मधुमेह नियंत्रणाला आशादायी संशोधने !

मधुमेह नियंत्रणाला आशादायी संशोधने !

भारत मधुमेहाची राजधानी मानला जातो. 2019 साली भारतात किमान साडेसातकोटी लोक मधुमेहाने प्रभावित रुग्ण असावेत असा अंदाज आंतरराष्ट्रीय मधुमेह फेडरेशनने (इंटरनॅशनल डायबेटीस फेडरेशन) व्यक्त केला आहे. देशात दरवर्षी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण केले जाते.

2019 सालच्या आकडेवारीनुसार एकूण लोकसंख्येच्या 6 टक्के महिला आणि 8 टक्के पुरुष मधुमेही रुग्ण आढळले आहेत. तर लॅन्सेटच्या अहवालानुसार 2030 पर्यंत भारतातील मधुमेहींची संख्या 10 कोटी पर्यंत वाढण्याचा संभव आहे. मधुमेह कधी न बरी होणारी व्याधी आहे. वैद्यकीय तज्ज्ञ मधुमेहाला ‘अबोल हत्यारा’ (सायलेंट किलर) मानतात. मधुमेह नियंत्रणात ठेवता आला नाही तर अशा व्यक्तींच्या शरीरात अनेक व्याधींची गुंतागुंत वाढत जाते. शरीरातील विविध अवयवांवर दुष्परिणाम होतो. मधुमेहींना करोना किंवा तत्सम साथीच्या रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता देखील सामान्य माणसांच्या तुलनेत वाढते असे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करतात.

मधुमेही व्यक्तींच्या जखमा लवकर बर्‍या होत नाहीत हा सार्वत्रिक अनुभव आहे मधुमेहींनी विशेषतः त्यांच्या पायांची काळजी घ्यावी, पायांना जखमा होणार नाहीत याची काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टर आवर्जून देत असतात. जखमा बर्‍या न झाल्याने पाय सडतो आणि पाय कापून टाकण्याचे दुर्दैव काही मधुमेहीवर ओढवते. मधुमेहामुळे दृष्टी गमावणार्‍या मधुमेहींची संख्याही बरीच आहे. मधुमेहावर जगभर संशोधन सुरु आहे. भारतातील संशोधकांनी मधुमेहींसाठी अलीकडेच आशेचा किरण दाखवला आहे. पुण्यातील राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्थेच्या माजी शास्त्रज्ञ डॉ. वैजयंती काळे आणि भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे रासायनिक अभियंता प्रा. जयेश बेल्लारे यांनी मधुमेहींच्या जखमा लवकर भरून निघतील असे जैविक बँडेज संशोधनांती तयार केले आहे.

या बँडेजच्या मधुमेही उंदरांवर चाचण्या घेण्यात आल्या. त्या यशस्वी झाल्याचे आणि बँडेजचे पेटंटही घेतल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. वैद्यकिय व्यावसायीक मधुमेह आणि लठ्ठपणा हे जुळे भाऊच मानतात. लॅन्सेटच्याच अहवालानुसार भारतातील लठ्ठ रुग्णांची संख्या जगात पाचव्या क्रमांकावर आहे. माणसांना दोन प्रकारचे मधुमेह होतात. लठ्ठपणामुळे दुसर्‍या प्रकारचा (टाईप टू) मधुमेह होतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार आणि विहाराची तज्ज्ञांनी सुचवलेली अनेक बंधने पाळावी लागतात. कदाचित त्यामुळेच लठ्ठपणाची व्याधी आटोक्यात आणणे अनेकांना शक्य होत नाही. लठ्ठपणामुळे फक्त मधुमेहच होतो असे नाही. रक्तदाब, हृद्यविकार यासारखे गंभीर विकार होण्याचीही शक्यता वाढते.

माणसाचा लठ्ठपणा नियंत्रणात राहू शकेल असे उपकरण मुंबईच्या केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी तयार केले आहे. या संशोधनाचे पेटंटही त्यांना मिळाले आहे. डॉ. हेमंत देशमुख आणि डॉ. क्रांतीकुमार राठोड गेली अनेक वर्षे या विषयावर संधोधन करत आहेत. ही दोन्ही संधोधने मधुमेहींच्या मनात आशेचा किरण निर्माण करणारी आहेत. तथापि त्यांचा फायदा होण्यासाठी त्यांचे व्यावसायिक स्तरावर उत्पादन व्हायला हवे. अशा संशोधनांना वैद्यकीय उपकरणे किंवा औषधांच्या निर्मात्यांचे सक्रिय सहकार्य मिळायला हवे. तसे झाले नाही तर संशोधन समाजासाठी फारसे उपयुक्त कसे ठरणार? अशाकल्पक संशोधकांना शासनाचे पाठबळही अत्यंत आवश्यक असते. ते मिळाले नाही तर असे अनेक शोध फक्त अभ्यासापुरते आणि अहवालांपुरते मर्यादित राहातात.

शासनाच्या भक्कम पाठबळाअभावी अशा शोधांची परिणीती कशी होते याचे नेमके चित्रीकरण मएक डॉक्टर की मौतफ या चित्रपटात आहे. ते मुद्दाम बघावे असा तो चित्रपट प्रभावी आहे. चित्रपटातील एक डॉक्टर कुष्ठरोगावर संशोधन करतो. जागतिक स्तरावर त्याला मान्यताही मिळते. तथापि शासकीय यंत्रणेतील झारीतील शुक्राचार्यांचा त्याला त्रास होतो आणि शेवटी आपण कोणतेही संधोधन केलेच नाही असे जाहीरपणे कबूल करण्याचा दुर्धर प्रसंग त्या संशोधकावर आणला जातो. असे चित्रीकरण कदाचित अतिरंजितही वाटू शकेल. तथापि झारीतील शुक्राचार्यांचे प्रताप जनतेला सर्वपरिचित आहेत. आत्तापर्यंत अशी संशोधने पाश्चात्य देशात मोठ्या प्रमाणावर होत होती. होत आहेत. कारण ते व्यावसायीक उत्पादनापर्यंत नेण्यासाठी मोठ्या भांडवलाची गरज असते.

एरवी औषधे किंवा वैद्यकीय उपकरणात हलगर्जीपणा झाल्यास रुग्णांच्या प्राणावर बेतू शकते. अशा प्रकारची संशोधने होण्याला विकासाकडे वाटचाल करणार्‍या देशात मर्यादितच वाव मिळू शकतो. तथापि आता भारत विकासमान अवस्थेकडे प्रगती करत आहे. भारतातील संशोधकांनाही जागतिक स्तरावर वाव मिळत आहे. त्यामुळे भारतातील संशोधनाना जागतिक स्तरावर मान्यता मिळण्याच्या संधी वाढत आहेत. वर उल्लेख केलेल्या दोन्ही उपकरणांना जागतिक स्तरावरचे पेटंट मिळाले आहे. याचाच अर्थ संशोधन आणि या उपकरणांमध्ये काही तथ्य आहेत. अर्थात असे प्रयोग देशात आधी देखील अनेक वेळा झाले आहेत. तथापि त्यावेळी माध्यमेही मर्यादित होती. त्यामुळे अशी संशोधने आणि त्यांचे संशोधक फारसे प्रसिद्धीच्या झोतापासून दूरच राहिले.

आजच्या जगात तर प्रचार, प्रसिद्धीला वाव मिळाला तरच उत्पादनाला बाजारपेठ मिळण्याची आणि प्रसाराची संधी मिळू शकते. संशोधन ही दीर्घकालीन आणि चिकाटीची प्रक्रिया आहे. देशात शिक्षणाचे प्रमाणही पुरेसे नव्हते. अशा परिस्थितीत संशोधनाला वाव कितीसा मिळणार? आता मात्र परिस्थितीची अनुकूलता खूपच वाढली आहे. तरुणाई मोठया प्रमाणावर संधोधनाकडे वळत असल्याचे उत्साहवर्धक चित्र उमटत आहे. ते असेच कायम राहावे ही जनतेची अपेक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने शासनाकडूनही पुरेसे सहकार्य मिळत राहील का?

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com