Thursday, April 25, 2024
Homeअग्रलेखसचिनचा प्रेरणादायी उपक्रम  

सचिनचा प्रेरणादायी उपक्रम  

राज्यात सध्या ६५ हजार ८० प्राथमिक तर २२ हजार ३६० उच्च प्राथमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये लाखो विद्यार्थी शिकतात. काही प्रमाणात शहरी, ग्रामीण आणि अती दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी सरकारी शाळांचाच आधार असतो. सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा आणि  इमारतींच्या दुरवस्थेविषयी नेहमीच बोलले जाते.

नकारात्मक मुद्देच हिरीरीने मांडले जाताना आढळतात. त्यामुळेच पालकांचा खासगी शाळांकडे ओढा वाढत चालल्याचे सांगितले जाते. सरकारी शाळा इमारती, पडक्या आणि गळक्या खोल्या, परिसरातील अस्वच्छता याविषयी माध्यमात देखील वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध होत असते. ही परिस्थिती बदलणे हे सरकारचे कर्तव्य आहे. तथापि मुलांचे शिकणे सुरु ठेवणे ही समाजाची देखील जबाबदारी आहे. परिस्थिती सुधारण्यासाठी समाजाचा रेटा आणि पाठबळ देखील गरजेचे असते. जगप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्प (Tadoba Tiger Reserve) परिसरात अलिझंजा (Alizanja) गाव आहे. ताडोबा सफरीत सचिनने या शाळेला भेट दिली. त्यावेळी एका विद्यार्थ्याने सचिनच्या आत्मचरित्रातील एक प्रकरण सचिनला वाचून दाखवले होते. तेव्हा त्याने दप्तरे देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करून त्याने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि शाळेची दप्तरे वाटली. अनेक सामाजिक संस्था, व्यक्तिसमूह आणि व्यक्तिगत पातळीवर मदत केली जातेच. तथापि सरकारी शाळांचा ‘जगन्नाथाचा रथ’ सुरु ठेवण्यासाठी मदतीत सातत्य आणि नियोजन नेहमीच आवश्यक असते.

- Advertisement -

अनेक सरकारी शिक्षक प्रयोगशील आणि सर्जनशील आहेत. करोना काळात समाजाला याचा प्रभावी प्रत्यय आला. तेव्हाही आणि आत्ताही शिकणे आनंददायी व्हावे यासाठी हे शिक्षक अभिनव मार्ग शोधतात. वेगवेगळे प्रयोग करतात. नाशिकच्या त्रंबकेश्वर तालुक्यात हिवाळी गावात अशीच एक शाळा आहे. ही शाळा वर्षाचे ३६५ दिवस आणि रोज १२ तास भरते. या शाळेतील विध्यार्थी एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहू शकतात. सटाणा तालुक्यात भागंदर गावातील शाळेतील छोटे विद्यार्थीही नावाचे स्पेलींग तयार करतात. मोठमोठ्या संख्या वाचतात. ही कौशल्ये विकसित करण्यासाठी शिक्षकांनी दगड, गोट्या, झाडांच्या फांद्या अशा सहज उपलब्ध होऊ शकतील अशा गोष्टी उपयोगात आणल्या आहेत. 

करोना काळातही अनेकांनी ओट्यावर शाळा भरवली. काहींनी गावातील केबल टीव्हीचा उपयोग करून घेतला. काही शिक्षकांनी मोबाईलचा वापर केला. असे प्रयोग सातत्याने सुरु ठेवण्यासाठी आर्थिक आणि सामाजिक पाठबळाची आवश्यकता असते. शिक्षकांच्या सर्जनशीलतेला याची जोड नसेल तर ती निष्प्रभ ठरू शकते. त्यातूनच नकारात्मकता वाढण्याचाही धोका संभवतो. तसे घडू न देणे ही सरकारबरोबरच समाजाचीही जबाबदारी आहे.  सचिनने त्याचा मार्ग दाखवला आहे. तो प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. 

- Advertisment -

ताज्या बातम्या