Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखअंधश्रध्देच्या काळोखात विधायक नारीशक्तीचा उदय!

अंधश्रध्देच्या काळोखात विधायक नारीशक्तीचा उदय!

एका नाण्याच्या दोन बाजू असतात. कोणत्याही मुद्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू समोरासमोर येतात तेव्हा त्याची स्पष्टपणे जाणीव होते.

मानवी स्वभावाच्या दोन टोकाच्या दिशा दाखवणार्‍या दोन घटना नुकत्याच मराठी मुलखात घडल्या आहेत. सातारा जिल्ह्यात स्थापन झालेली महिलांची वाहतूक कंपनी ( ट्रॅव्हल कंपनी) ही त्यापैकी एक घटना. सातारा जिल्ह्यासह अन्य पाच जिल्ह्यामधील 600 पेक्षा जास्त माजी सैनिकांच्या पत्नी एकत्र आल्या. त्यांनी बचत गट स्थापन केले. बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक भांडवल उभे करून एक वाहतूक कंपनी स्थापन केली. पुणे महानगर परिवर्तन महामंडळच्या 44 बसेस भाडेतत्वावर घेतल्या. बसेसची काही रक्कम महिलांनी उभी केली आहे. याच व्यवसायातील एका आस्थापना त्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करत आहे. 44 बचतगट या उपक्रमात सहभागी झाले आहेत. प्रत्येकी एक बस त्यांच्या मालकीची आहे. येत्या रविवारपासून या बसेस पुणे शहराच्या सर्व रस्त्यांवर धावणार आहेत. या बसेस दरमहा 6 हजार किलोमीटर अंतराच्या फेर्‍या पूर्ण करतील असे उद्दिष्ट या बचतगटांनी निश्चित केले आहे. हा उपक्रम आपले उद्दिष्ट पूर्ण करेल अशी आशा या उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. करोनाची साथ आणि त्यामुळे केला गेलेला सक्तीचा लॉकडाऊन यामुळे लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. त्यांचे जगणे कठीण झाले आहे. कुटुंबातील सदस्यांचे पोट कसे भरायचे या चिंतेने आणि भविष्याच्या काळजीने अनेक लोक नैराश्यग्रस्त झाले आहेत. त्यांना मानसिक आणि शारीरिक ताणतणावाचा सामना करावा लागत आहे. शासनासह अनेक सामाजिक संस्थांनी नैराश्यग्रस्त लोकांना मदतीसाठी समुपदेशन कक्ष स्थापन केले आहेत. तथापि सातारा जिल्ह्यातील बचतगटाच्या महिलांनी रचनात्मक मार्ग दाखवला आहे. समस्यांचा बाऊ न करता त्यावर संघटितपणे मात करता येते याचे उदाहरण समाजासमोर उभे केले आहे. तथापि नाण्याची नकारात्मक बाजू औरंगाबाद येथील घटनेमुळे उघड झाली आहे. जादूटोण्याच्या संशयावरून एका मित्राने आपल्याच मित्राचा खून केल्याची घटना करमाड शिवारात घडली. ज्याचा खून झाला तो मित्र अपंग व रिक्षाचालक असल्याचे उघड झाले आहे. समाजावरील अंधश्रद्धांचा पगडा कमी व्हावा आणि लोकांनी ’शहाणे’व्हावे यासाठी अनेक समाजसुधारकांनी आणि संतांनी प्रयत्न केले. संत गाडगेबाबांसारख्या संतांनी समाजातील अंधश्रद्धांवर कठोर शब्दात प्रहार केले. त्यांच्या प्रयत्नांनी लाखो लोक सुधारले पण काहींच्या बाबतीत मात्र ते ’पालथ्या घड्यावर पाणीच’ ठरत आहे. त्यामुळेच जादूटोणा आणि करणीच्या संशयावरून आजही अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. शासनाने औरंगाबादची घटना गंभीरपणे घ्यावी. तपासातील आणि कायद्यातील उणीवांचा फायदा आरोपीला मिळू नये आणि वस्तुस्थितीला धरून न्याय व्हावा याची दक्षता सरकार घेईल का? वरील दोन घटनांमधून एकाच वेळी समाजातील सकारात्मक आणि नकारात्मक बाजू समोर आल्या आहेत. तथापि सातार्‍याच्या महिलांनी समाजाच्या वाटचालीची दिशा स्पष्ट केली आहे. लोक त्यावरून प्रेरणा घेतील अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या