Monday, April 29, 2024
Homeअग्रलेखखड्डेमुक्त रस्ते म्हणजे लबाडाघरचे आवताण?

खड्डेमुक्त रस्ते म्हणजे लबाडाघरचे आवताण?

रस्त्यातील खड्ड्यांमुळे पुन्हा एकाच बळी गेला आहे. एका मातेने तिचा मुलगा गमावला आहे. नाशिकमधील सिन्नर फाटा भागात ही, दुर्दैवी घटना घडली. अकरा वर्षाच्या आपल्या मुलाला घेऊन एक आई दुचाकीवरून चालली होती. रस्त्यातील खड्डा चुकवण्याचा प्रयत्न तिने केला. त्या नादात मागून येणाऱ्या एका गाडीने तिच्या गाडीला धडक दिली. त्यात त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. खड्ड्यात गेलेले रस्ते हे मृत्यूचे सापळे बनत आहेत. liar

राज्यात ठिकठिकाणी अशा घटना घडतात. रस्त्यांना पडलेले खड्डे हा नेहमीच सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. एखादी दुर्घटना घडली कि त्यावर घमासान होते. चर्चा रंगतात. माध्यमे दखल घेतात. न्यायसंस्था सरकारांची खरडपट्टी काढते. वेळोवेळी असे बरेच काही घडते. वाहतूक वेगाने व्हावी यासाठी महामार्गांवर अडथळे नसावेत असे म्हंटले जाते. तथापि आता तर महामार्ग देखील खड्ड्यात गेले आहेत. राजकीय पक्षांच्या आंदोलनाचा मुद्दा बनले आहेत. राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते त्यांच्या परीने आंदोलन करतात. खड्यात वृक्षारोपण करणे, खड्ड्यांभोवती रांगोळी काढणे, नेत्यांच्या श्रद्धांजलीचे फलक लावणे हे त्यापैकी काही प्रकार. रस्त्यातील खड्डयांना ठेकेदार जबाबदार धरले जातील असे इशारेही दिल्याचे माध्यमात अधूनमधून वृत्त झळकते. रस्ते खड्डेमुक्त व्हावेत यासाठी असे बरेच काही घडते, फक्त रस्ते तेवढे खड्डेमुक्त होत नाहीत. रस्ते बनवणे आणि ते खड्डयात जाणे हे दुष्टचक्र सुरूच राहाते. दर्जाहीन रस्त्यांमुळे अपघात वाढतात. त्यात बळी जाणारांची संख्या वाढते. रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त असल्याबद्दल नेहमीच चिंता व्यक्त केली जाते. रस्ते खड्ड्यात जातात कसे या प्रश्नाचे उत्तर जनतेला न सापडणे एकवेळ समजण्यासारखे आहे. पण ते सरकारला देखील सापडू नये? हे म्हणजे ‘काखेत कळसा आणि साऱ्या गावाला वळसा’ असे आहे.

- Advertisement -

जनतेला रस्ते बांधणीतले ओ की ठो कळत नाही. कळणे अपेक्षित देखील नाही. तथापि जे त्यातील जाणकार असायला हवेत अशी जनतेची अपेक्षा असते, त्यांच्या जबाबदारीचे काय? रस्त्याला निधी किती दिला गेला, कोणाला दिला गेला, त्याने कोणते तंत्र वापरले, वापरायला हवे होते, बांधकाम साहित्याचा दर्जा याविषयी जनतेला काही देणेघेणे नसते. रस्ता दर्जेदार असावा एवढीच त्यांची मागणी असते. रस्ते बांधणीत भ्रष्टाचार होतो हे उघड सत्य सगळेच जाणून आहेत. तथापि त्याची किंमत लोकांनी प्रसंगी त्यांच्या आप्तस्वकीयांचे प्राण देऊन का मोजावी हा खरा प्रश्न आहे. त्याची जाणीव संबंधिंतांना कधी होईल? जनतेच्या संतापाचा कडेलोट होणे कोणत्याही राजकीय पक्षाला परवडेल का? याचा विचार राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते करतील का? खरेच रस्ते दर्जेदार बांधले जाऊ शकत नाहीत का? रस्ते खड्डेमुक्त होऊच शकत नाहीत का? त्याची जबाबदारी निश्चित केली जाऊ शकत नाही का? रस्ते खड्ड्यात गेल्याबद्दल दंड झाल्याचे निदान जनतेच्या ऐकिवात तरी का नाही? जनतेला पडणाऱ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळू शकतील का? ती प्रामाणिकपणे जोपर्यंत दिली जाऊ शकत नाहीत तोपर्यंत रस्ते खड्डेमुक्त करण्याचे राजकीय नेत्यांचे आश्वासन ‘लबाडाघरचे आवताण’ ठरत राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या