Monday, April 29, 2024
Homeअग्रलेखसजगतेतून संकट टाळता येईल

सजगतेतून संकट टाळता येईल

प्रभावी उपाय योजले नाहीत तर प्लॅस्टिक प्रदूषणाचा भस्मासूर जीवसृष्टीवरच उलटू शकेल, गंभीर मुद्यांकडे पर्यावरण तज्ज्ञ आणि अभ्यासक लक्ष वेधून घेत आहेत. प्लास्टिक नष्ट करता येईल का? प्रदूषण कसे कमी करता येईल? यावर अनेक देशात संशोधन सुरु आहे. सामाजिक, संस्थात्मक आणि व्यक्तिगत पातळीवर लोक त्यांच्या परीने उपाय योजण्याचा प्रयत्न करतात. अनेक कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने प्लास्टिकचा कचरा गोळा करून त्याचा पुनर्वापर व्हावा यासाठी काम करतात. प्लॅस्टिक बाटल्यांच्या कचर्‍याची विल्हेवाट लावणारी यंत्रे मुंबई महापालिकेने काही उद्यानांमध्ये बसवली आहेत. विल्हेवाट लावलेल्या बाटल्यांपासून टी शर्ट आणि बाक (बेंचेस) बनवले जातात, असे संबंधित अधिकार्‍याने माध्यमांना सांगितले. अशीच यंत्रे उर्वरित उद्यानांमध्येही बसवली जाणार आहेत. प्लॅस्टिकचा वापर करून 100 किलोमीटरचे रस्ते तयार करण्याचे धोरण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने स्वीकारले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने देखील पुढाकार घेतला आहे. फरिदाबादमध्ये प्रायोगिक तत्वावर रस्ता तयार केला आहे. काही ठिकाणीही रस्ते बनवले जाणार आहेत. बंगरुळूमधील राजुल खान यांनी हा प्रयोग प्रथम केल्याचे सांगितले जाते. राज्यातील नद्यांचा श्वास प्लॅस्टिकच्या कचर्‍याने कोंडला आहे. नाशिकमध्ये काही सामाजिक संस्था आणि कार्यकर्ते नदी पात्रातील प्लास्टिकचा कचरा गोळा करतात. तो कचरा पुनर्वापरासाठी पाठवतात. प्लॅस्टिकचा बेसुमार वापर आणि लोकांच्या बेजबाबदार सवयी प्लॅस्टिक कचरा समस्येची तीव्रता वाढवतात. एकदा वापरून फेकून दिले जाणारे प्लॅस्टिक संकलित केले जाऊ शकते. तथापि कार्यकर्ते डोळ्यालाही लवकर न दिसणार्‍या कचर्‍याकडेही लक्ष वेधून घेतात. दुधाच्या पिशव्यांचे कापलेले तुकडे, शाम्पूच्या वापरून फेकलेल्या छोट्या पिशव्या आणि त्यांचेही कापलेले कोपरे! हा कचरा पाण्याबरोबर वाहत जातो. कचरा डेपोत साठतो. नाल्यांमध्ये जाऊन बसतो हेही कार्यकर्ते लोकांच्या निदर्शनास आणतात. प्लॅस्टिकचा वापर थांबवता येणे शक्य नसले तरी त्याचा वापर मर्यादित करता येऊ शकतो. त्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा आहे. अनेक लोक त्यासाठी व्यक्तिगत पातळीवर काम करताना आढळतात. काही जण दुधाच्या किंवा कोणत्याही प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कोपरा कापत नाहीत. छोट्या छोट्या पिशव्या (पाऊचेस) वापरत नाहीत. अनेक जण प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या वापरत नाहीत. कापडी पिशवी आणि पाण्याची स्टीलची बाटली घेऊनच घराबाहेर पडतात. एकदा वापरून फेकून द्यावे लागणारे प्लॅस्टिक वापरत नाहीत. या वस्तूंशिवाय माणसाचे अडत नाही असे ते म्हणतात. एकदा वापरून फेकून द्याव्या लागणार्‍या प्लास्टिक वापरावर सरकार बंदी घालू शकते. नव्हे तशी ती घातलीही आहे. तथापि लोकच ती बंदी प्रभावी ठरवणे लोकांचे कर्तव्य आहे. प्लॅस्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम वेगळे सांगायला नकोत. सर्वांनाच ते माहीत आहेत. ठरवले तर ते टाळता येऊ शकतात हे अनेक कार्यकर्त्यांनी कृतीतून दाखवले आहे. आवश्यकता आहे सामान्यांनी मनावर घेण्याची! सामाजिक भान दाखवण्याची!

- Advertisment -

ताज्या बातम्या