‘उपचारांपेक्षा खबरदारी घेणे बरे’!

‘उपचारांपेक्षा खबरदारी घेणे बरे’!

’'Prevention is better than cure'’ ही इंग्रजी म्हण सर्वत्र माहित आहे. मराठीत त्याचे रुपांतर ‘उपचारांपेक्षा खबरदारी घेणे बरे’ असे होऊ शकते. ते सध्याच्या परिस्थितीला चपखल लागू आहे. करोना पुन्हा एकदा दबक्या पावलाने परततो की काय अशी शंका तज्ञ व्यक्त करत आहेत. मुंबईमध्ये परवा एका दिवसात सातशेपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली. त्यापैकी पाच रुग्णांना प्राणवायुची गरज भासली. नोंद झालेल्या एकूण रुग्णांमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांची आणि ज्येष्ठ नागरिकांची संख्य बरीच असल्याचे माध्यमात झळकलेल्या वृत्तात म्हटले आहे. म्हणुनच लोकांनी काळजी घ्यावी असे आवाहन तज्ञांनी केले आहे. मुंबईमधील करोना रुग्णांची ही ताजी आकडेवारी काहीशी चिंता वाढवणारी आहे. आकडेवारीत किंवा नोंद करण्यात काहीवेळा सढळपणा होऊ शकतो हे गृहित धरले तरी एका दिवसात नोंदल्या गेलेल्या रुग्णांचा आकडाही दुर्लक्ष करण्यासारखा नाही. करोना संपणार नाही. त्याचे अवतार बदलत राहातील. तो सामान्य विषाणुच्या रुपात अस्तित्वात राहील असे तज्ञ वारंवार सांगत आहेत. करोना विषाणू दोन वर्षे जुना झाला आणि म्हणुनच तो सवयीचा झाला असे चेष्टेने बोलले जाते. तथापि साथीच्या कोणत्याही रोगाच्या विषाणुचा अभ्यास करायला दोन वर्षे हा काळ अत्यंत छोटा आहे असे मत काही तज्ञ व्यक्त करतात. तर अशा विषाणुंचा अभ्यास ही सतत चालणारी प्रक्रिया आहे असेही काही तज्ञ म्हणतात. तेव्हा करोनाचा कोणता अवतार माणसासाठी जास्त चिंतेचा ठरेल हे कोणीच सांगू शकत नाही. दक्षता बाळगणे व काळजी घेणे एवढेच माणसाच्या हातात आहे. करोना साथीतील जीवघेणे चढउतार सर्वांनीच अनुभवले. त्याचा रुद्रावतारही सहन केला. करोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. हजारो बालके अनाथ झाली. हजारो महिलांनी त्यांचे पती गमावले. विधवा म्हणून वेदनादायी जगणे त्यांच्या वाट्याला आले. तेव्हाही करोना जीवघेणा ठरेल असे कोणाला तरी वाटले होते का? अशी मुले व महिलांना मदतीसाठी सरकारने विशेष कृती गट स्थापन केले. एक किंवा दोन्हीही पालक गमावलेल्या मुलांच्या नावे राज्यसरकार एकरकमी पाच लाखांची ठेव ठेवणार आहे. तर अशा बालकांना दरमहा चार हजार रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केंद्र सरकारने नुकतीच केली आहे. विधवांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी अनेक सामाजिक संस्था काम करत आहेत. असे प्रयत्न होतच राहातील. सरकारच्या आर्थिक पाठबळामुळे मुलांचे भविष्यही कदाचित बरेच सावरले जाईल. पण आयुष्यातून कामयचे गमावलेल्या माणसांची भरपाई कशाने तरी आणि कधीतरी होते का? हे लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. करोनामुळे लादले गेलेले सगळे निर्बंध केंद्र आणि राज्य सरकारांनी मागे घेतले आहेत. त्याचे होकारात्मक परिणाम सगळेच अनुभवत आहेत. राज्याचा आर्थिक गाडा हळूहळू का होईना सुरळीत होईल असा विश्वास अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत. हंगामी पाऊस समाधानकारक असेल असा हवामान खात्याचा ताजा अंदाज आहे. त्यामुळे भरपूर पीकपाणी हाताशी येईल असा आशावाद शेतकर्‍यांमध्ये जागा झाला आहे. अशा चालत्या गाड्याला करोनाची खीळ पुन्हा एकदा बसावी असे कोणालाच वाटणार नाही. पण नुसते वाटणे पुरेसे नसते. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. आपल्या अनिर्बंध वर्तणुकीने करोनाला आणि सरकारी निर्बंधांना आवताण दिले असे व्हायला नको असेल तर निर्बंधांची त्रिसुत्री अंमलात आणणे हेच सर्वांच्या हिताचे राहील. त्याचीच आठवण तज्ञांनी पुन्हा एकदा करुन दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com