खड्ड्यातील रस्त्यांचे ‘अती झाले आणि कवींना सुद्धा हसू आले’!

रस्ते आणि खड्डे याचे कवित्व वर्षानुवर्षे सुरुच आहे. कदाचित आणखीही शे-पन्नास वर्षे खड्ड्यांच्या संकटातून नागरिकांची सुटका होणार का हेही सांगणे कठीणच. दरवर्षी रस्ते खड्ड्यात जातात. खड्ड्यांमुळे अपघात होतात. अपघातात काहींचे दुर्दैवी मृत्यू ओढवतात. सरकार अपघातातील जखमींना किंवा मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना तुटपुंजी आर्थिक मदत जाहीर करुन मोकळे होते. रस्ते खड्डेमुक्त करावेत यासाठी लोकही निवेदने देऊन दमतात. दरवर्षी असे तेच ते आणि तेच ते घडते. या तोचतोचपणाचा सुद्धा सरकारला कंटाळा येऊ नये? शक्य झाले असते तर रस्ते खड्ड्यात जात नाहीत तर खड्डेच रस्त्यात येऊन पडतात असाही खुलासा सरकारने केला असता.

लोकांची ओरड चालते पण सरकारची कामाची गती कासवाच्याही पलीकडची. अगदी ढिम्म. त्या गतीची कोणाशीही तुलनाच होऊ शकत नाही. शासनाच्या कामाचा हा वेग नागरिकांना कधी ना कधी अनुभवाला येतोच. सात-आठ दिवसात जे काम होणे सहज शक्य असते त्या कामालाही सरकारी बाबू आठ महिने सुद्धा लावू शकतात. ते ही अगदी हसत हसत. मतदार यादीतील दिवंगत मतदाराचे नाव काढण्यासाठी किंवा अगदी किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी दिलेला अर्ज 7-8 वर्षे निकालात निघत नाही.

सरकारी कागदाअभावी एखाद्या विद्यार्थ्याचा शैक्षणिक प्रवेश रद्द होतो. काहींना सवलतीवाचून वंचित राहावे लागते. कोट्यवधींचा खर्च होऊनही बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू ओढवतो. रस्त्यातील खड्डे शब्दश: माणसांची पाठ धरतात. अनेकांना दवाखान्याच्या वार्‍या कराव्या लागतात. डॉक्टरही त्यावर इलाज करुन थकतात.

वाहनांमधील इंधनाचा धूर होतो तो वेगळाच. माणसांचे खिसेही हलके होतात. सरकारच्या या कासवगतीला वैतागून न्यायसंस्था देखील सरकारचे वाभाडे काढते. सरकारी योजना कागदावरच चांगल्या असतात असे शेरेही मारते. प्रेमाने बोलून झाले. निवेदनांचा पाऊस पाडून झाला. सरकारी सेवकांच्या तोंडाला काळे फासून झाले. त्यांना एका खोलीत डांबून पाहिले. पण म्हणतात ना, गाढ झोपलेल्या माणसाला झोपेतून उठवणे सोपे असते.

पण झोपेचे सोंग घेतलेल्या माणसाला मात्र कोणीही झोपेतून जागे करु शकत नाही.’ तसेच सरकारचे झाले आहे. शेवटी साहित्यिकांनी रस्ते आणि खड्डे यांचे गांभिर्य कवितांमधून सरकारच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न अलीकडेच नाशिकच्या कवीमंडळींनी केला. नाशकातही बरेच नवीन कवी उदयाला येत आहेत याचीही या कार्यक्रमामुळे रसिकांना कल्पना आली. नाहीतरी साहित्यिकांनाही समाजाचा आरसा म्हणण्याचा प्रघात आहेच. त्यांनी या कवितांमधून सरकारला रस्त्यांच्या वास्तवाचे चित्र आरशातून दाखवले.

‘गाव शहरातला आपला दाखवा
एक रस्ता भला चांगला दाखवा
हात गेले कुठे, पाय गेले कुठे
एक मणका तरी वाचला दाखवा..’ असे आवाहन एका कवीने केले.

तर


‘अहो खड्ड्याचे काय घेऊन बसला,
एकेक खड्डा 45 हजार घेऊन बसला’ असे खड्डे दुरुस्तीचे पितळ एका कवीने उघडे पाडले.
‘रस्त्यावर खड्डे । झाले जागोजागी
कंबर अभागी । मोडलेगा..

असे म्हणून एका कवीने खड्ड्यांवर चक्क अभंगाची निर्मिती केली. केरळ उच्च न्यायालयाने खड्ड्यांसाठी भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या बेपर्वाईला जबाबदार ठरवले.

पण ‘वोट मागायला ते निघाले आता एक नेता तिथे लाजला दाखवा’ असे म्हणत संमेलनातील एका कवीने नेत्यांनाही खड्ड्यांचे श्रेय जाहिरपणे दिले. अर्थात न्यायसंस्थेच्या आदेशालाही जे वाटाण्याच्या अक्षता लावतात. ते कवींच्या शाब्दिक टोमण्यांना दाद देतील का? कवींचींही ती अपेक्षा नसावी.

वर्षानुवर्षाच्या मंदगती वाटचालीला कंटाळलेल्या शासकीय सेवकांची आणि नाशिककरांची घटकाभर करमणूक करावी एवढाच मर्यादित हेतू त्यांच्या काव्यवाचनामागे असावा. ‘अती झाले आणि हसू आले’ ही एक जुनी म्हण. तिचे प्रात्यक्षिक यानिमित्ताने कवी मंडळींनी नाशिककरांना घडवले. तेवढेच तेही खड्ड्यांमुळे झालेल्या वेदना थोड्यावेळासाठी विसरले हेही नसे थोडके.