Friday, April 26, 2024
Homeअग्रलेखअशा गुन्ह्याला फक्त आईच जबाबदार?

अशा गुन्ह्याला फक्त आईच जबाबदार?

काही सामाजिक समस्या आणि जुनाट रूढी परंपरांची पाळेमुळे समाजाच्या मानसिकतेत खोलवर रुजलेली आहेत. त्यांचा पगडा कमी व्हावा यासाठी समाजसुधारक आणि संतांनी आपले आयुष्य वेचले. अनेक सामाजिक संस्था तो वारसा पुढे चालवत आहेत.

समाजात जागरूकता वाढत आहे आणि लोकांची मानसिकता बदलत आहेत असेही सांगितले जाते. तथापि हे सांगणे वास्तवापासून किती दूर आज याची कल्पना सांगणाराला तरी असते का? समाज खरोखरच सुधारला आहे का? अनेक रूढी आणि परंपरा कालबाह्य झाल्या आहेत हे लोकांना का समजत नाही? समाजावर अजूनही बुरसटलेल्या विचारांचा भयानक पगडा आहे हे स्पष्ट करणारी एक विदारक घटना नुकतीच उजेडात आली. घटना नाशिक शहरातील आहे. पण भारतीय माणसांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकणारी आहे.

- Advertisement -

शहरातील एका सुनाट रस्त्याने एक माणूस चालला होता. त्या सुनाटीत अगदी जवळ एका बालकाच्या रडण्याचा आवाज त्याने ऐकला. आसपास पाहिले एका छोट्याश्या खड्ड्यावर ढापा नुकताच ठेवला गेला होता असे दिसले. बाळाच्या रडण्याचा आवाज तिथूनच येत होता. त्या पादचार्‍याने ढापा बाजूला सरकवला व समोर दिसलेल्या नवजात जिवंत मुलीला बाहेर काढले. त्या बाळाला त्याने सरकारी दवाखान्यात नेले. योगायोगाने अचानक त्याच्या आईच्या शोध लागला. आईने आपल्या कृत्याची कबुली दिली. आपल्याला पहिली मुलगीच आहे. दुसर्‍यांदाही मुलगीच झाल्याने आपण तिला टाकून दिले असे तिने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रीतसर सगळे सोपस्कार पार पडतील व आईला कायद्याने सांगितलेली शिक्षा फर्मावली जाईलही. गुन्हा करतो त्याला त्याची शिक्षा व्हायलाच हवी यात कोणाचेही दुमत नसावे. तथापि नवजात बालकाला ती मुलगी आहे म्हणून टाकून देण्याची मानसिकता का तयार होते? नवजात मुलीला फेकून देण्याची ही पहिली घटना नाही.

मुलगी झाली म्हणून आईचा छळ करण्याचा, प्रसंगी तिचा जीव घेण्याच्या, मुलीला फेकून देण्याच्या घटना घडतच असतात. अनेक ठिकाणी नामवंन्त डाक्टर मंडळी अशा नकोशा कन्यांचे गर्भपात घडवण्याचा उद्योग साळसूदपणे करताना आढळले आहेत. काहींना शिक्षाही ठोठावलय गेल्या आहेत. मुलगी जन्माला आल्याचा सर्वस्वी दोष एकट्या आईलाच दिला जाणे ही मानसिकता रास्त आहे का? अशी एखादी घटना उघडकीस आली की आईला क्रूर, उलट्या काळजाची, कैकयी अशी अनेक दूषणे दिली जातात. तथापि कोणाचीही आई खरेच तशी असते का? ‘स्वामी तिन्ही जगाचा; आईविना भिकारी’ ही कवितेची ओळ समाजात लोकप्रिय आहे. या भावनेशी सर्व समाज कदाचित सहमत असेल-नसेल, पण ज्या बाळाला 9 महिने पोटात वाढवले, पथ्यपाणी सांभाळले, त्याच्या जन्माच्या कळा सहन केल्या ते बाळ आई फेकून कशी देऊ शकेल? उगाचच आपले बाळ फेकून द्यायला आईला वेड लागलेले असते का? इतकी ती निष्ठुर कशी होऊ शकेल? पोटच्या गोळ्याला ती स्वतःहून फेकून देते की तिला तसे करायला भाग पाडले जाते?

मुलीच्या जन्मानंतर तिला असा कोणता ताण सहन करावा लागतो की त्यापोटी ती मुलीला टाकून देण्यास प्रवृत्त होते? हे कृत्य करायला प्रवृत्त होणारी माता घरातील कोणाकोणाच्या दडपणाने हे करायला प्रवृत्त होत असेल? ते सगळे नामानिराळे राहून फक्त बालकाच्या मातेला जबाबदार धरणे व शिक्षा ठोठावणे हा न्याय पुरेसा म्हणावा का? नवजात बाळ फेकून दिले म्हणून आईवर गुन्हा दाखल करताना या प्रश्नांचा विचार कोणी करणार आहे का? गेल्या काही वर्षात 2 कोटींपेक्षा जास्त ‘नकोशा’ जन्माला आल्याचे सांगितले जाते. वंशाचा दिवा जन्माला यावा अशी इच्छा असतांना जन्माला येणार्‍या मुलींना नकोशी म्हंटले जाते. समाजात मुलींची कमतरता आहे याबद्दल जागरूक समाज कार्यकर्ते संधी मिळेल तेथे उल्लेख करतात. चर्चासत्रेही होतात. मुली जन्माला येण्याचे प्रमाण वाढावे यासाठी सरकारे अधूनमधून विचार करतात. तरी ही मानसिकता का वाढतच आहे? मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाल्याचे भीषण परिणाम समाजावर होत आहेत.

मुलामुळे वंश सुरु राहातो, मुलगी परक्याचे धन, मुलाने अग्निडाग दिला तर मुक्ती मिळते, मुलींना हुंडा द्यावा लागतो, मुलीचा सांभाळ करणे म्हणजे पदरात निखारा बांधणे, मुलींवरील वाढते अत्याचार अशा अनेक समस्यांचा परिणाम समाजावर स्पष्ट जाणवतो. समाजात या समस्या मुलीची आई निर्माण करते का? ज्या ज्या पुराणकथांमधून मुलगी दुय्यम ठरवण्याचा प्रचार उघड किंवा छुप्या रीतीने आढळतो अशा सर्व जुन्या ग्रंथांनी समाजाची ही विकृत मानसिकता घडवली आहे का? समाजाची दुटप्पी मानसिकता आणि पुरुषी वर्चस्वही याला कारण आहे. एकविसाव्या शतकातही नवजात मुलगी टाकून देण्याची वेळ एका आईवर येत असेल तर समाज सुधारला आहे असे म्हणता येईल का? अशा अनेक कुप्रथांमधून मुक्त होण्यासाठी समाज अजून किती शतके घेणार आहे आणि किती मुलींना ‘नकोशी’ठरवणार आहे?

- Advertisment -

ताज्या बातम्या