Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखनेतृत्वाच्या कसोटीचे यथार्थ मार्गदर्शन!

नेतृत्वाच्या कसोटीचे यथार्थ मार्गदर्शन!

यशस्वी नेतृत्वाच्या अनेक कसोट्या अनेक नामवंतांनी सांगितल्या आहेत. सहकार्‍यांची योग्यता, क्षमता आणि कौशल्याची पारख करणे, त्यांना नेमून दिलेल्या कामात लुडबुड न करता प्रोत्साहन व प्रेरणा देणे आणि आवश्यकता भासेल तेव्हा मार्गदर्शन करणे या नेतृत्वाच्या काही कसोट्या सर्वाना माहित आहेत.

यात व्यक्तिपरत्वे काही कसोट्यांची भर पडते किंवा त्या बदलतात. पण यशाचे मूळ सूत्र मात्र कायम असते. नेतृत्वाच्या काही कसोट्या क्रिकेटपटू आणि मुंबई इंडियन्स या संघाचे कर्णधार रोहित शर्मा यांनी उलगडल्या आहेत. मुंबई इंडियन्स हा आयपीएल लीगमधील एक संघ आहे. रोहित शर्मा हे या संघांचे 2013 पासून कर्णधार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा संघ पाच वेळा आयपीएल चषक जिंकू शकला आहे. त्यात या वर्षाचा विजयाचा समावेश आहे. तुमच्या यशाचे गमक काय असा प्रश्न त्यांना विचारला गेला. तेव्हा त्यांनी यशाची वरीलपैकी सूत्रे माध्यमांसमोर उलगडली. ’मी छडी घेऊन कोणाच्याही मागे लागत नाही. खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतो. तो उंचावल्यास त्यांची कामगिरी चांगली होऊ शकते. आपली नेतृत्वाची शैली हुकूमशाहाची नाही.

- Advertisement -

सर्वांमध्ये योग्य तो समन्वय राखणेही महत्वाचे असते. शिवाय यंदाचा मोसम सुरु होण्यापूर्वीच आम्ही पूर्वतयारी सुरु केली होती’ असे त्यांनी सांगितले. संघभावना निर्माण करून ती जपणेही महत्वाचे असते अशी पुस्तीही त्यांनी जोडली. संघभावना कशी रुजवली जाते याचे उदाहरण त्यांच्या संघाच्या यशातून उलगडते. त्यांचा संघ आत्तापर्यंत दोनदा ’ निर्दोष खेळ’ (फेअर प्ले) चा किताब जिंकला आहे. यशाचे श्रेय सर्वांना देणे, स्वतःला सहकार्‍यांपेक्षा वेगळे न समजणे व मी केले असे सांगण्यापेक्षा आम्ही केले असे सांगणे वाटते तितके सोपे नसते. नेतृत्व करणारेही माणसेच असतात. त्यामुळेच यशाचे श्रेय वाटणे फार थोड्याना शक्य होते. भलेभले मिळालेल्या श्रेयावर फक्त आपलीच नाममुद्रा उठवण्याचा मोह टाळू शकत नाहीत. मिळालेले यश न पेलवणारी आणि तोल गमावलेली अनेक माणसे समाजात आढळतात. यशाचे श्रेय सहकार्‍यांना देऊन त्यांना पुढे करणारी आणि अपयश आलेच तर ते आपल्या शिरावर घेणारी माणसे मोठी होतात. रोहित शर्मा यांनी जरी त्यांचा खेळातील यशाची सूत्रे सांगितली असली तरी ती सर्वच क्षेत्रांना आणि समाजातील प्रत्येकाला लागू पडणारे आहे.

कौतूक कोणाला आवडत नाही? बालक-पालक, आस्थापना, खेळ, व्यवसाय असे क्षेत्र कोणतेही असो, प्रत्येकाला आपल्या कुवतीचे प्रदर्शन करायची संधी मिळेल तेवढे सामूहिक यश मिळणे सोपे होते. असे नेतृत्व सहकारीही मनापासून स्वीकारतात. ’हम करे सो कायदा’ अशी वृत्ती यशाचे, सहकार्‍यांच्या कुवतीचे आणि उदिष्टांचेही मातेरे करते. असे नेतृत्व बर्‍याचदा अपयशी ठरते आणि त्या अपयशाचे ओझे त्याच्या सहकार्‍यांनाही वागवावे लागते. अभ्यास करावा यासाठी मुलांच्या मागे हात धुऊन लागतात अशा पालकांच्या मुलांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता व वर्तनाच्या अनेक समस्या निर्माण होण्याची शक्यता तुलनेने जास्त असते असे मानसशास्त्रही सांगते. सगळेच पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात. तरीही अनेक मुलांना पालकांचा रागच जास्त का आठवतो? आयपीएल या लीगमधील काही संघ एकदाही अंतिम फेरीपर्यंत का पोचू शकले नाहीत? एखाद्या क्षेत्रात अनेक आस्थापना असतात. पण यशाच्या शिखरावर मात्र मोजक्याच आस्थापना पोहोचू शकतात.

शाळेत शिक्षक खूप असतात. पण विद्यार्थीप्रियता काहींच्याच वाट्याला येते. सर्वांना ते भाग्य का लाभत नाही याचे रहस्य नेतृत्वगुणाच्या कमतरतेत सामावले आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात. पण यश मात्र मोजक्याच विद्यार्थ्यांना का मिळते? सतत प्रयत्न, हार न मानणे, आव्हानांचा सामना करणे आणि चांगल्या गुणांचा आदर व अनुकरण करणे ही देखील नेतृत्वाची कसोटीच आहे. एखादी व्यक्ती काय सांगते यापेक्षा ती कशाप्रकारे सांगते यावर त्या सांगण्याची परिणामकारकता अवलंबून असते. यशाची सूत्रे, नेतृत्वगूण यांचे आयुष्यातील महत्व पटवून देणारे सेमिनार होत असतात. यशस्वी व्यक्ती त्यात आपापले विचार मांडत असतात. तथापि ते विचार अंमलात आणले आणि सवयी बदलल्या तर यश मिळवणे सोपे होऊ शकते हेच सूत्र रोहित शर्मा यांच्या सांगण्यात जाणवते. क्रिकेट हा नेहमीच अनिश्चितपणाचा व नशिबाचा मानला जातो. ’क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स’ ही म्हण प्रसिद्ध आहे. अशा खेळात पाचव्यांदा मिळालेल्या यशाच्या अनुभवातून आत्मसात केलेले सूत्रच रोहित शर्मानी व्यक्त केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या