सौहार्दाची जपणूक हा गुन्हा?

सौहार्दाची जपणूक हा गुन्हा?

एकात्मतेचा उद्घघोष करणार्‍या देशात आणि राज्यात सौहार्दाची जपणूक सध्या गुन्हा ठरत असेल का? सौहार्द आणि मानवता या मानवी मूल्यांनी संतांना, समाजसुधारकांना आणि साहित्यिकांना नेहमीच भूरळ घातली. ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’अशी प्रार्थना कवी समीर सामंत करतात. ‘परस्पर प्रेम हो सब में, अहम की न जगह कोई’ असा संदेश कवयित्री विजय लक्ष्मी पाठक देतात. तर ‘ हे मानवा तू मानवतेला सोडू नको रे’ असे चक्क एका बंदीवानाने लिहिले आहे. माणसाने सौहार्दाचा, मानवतेचा अंगीकार करावा हीच उपरोक्त सार्‍यांची इच्छा होती आणि आहे.

‘व्यक्ती तितक्या प्रकृती’. त्यानुसार माणसांनी आपापल्या कुवतीनुसार ही मूल्ये अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तर त्याची माध्यमात बातमी का व्हावी? खुनाचा आरोप असलेल्या गुन्हेगाराला पोलीसांनी मानवतेची वागणूक दिली तर तो त्यांचा गुन्हा कसा असू शकेल? गुन्हेगार झाला तरी तो माणूसच नाही का? जेलमध्ये राहाणे सोपे का असते? त्याच्या जीवनात क्षणभरासाठी आनंद निर्माण करणे गैरवर्तन का ठरावे? विविध गुन्ह्यांच्या तक्रारी असणार्‍या एका गुंडाला कल्याण न्यायालयात हजर करण्यासाठी ठाणे पोलीस घेऊन जात होते. त्या दिवशी गुंडाचा वाढदिवस होता.

गुंडाच्या भक्तांनी केक आणला. तो पोलीसांच्या गाडीच्या खिडकीतून गुंडाकडे दिला. गुंडानेही पोलीस गाडीत तो केक कापून वाढदिवस साजरा केला. याची चित्रफीत समाजमाध्यमांवर झळकली आणि पोलीसांवर टीकेचा भडीमार सुरु झाला. पोलीसांचे तरी काय चुकले? गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आरोपीला गुन्हेगार मानू नये असा न्यायशास्त्राचा दंडक सांगितला जातो. मग, पोलीसांनी आरोपीला मानवतेची वागणूक दिली तर त्यात त्यांचे काय चुकले? त्यांनी परस्पर सौहार्दच नाही का जपले? सौहार्दाची जोपासना कोणीही करु शकते. त्याला एखादा अटकेतील गुन्हेगार तरी अपवाद का ठरावा? असे सौहार्द सर्वांनीच जोपासले तर सर्वांचेच काम किती सोपे होईल.

अगदी पोलीसांचे सुद्धा. हीच प्रथा पुढे सुरुच राहिली तर ज्यांचे गुन्हे सिद्ध झालेले नाहीत असे आरोपी न्यायालयात सुद्धा केक कापू शकतील. लोकशाही राज्यपद्धती जगभर लोकप्रिय का होते याचेच हे नवे उदाहरण नाही का? पोलीस टीकेचे धनी झाले. त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावले गेले. पण त्यामुळे फारसे काही बिघडत नाही. कारण या घटनेने कदाचित चांगल्या परिणामांचे संकेत दिले आहेत. त्याची सुरुवात ठाण्यापासून झाली आहे. ठाण्याचे महत्व सध्या राज्याच्या दृष्टीने वेगळे आहे. ठाण्यात सध्याच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान आहे. ठाणे ही आपली कर्मभुमी असल्याचे तेही सांगत असतात. त्यादृष्टीने पुर्वीचे आणि आत्ताचे ठाणे यात फरक असायचाच.

ठाण्यात अशा काही नव्या प्रथा सुरु झाल्या तर त्याचे श्रेय अनायासे मुख्यमंत्र्यांनाच मिळू शकेल. तेव्हा, बंदीजनांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याची परंपरा सुरु केल्याबद्दल राज्यातील जनता ठाणे पोलीसांना धन्यवादच देईल. याचा राज्यभर प्रसार झाला तर जेलमध्ये असणारांना केवळ केकच नव्हे तर आणखी बर्‍याच वस्तू आणून देता येऊ शकतील. कायदा सर्वांना समान असतो. मग जेलमधील राजकीय कैद्यांना आणि सामान्य कैद्यांना वेगवेगळी वर्तणूक का दिली जावी? सामान्य कैदी लोकांचे खिसे कापत असतील तर राजकीय कैदी सरकारी तिजोरीला भगदाडे पाडत असतील एवढाच काय तो फरक! राजकीय कैद्यांना मात्र सगळ्या सुखसोयी आणि सामान्य कैद्यांना मात्र हीन वागणूक? हे यापुढे चालणार नाही असे सुचवणारा, केक कापण्याची मुभा देणारा उदार दृष्टीकोन ठाणे पोलीसांनी स्वीकारला तो कदाचित राज्यातील सर्वच पोलीस यंत्रणेला मार्गदर्शक का ठरु नये?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com