खड्डेमुक्त रस्ते हे स्वप्नरंजनच?

खड्डेमुक्त रस्ते हे स्वप्नरंजनच?

रस्त्यांवरील खड्ड्यांचे पुराण आणि खड्डेमुक्त रस्त्यांसाठी केले जाणारे प्रयत्न हे कापूसकोंड्याची न संपणारी गोष्ट बनले आहेत. राज्याच्या रस्त्यांवरील खड्डे इतके चिवट आहेत की ते बुजता बुजेनासे झाले आहेत. या खड्ड्यांनी सामान्य माणसांना इतके पिडले की शेवटी मुंबई उच्च न्यायालयाला स्वयंस्फूर्तीने (सुमोटो) याचिका दाखल करुन घ्यावी लागली. याचिकेच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्यात येईल, असे जाहीर करावे लागले. खड्डेयुक्त आणि पाणी साचणार्‍या रस्त्यांवर संबंधित विभागाच्या, कंत्राटदाराच्या नावाच्या पाट्या लावा आणि त्यावर त्यांचे संपर्क क्रमांक लिहा, असा दम केंद्रीय मंत्र्यांना संबंधित अधिकार्‍यांना द्यावा लागला. खड्ड्यांनी वाहनचालकांची अक्षरश: पाठ धरली. खड्ड्यांमुळे पाठीच्या आणि मानेच्या मणक्यांनी धक्के बसतात. त्यांना इजा होते. त्यामुळे मणक्याच्या दुखणाईतांची संख्या दिवसेदिवस वाढत असल्याचे अस्थीरोगतज्ञ सांगतात.  रस्त्यांवरील खड्डे जीवघेणेदेखील ठरत आहेत. अपघातांचे एक प्रमुख कारण बनत आहेत. रस्ते अपघातातील बळींमध्ये तरुणांचे प्रमाण वाढणे हा चिंतेचा विषय आहे. यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील साधारणत: आठ हजार विद्यार्थ्यांनी संबंधित खात्याच्या केंद्रीय मंत्र्यांना पत्र पाठवले. रस्ते अपघातात पुढचा नंबर आपला तर नाही ना, अशी भीती सतावत असल्याचे पत्रात लिहून रस्त्याच्या दुरवस्थेकडे त्यांचे लक्ष वेधून घेण्याचा भावनिक प्रयत्न केला. रस्त्यातील खड्ड्यांनी कवींच्याही सर्जनशीलतेला धुमारे फुटले. ‘हे शहर सुन्न खड्ड्यांचे’ असे एका कवीने म्हटले तर दुसर्‍या एका कवीने ‘खड्ड्यात सर्व माझ्या
माझे इमान आहे..ज्याचे न खोल खड्डे
तो बेइमान आहे! असे म्हणत रस्त्यात खड्डे का पडतात याचे उत्तर आपापल्या परीने शोधण्याचा प्रयत्न केला. खड्ड्यांवर उतारा शोधण्याचा प्रयत्न अनेक बाजूंनी सुरु आहेत, पण त्याचबरोबरीने खड्डे पडणेही सुरुच आहे. खड्ड्यांना कोणताही रस्ता अपवाद नाही. महामार्ग असो वा गल्लीबोळातला रस्ता खड्ड्यात जातच आहे. रस्त्यांवरुन वाहतूक सुरु आहे म्हणजे रस्ता चांगला आहे, असे संबंधित विभागाला वाटते का? यावरुन मुंबई उच्च न्यायालयानेही राज्य सरकारचे कान उपटले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुर्दशेची समस्या धसास लावण्यासाठी एका वकिलांनीच न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. ‘रस्त्यांवरुन गाड्या धावत आहेत, म्हणजे तो रस्ता खड्डेमुक्त झाला असे मानायचे का? मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी का झाली नाही? खड्डे बुजवून ठराविक मुदतीत न्यायालयात कृती अहवाल सादर करावा’ असे आदेशही दिले. अशा तर्‍हेने पुन्हा एकदा खड्डेपुराण न्यायालयात दाखल झाले. खरेच खड्डेमुक्त रस्ते बांधणेच शक्य नसेल का? की जबरदस्त इच्छाशक्तीचा अभाव आणि टक्केवारीच्या शापामुळे रस्ते खड्ड्यात जात असतील? खड्ड्यांमुळे लोकांची होणारी ससेहोलपट कोणालाच दिसत आणि कळत नसेल का? की कळत असूनही त्यावर चुप्पी साधण्यातच अनेकांचे भले दडलेले असेल? तात्पर्य, जनतेच्या गैरसोयीची जाणीवपूर्वक दखल घेणारी प्रवृत्ती मात्र सध्या लुप्त झालेली आढळते. तसा लोकांचाही अनुभव आहे. राजकीय खोखो मात्र जोरात सुरु आहे. रस्ते आणि वाहनचालकांचे जीव मात्र खड्ड्यात जातच आहेत. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com