महाराष्ट्राच्या कार्यक्षमतेचा राष्ट्रपतींकडून गौरव

महाराष्ट्राच्या कार्यक्षमतेचा राष्ट्रपतींकडून गौरव
रामनाथ कोविंद

पुण्यातील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. साधू-संत आणि महापुरुषांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात पायधूळ झाडण्याची संधी मिळाली म्हणून राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्राच्या थोरवीबद्दल ते पुरेसे जाणून असावेत. त्यामुळेच पुण्यातील कार्यक्रमानिमित्त त्यांनी महाराष्ट्राच्या कार्याची आणि प्रगतीची स्तुती केली. ती करताना हातचे काही राखून न ठेवता मनमोकळेपणानेे मनोगत व्यक्त केले. देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात महाराष्ट्राचे योगदान देशाला विसरता येणार नाही, भविष्यातही महाराष्ट्र अग्रेसर राहील, असे प्रशंसोद‍्गार राष्ट्रपतींनी काढले. राष्ट्रपतींच्या तोंडून महाराष्ट्राची थोरवी आणि महती ऐकून बहुतेक उपस्थित भारावले असतील. देशाच्या विकासात महाराष्ट्राने दिलेले चौफेर योगदान पारदर्शी आहे. जे आणि जसे आहे तेच राष्ट्रपतींनी सांगितले. अलीकडेच औरंगाबादला सुरू झालेले राजकीय घमासान कदाचित राष्ट्रपतींच्या कानी गेलेले नसावे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी आदी अनेक विभूतींचा नामोल्लेख करून त्यांच्या कार्याचा गौरवही राष्ट्रपतींनी केला. महाराष्ट्राची सतत बदनामी आणि महाराष्ट्राचे नेतृत्व करणार्‍या राज्य सरकारबद्दल निंदा-नालस्ती करणारे नेते राष्ट्रपतींच्या तोंडून महाराष्ट्राचे गौरवगीत ऐकल्यानंतर नक्कीच भारावले असतील. अडीच वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात अभूतपूर्व चमत्कारातून सत्तांतर घडले. तेव्हापासून केंद्रात सत्ता असणार्‍या नेत्यांना महाराष्ट्राबद्दल फारसे ममत्व राहिलेले नसावे. ते त्यांच्या सततच्या महाराष्ट्रविरोधी शिवराळ वक्तव्यांतून मराठी जनतेला पदोपदी जाणवते. सत्ताबदलानंतर महाराष्ट्रात काहीही चांगले घडलेले नाही वा घडत नाही, भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांनी महाराष्ट्र पोखरला आहे, राज्यकर्ते भ्रष्टाचारात लिप्त आहेत, असाच अविर्भाव ठेवून तसे चित्र राष्ट्रीय पातळीवर रंगवले जात आहे. काही मंत्री आणि त्यांच्या आप्तांमागे ईडीचे शुक्‍लकाष्ट लावले गेले आहे. दोन मंत्र्यांना तुरूंगात डांबले गेले आहे. अमूक मंत्र्यावर ईडीची धाड पडणार, तमूक मंत्री वा नेता तुरूंगात जाणार, असे एखादा नेता ईडीचा अधिकृत प्रवक्ता असल्यासारखा अधिकारवाणीने बोलतो. आश्‍चर्य म्हणजे त्या नेत्याच्या बोलण्याप्रमाणे पुढच्या काळात तसेच घडते. एखादी पटकथा लिहून त्यावर नाटक अथवा चित्रपट बेतावा तसेच काहीसे हल्ली महाराष्ट्रात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांबाबत घडत आहे. महाराष्ट्रात सध्या चांगले घडतच नाही, फक्त भ्रष्टाचार, अनाचार आणि अत्याचारांचीच चलती आहे, विकासापासून महाराष्ट्र अनेक वर्षे पीछाडला आहे, असे वातावरण जाणीवपूर्वक निर्माण केल्याचा आसुरी आनंद अनेक जण मिळवत आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्या एका भाषणाने त्या दाव्यांना छेद दिला गेला. महाराष्ट्राचा कारभार कोणत्याही सरकारच्या हाती गेला तरी विकासापासून महाराष्ट्राला कोणीही रोखू शकत नाही याचीही ग्वाही राष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे दिली. राष्ट्रपतींची ही ‘मन की बात’ काहींच्या सहजासहजी पचनी पडणार नाही, पण राष्ट्रपतींच्या निरीक्षणावर आणि भाष्यावर आक्षेप घेण्याचे धारिष्ट्य एखादा टीकाकार दाखवू शकेल असे वाटत नाही. राष्ट्रपतींनी महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरांचा आढावा घेऊन प्रोत्साहित करणारे गौरवोद‍्गार काढले ते मराठी जनतेचा महाराष्ट्राविषयीचा अभिमान वाढवणारे आहेत. माणूस ज्या रंगाचा चष्मा डोळ्यांवर चढवतो त्याच रंगाचे जग त्याला दिसते, कावीळ झालेल्या माणसाला सगळे जगच पिवळे दिसते, असे म्हणतात. म्हणून महाराष्ट्राविषयी अनुचित बोलणार्‍यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी स्वत:च्या चष्म्यांच्या काचा स्वच्छ पुसाव्यात हे बरे! अर्थात राष्ट्रपतींनी महाराष्ट्राचे कौतुक केल्याबद्दल राज्यातील सत्तापतींनीसुद्धा हुरळून जाण्याचे कारण नाही. राष्ट्रपती कोविंद यांचा कार्यकाळ संपण्याच्या मार्गावर आहे. म्हणून ते स्वच्छ चष्म्याने देशाकडे पाहत असावेत, असे त्यांच्या भाषणावरून जाणवते. विकासाच्या अश्‍वावर आरूढ होऊन महाराष्ट्र पुढे-पुढे जात आहे. पुढेच जाणार आहे. सत्तेसाठी महाराष्ट्राचा द्वेष करून काही साध्य होणार नाही. महाराष्ट्राची सत्ता घालवल्याचे व्यक्तिगत दु:ख काही काळ विसरावे आणि महाराष्ट्राच्या भरभराटीसाठी भगवाप्रेमींनी प्रयत्न करावेत, असेच राष्ट्रपतींनी सूचित केले असेल का? कोणत्या कार्यक्रमाला आपण हजर आहोत आणि त्याप्रसंगी काय बोलायचे याचे तारतम्य बाळगले पाहिजे, असा मूक संदेशच राष्ट्रपतींनी देशातील वाचाळ नेत्यांना दिला आहे. सर्व संबंधितांनी तो लक्षात घेतलेला बरा! कारण, समझनेवालोंको इशारा काफी है।

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com