरणा घेतील आणि त्यांच्या परीने झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा प्रयत्न करतील

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com