बुलढाण्याची शेतातील आनंददायी अंगणवाडी

बुलढाण्याची शेतातील आनंददायी अंगणवाडी

तीन-चार वर्षांची बालके खेळकर असतात. घरात बंदिस्त होऊन राहणे त्यांना सहसा आवडत नाही. बाहेरचा निसर्ग, झाडे, पक्षी, प्राणी, आकाश आदींचे त्यांना मोठे आकर्षण व कौतुक असते. खेळणी खेळण्याऐवजी झाडाखाली सवंगड्यांसोबत किंवा मोठ्यांसोबतसुद्धा खेळायला त्यांना आवडते. खेळताना त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. शाळेची सवय लागावी म्हणून हल्ली पालक त्यांच्या बालकांना अंगणवाड्यांमध्ये दाखल करतात, पण त्यांचा ओढा मोकळ्या वातावरणात खेळण्या-बागडण्याकडेच असतो. बुलढाण्यातील अंगणवाडी सेविकांनी बालकांचा कल ओळखून ‘शेतातील अंगणवाडी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांना ही संकल्पना मनापासून आवडली. ती साकारण्यासाठी त्यांनी अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन केले. त्यांना प्रोत्साहन आणि पाठबळ दिले. त्यातून उपक्रम आकारास आला. बालविकास प्रकल्पातील अधिकारी आणि मुख्यसेविकासुद्धा या अंगणवाडीला भेट देऊन तेथील सेविकांना प्रोत्साहित करीत आहेत. आजूबाजूच्या परिसराची, तेथील झाडांची, फळा-फुलांची ओळख अंगणवाडीच्या लहानग्यांना व्हावी, असा प्रयत्न केला जात आहे. खुल्या वातावरणातील अंगणवाडीत मुले आनंदाने सहभागी होऊन मुक्त शिक्षणाचा लाभ घेत आहेत. अंगणवाडीत हसत-खेळत शिकताना आकाशातून उडणारे पक्ष्यांचे थवे, काळे-पांढरे ढग मुलांच्या नजरेस पडतात. वेगवेगळे पक्षी तसेच पाळीव प्राण्यांचे आवाजही मुलांच्या कानी पडतात. त्यातून त्यांचे कुतूहल जागे होते. पुस्तकांतील चित्रे दाखवून निसर्ग समजावण्यापेक्षा मुलांना प्रत्यक्ष निसर्गातच घेऊन जाणार्‍या व कुतूहल निर्माण करणार्‍या बुलढाण्यातील या उपक्रमाची कीर्ती परिसरात पसरली आहे. महाराष्ट्राचे लक्षही त्याकडे वेधले गेले आहे. विद्यार्थ्यांना कोणत्याही विषयाचे ज्ञानदान चार भिंतीच्या बंदिस्त वातावरणात नव्हे तर निसर्ग सानिध्यात व्हावे याबद्दल गुरूदेव रवींद्रनाथ टागोर आग्रही होते. त्यांच्या या संकल्पनेतून शांती निकेतनची निर्मिती झाली. भव्य संकुलात वर्गाऐवजी गुरूजींना आणि विद्यार्थ्यांना बसण्याची झाडाखाली केलेली आसन व्यवस्था तेथे आजही वापरात आहे व तेथे जाणार्‍यांना बघावयास मिळते. भारतातील जुन्या काळच्या आश्रम पद्धतीनुसार तेथे विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. झाडाखाली बसून गुरूजी आणि विद्यार्थी शिक्षणाचा आनंद घेतात. शेतात अंगणवाडी भरवण्याची बुलढाण्यातील संकल्पनासुद्धा निसर्गात जाऊन शिकण्या-शिकवण्याची प्रेरणा देते. किंबहुना शांती निकेतनचे लहानसे रुप म्हणून त्याकडे पाहता येईल. राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनासुद्धा शेतातील अंगणवाडीची संकल्पना प्रभावित करणारी ठरली आहे. या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले आहे. शाळांच्या इमारती जीर्ण झाल्या आहेत, अंगणवाड्या भरवायला खोल्या नाहीत, अशा स्वरुपाच्या तक्रारी सरकारदरबारी वरचेवर केल्या जातात. वृत्तपत्रांतूनही त्याबाबतच्या बातम्या येतात, पण वर्ग नाही म्हणून एखादी अंगणवाडी भरवताच येणार नाही, असे म्हणणार्‍यांना बुलढाण्यातील अंगणवाडी सेविकांनी राबवलेल्या उपक्रमातून चोख उत्तर दिले आहे. इतरांना प्रेरणाही दिली आहे. लहान मुलांना निसर्ग सानिध्यात घेऊन जाण्याचे उपक्रम विशेष काही करावे न लागता राबवता येऊ शकतात हेही या प्रयोगातून लक्षात येते. राज्याच्या विविध या उपक्रमाचे अनुकरण भागात करता येणे शक्य आहे. त्यासाठी तेथील अंगणवाडी सेविका, प्रशासन आणि संबंधित अधिकार्‍यांनी स्वयंस्फूर्तीने असा बिनखर्चिक उपक्रम राबवण्याची तयारी दर्शवून पुढे आले पाहिजे. राज्याचा शालेय शिक्षण विभागदेखील ‘शेतातील अंगणवाडी’चा उपक्रम राज्यभर लागू करण्याचा विचार करील, अशी अपेक्षा करावी का?

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com